उंचीपुढे ज्याच्या सावलीही भासते परी इवली इवली असा महाराष्ट्राचा एवरेस्ट...."कळसूबाई शिखर"!
भटकंती विशेष लेख!
उंचे लोग ....उंची पसंद!
किस सोच मे पड गये...? अरेच्चा मी मराठी ना! आणि हा लेखही मराठी 😊 नाही का? मी हे सांगत होतो की मी हे तसलं काही अभक्ष खाण्याबद्दलं नाही लिहिलं आहे...😜 मी बापडा सर्व दृष्टीने शाकाहारी माणूस... असलं तसलं खाऊन ऊंचे लोग होणाऱ्यातला... नि असली तसली उंची पसंद असणाऱ्यातला तसला शौकीन नव्हे.... तो मी नव्हेच!
जमिनीवर राहून अधून मधून नजर उंचीवर ठेवणाऱ्यातला मी...कधी भटकंती...कधी गड भ्रमंतीने सुखावणारा...या वेळी मात्र जरा जास्तच उंचावर नजर खिळून राहिली होती... शिखरांचा "माणिक" जे चढायची हिम्मत फक्त "चंद" लोकच करतात...
म्हणून आपलं "उंचे लोग उंची पसंद" असे मी म्हटले.😂
खूप दिवसांपासून "कळसूबाईचे शिखर" साद घालू लागले होते... "महाराष्ट्रातलं सर्वोच्च एवरेस्ट शिखर" अशी ख्याती असलेल हे एकमेवाद्वितीय असे हे ठिकाण...
५४०० फूट ही स्वतःची उंची ( १६४६ मीटर ) अभिमानाने मिरवणारे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत विसावलेले हे ठिकाण.
'एक से भले दो.... दो से भले तीन' ही टॅग लाईन मनात ठेवूनचं शक्य होईल तितकी मित्रमंडळी गोळा करत गड भ्रमंतीची माझी आवड ही सवड काढून जपणं खरेच अगदी तारेवरची कसरत नाही म्हणता येणार पण नक्कीचं तितकीचं अवघड बाब आहे...😜😜
या वेळी हा आकडा 'ना जास्त ना कमी' असा होता म्हणजे आम्ही 'आठ' जण होतो. बार्शीतून जाणारे आम्ही तिघे..मी माझी बायको नि पोरगं...आणि पुण्यातून माझे मित्र नि फॅमिली... पाच जण...अश्या 'आठ' जणांनी कायम आठ'वणीत राहणारी अशी कळसूबाई शिखर ट्रेकिंग नुकतीच पार पाडली.या वेळी रंगपंचमी रविवारी आली... होली हैं म्हणत होळीच्या दिवसांपासून रंग खेळणारी आजची ही पिढी असली तरी मी मात्र खरा सुखावतो तो रंगपंचमीच्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या रंगांनी..भले आता मी रंग खेळत नाही पण सप्तरंगांची भुरळ मला अगदी हवेहवेसे नेत्रसुख नक्कीचं देवून जाते....
यावेळी या दिवशी निसर्गाच्या रंगांची उधळण अनुभवण्यासाठी आम्ही निघालो सह्याद्री पर्वतरांगेच्या शिखरावर...
शनिवारी दुपारी आम्ही निघालो बार्शीतून आणि साधारणता सात तासात आम्ही पायथ्याला असलेल्या 'बारी' या गावी पोहोचलो.... अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेलं हे छोटंसं गाव. भंडारदऱ्या्पासून १५ किलोमीटर दूर.
इथे असलेल्या 'हॉटेल आदिराज" या होमस्टे मध्ये मुक्कामाची खूप छानं सोय होती.."घरापासून दूर असलेलं हे छोटंसं घर जणू ...'एक होमस्टे' ... गावाकडच्या मातीचा सुवास जपलेलं..
नुकतीच माघाची थंडी संपलेली नि फाल्गुनने आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली... आसमंतात हलकीशी थंडी होती वेळ रात्रीची नि मोकळं रान ते ही डोंगराच्या पायथ्याशी..गारव्याने त्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती...मग शेकोटीची ऊब घेत आम्ही साऱ्यांनी गप्पागोष्टी करत जेवणावर आडवा हात मारला...
मी होतो...आम्ही होतो
होता निसर्गही सोबतीला जणू...
वाऱ्या संगे मन ही लागले धावू
ही हळुवार क्षणें कशी मी शब्दांत विणू..
नुकतीच पौर्णिमा होवून गेली होती...चंद्र साक्षीला होता.... ढगा आड दडून तोही ही हळुवार क्षणें त्याच्या पांढऱ्या कॅनव्हास वर रेखांकित करत होता..
पाहता पाहता आम्ही निद्राराणीच्या कुशीत कधी विसावलो समजलेच नाही...अगदी भल्या पहाटे जाग आली ती कोंबड्याच्या आरवण्याने....जणू तो आम्हाला सांगत होता मी तुमच्या साठी आरवलो...तुम्हीही लवकर लवकर आरवा...सॉरी सॉरी आवरा..😂😂
पाच वाजता निघायचे ठरवलेले आम्ही साडे सहा वाजता कळसूबाईच्या चढाई साठी सज्ज झालो...😂
हो ना सज्ज झालो हा शब्दचं इथे अगदी चपखल बसतो कारण शेवटी महाराष्ट्रातल्या एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या शिखरावर आम्ही चढाई करणार होतो..नाही का?
मजल दरमजल करत....अगदी उत्साहात आम्ही ही चढाई पूर्ण केली... शिखरावर पोहोचल्यावर मनावर एका वेगळ्याच अनुभूतीने गारूड केलं..शिखर सर केल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जणू ओसंडून वाहत होतं..शिखरावर असलेलं कळसूबाईचे मंदिर एका वेगळ्याच पावित्र्यानं नटलेल होतं...
या कळसूबाईच्या शिखराची गोष्टही खूपच रोमांचक आहे.देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसूबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसूबाईला ते आपली देवी मानतात. कळसूबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.
कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन.एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय..
काही दंतकथांमध्ये कळसूने शिखरावर देहत्याग केला त्यामुळे ते शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्यात आले असा उल्लेख आढळतो.
येथून समोरच खाली भंडारदऱ्याचा अथांग पसरलेला जलाशय लक्षं वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.
त्या शिखरासंबंधी असणारी आणखी एक कथा म्हणजे १८६० साली 'आर्चडीकन गेल' या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलने पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्या दृश्याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला 'दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स' असे म्हटले.
असे हे शिखर सर करणे म्हणजे ट्रेकिंगची एक वेगळीच अनुभूती घेणे आहे.मी माझ्या परीने ती शब्दांत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे...पण प्रत्येकाने आवर्जून स्वतः हा अनुभव घेणे म्हणजे परमानंद काय असतो हे जाणणे होय...
याच आनंदाच्या क्षणांना मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो... येता येता "श्रद्धां आणि सबुरीचा" अनमोल संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साई चरणी नतमस्तक होवून...साईबाबांचे दर्शन घेवून आम्ही आमच्या या ट्रेकिंगची सांगता केली..
तुम्हाला ही माझी शब्दांतून व्यक्त झालेली भ्रमंती... 'शब्दभ्रमंती' कशी वाटली हे आवर्जून सांगा...
तुम्हालाही या लेखाने शिखर सर केल्याची काहीशी जरी अनुभूती वाचताना दिली असेल तर माझ्या या लिहिण्याचे सार्थक झाले असे मी समजेन...
बरं मग वाचक मंडळी पुन्हा भेटूया अश्याच एका लेखातून अथवा कवितेतून...कारण हे शब्दचं तर तुमच्या आणि माझ्यातला दुवा आहे नाही का?
डॉ अमित.
मंगळवार.
१४ मार्च २०२३.