चार दिवसांपूर्वीच्या आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांतून असा काही फिरला की,जणू काही मोठा गजहब झाला आहे.सुर्वे-म्हात्रे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या(शिंदे गटाच्या)रॅलीला गेले असता गाडीच्या अचानक लागलेल्या ब्रेकने वरील 'गप्पाटप्पांना' जन्म दिला आणि अनेक भूषणे,परंपरा,राजकीय संस्कृतीच्या बाता मारणाऱ्या महाराष्ट्रातील(विशेषतः 'उबाठा' गट)नेत्यांनीही वरील बातमीला चांगलीच फोडणी दिली.त्यावर मविआच्या नेत्यांनी चार हात राहणेच पसंत केले.'कुणाचाही कुणाला अंकुश नसणे' हा वाक्प्रचार इथे ११०% लागू होतो.
माध्यमातून आलेल्या बातमीनुसार याप्रकरणी सर्वात मोठी चूक झाली ती आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाची!त्यांनीच सदर प्रसंगाचा व्हिडिओ सर्वप्रथम फेसबुकवर टाकला;अनेक लोकांनी पाहिल्यानंतर नव्हे तर डाऊनलोड केल्यानंतर तो परत काढून टाकला.मात्र,तोपर्यंत ही बातमी चवीने खायला सुरुवात झाली होती.अशा चर्चांनी एखाद्या महिलेला तिच्या सामाजिक वर्तुळात काय काय सहन करावे लागत असेल याची कल्पनाही करायला नको.परंतु,प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण साधायचे असल्याने असे उपद्व्याप घडतच राहणार असे सध्याचे वातावरण दिसत आहे.याआधी राजकीय आरोपांपुरते सीमित असलेले डाव आता वैयक्तिक आयुष्याची पातळी ओलांडून एकमेकांची राजकीय हत्या करण्यासाठी प्रचाराच्या क्रूरतेने मोठी उंची गाठली आहे.
त्याच्या जोडीला खऱ्याचे खोटे,खोट्याचे खरे करायला तंत्रज्ञान आहेच !
यामध्ये कोणताही राजकीय पक्ष मागे पडताना दिसत नाही हे चिरकाल सत्य आता स्वीकारावेच लागेल.
असे असले तरी,
एकमेकांवर उट्टे काढण्यासाठी...
"एवढा खालचा थर बरा नव्हे!"
-अमोल काळे