*ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा*
(जागतिक ग्राहक हक्क दिन)
*कोणतीही वस्तू किंवा सेवा यांची नक्की किती किंमत असावी या बाबतीत काहीतरी निर्णय लवकरच व्हावयास हवा. वस्तूच्या उत्पादन खर्चात, कारखान्यात होणारा सगळा खर्च अंतर्भूत असतो,
अगदी कच्च्या माला पासून कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, एक्साइज टेक्स, सेल्स टेक्स, नफा सगळ धरून मुळ किंमत ठरवली जाते. ग्राहकांच्या हातात ती वस्तू येते तेव्हा मुळ किंमतीच्या वस्तूंवर पुन्हा विविध कर लागतात. त्या आधी वस्तूच्या पेंकिंगवर प्रचंड खर्च केला जातो.
* चकचकीत आकर्षक वेष्टण मालाचा खप वाढवतं. मुळात या वेष्टणाचा व मालाच्या गुणवत्तेचा संबंध असेलच असे नाही. खऱ्या अर्थाने वस्तू महागते ती जाहिरातींच्या अवाढव्य खर्चामुळे . जाहिरातींचे सगळे प्रकार वापरले जातात. टि.व्ही चेनल , वृत्तपत्रादवारे होत असल्या जाहिराती या प्रचंड महाग असतात, मात्र अत्यंत जिद्दिने अशा जाहिरांतीवर खर्च केला जातो. त्यात विविध कर पुन्हा आकारले जातात. तेच तेच कर एकाच वस्तूंवर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर लावले जातात. आणि किंमत वाढत जाते. खीसा मात्र ग्राहकाचा लुटला जातो. यावर कुठेतरी निर्बंध हवा.
*या सर्व समस्यांवर विदेशी एफडीआय च्या भारतात प्रवेश करण्याचा युक्तीवाद केला जातो तो मान्य नसावा. एफडीआय हा गेट करारांतर्गत येणारा मुद्दा असून त्यावर आक्रमक चर्चा चालुच राहणार आहे, परंतू भारतीय उत्पादकांनी किंमतीवर बंधन ठेवायला हवे. किंवा किंमतीवर अंकूश हवा. उत्पादनावर जर ग्राहकांचा विश्वास असेल तर वेष्टणा चा खर्च कमी करता येईल . केवळ आकर्षक वेष्टण म्हणजे दर्जेदार उत्पादन, नक्कीच नाही. त्याचप्रमाणे चेनल वर दाखवल्या जाणाऱ्या कितीतरी जाहिराती अतर्क्य आणि आत्यंतिक फसव्या असतात, भ्रामक असतात.
*जाहिरातीसाठी वापरले जाणारे गुळगुळीत अभिनेते, नट्या
यांनी जाहिरातीच्या नावावर कितीही पैसा उकळावा आणि किती चुकीची विधाने करावी याला काही ताळतंत्र उरला नाही. एखादे उत्पादन किती काळ वापरल्यावर त्यावर मत देता येईल , यावर निर्बंध नाहीच. ग्राहकाला एकदम मुर्ख समजून या जाहिराती ग्राहकाच्याच पैशाने सुरू असतात. कारण हा खर्च सुद्धा वस्तूच्या किंमतीत आकारला जावून ग्राहकाकडून वसूल केला जातो. सेवा देण्याच्या किंमतीत तर काही काही एम.आर.पी.नाही. अगदी होमिओपेथी किंवा आयुर्वेद डॉक्टरांनी तपासणी व औषधांचे किती पैसे घ्यावे ? स्पेशालीस्ट त्यांचे, हॉस्पीटल , त्यांच्या तपासण्या, वेळोवेळी आकारलेली व्हिजीट फी सगळेच बेहिशोबी वाटतं. वित्तीय संस्था, होमलोन, कार लोन सर्व ठिकाणी छुपे खर्च सहज आकारतात. ग्राहकांच्या गरजेप्रमाणे छोट्या छोट्या रोजच्या गरजेच्या वस्तूंचे भाव का वाढतात? चैनी विलासी जीवनाची चटक ग्राहक प्रत्येक टप्प्यावर सहज लुटला जातोय, म्हणून म्हणावसं वाटतं की हे ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा.
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]