रोजच्या त्या वाटेवर मी एक कळी पाहिली होती
पाहताना मी तिजला ती मजला पाहून हसली होती...!!
सजले होते क्षितिजावरती रंग छटांचे नजराणे पण,
रंग सावळी एक परी ती मनास माझ्या भावली होती...!!
स्मित हास्य ओठावर नजर अनुरागाने भरली होती
जणू स्वरांची फुलमाळही केसांमध्ये माळली होती...!!
एकटक मी निहाळत होतो तोल सावरत तना मनाचा
स्वच्छंदी ती स्वप्नसाजनी स्वतःमध्येच रमली होती...!!
मनमनाच्या गाभाऱ्यात कविता नवी स्फुरली होती
कस्तुरीच्या सुगंधाची जादुही वाऱ्यात भिनली होती ...!!
गालावरच्या बटा तिने अलवार अश्या सावरल्या की,
चंचल माझ्या मनास तेंव्हा परिभाषा प्रेमाची कळली होती...!!
🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤🖤