पालकांसाठी ठेवले जरी जीवन गहाण
वेड्या जीवा तू केले कार्य काय महान?
ज्यांनी दिला जन्म त्यांच्यासाठी जीवन
फुलवणा-यासाठीच पुष्प केले अर्पण
माय माऊली तुझे अनंत
उपकार हे मजवर राहिले
मुलाच्या अपेक्षेने का होईना
तू मला नवमास उदरी वाहिले
जन्मदात्या तव ऋणांचा
पेटला धगधगता याग
पण पडल्या समिधा कमी
केला सा-या स्वप्नांचा त्याग
सुखे अर्पिला असता मी प्राण
जर का तुम्ही मला मागिला
केवळ तुमच्यासाठी आजीवन
जिवंतपणी मी नरक भोगिला
कधी न फिटे जन्मदात्यांचे ऋण
क्षणक्षण जरी झिजले कण-कण
जरी जगले जीवन मन मारून
फक्त त्यांच्यासाठी हेच समाधान