आज १४ मार्च.... थोर मराठी कवी, लेखक, अनुवादक, समीक्षक व ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक कविवर्य गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!
विंदांच्या ‘स्वेदगंगा’ , ‘मृद्गंध’, ‘धृपद’ , ‘जातक’ , ‘विरूपिका’ , ‘अष्टदर्शने’ , ‘मुंबई' , ‘लोकशक्ति ही’, ‘विश्वरूप’, ‘मजूर’ ‘माझ्या मना बन दगड’ , ‘ती जनता अमर आहे’ , ‘दातापासून दाताकडे’ , ‘रक्तसमाधि’ , ‘त्रिवेणी’ , ‘मुक्तीमधलें मोल हरवलें’ , ‘सनातनी’ , ‘संहिता’ , ‘रूपक’ , ‘दादरा’ , ‘दीपचंदी’, ‘झपताल’ , ‘भारतीय कविता’ , ‘स्त्रियांसाठी स्थानगीत’ अशा विविध शैलीतील, विविध विषयांवरील कविता प्रसिद्ध आहेत.‘सरोज नवानगरवाली’ , ‘बकी’ , ‘मथूआत्ते’ , ‘कावेरी डोंगरे’ ही व्यक्तिचित्रेही प्रत्ययकारी आहेत. विंदांच्या बालकवितांचे अकरा संग्रह आहेत.
विंदांच्या निर्मितीचा आवाका अत्यंत मोठा आहे. कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार, समीक्षक आणि विचारवंत अशा विविध नात्यांनी त्यांची कामगिरी मौलिक स्वरूपाची आहे. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्युत्पन्न, बहुश्रुत आणि अनेकविध संस्कारांनी संपन्न आहे. समाजातील सामान्य माणसाविषयीची, उपेक्षितांविषयीची त्यांची आस्था आणि त्यांच्या चांगुलपणाविषयीचा त्यांचा विश्वास कधीही क्षीण झालेला दिसत नाही. जीवनाकडे आणि काव्याकडे पाहण्याचा खुला, बहुतत्त्ववादी दृष्टिकोन हे विंदांचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ठ्य होते......
मानवी जीवन हे कोणत्याही एका सिद्धान्ताच्या चिमट्यात पकडता येत नाही; प्रत्येक सिद्धान्तातील सत्यांश आणि मिथ्यांश उघड करीत जाणे हा जीवनातील गतिशील प्रवाहाचा स्वभावधर्म आहे अशी त्यांची धारणा होती आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसून येते.
प्रासंगिक कवितेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. प्रसंग संपला की संदर्भ बदलतात आणि कविता संदर्भहीन होऊन मागे पडते. सन १९५२ च्या निवडणुकीवेळी विंदांनी ही कविता लिहिली. विंदा तिला "काही केल्या मरत नाही म्हणुन ही दुर्दैवी कविता आहे" असे म्हणत असत. ज्या दिवशी मरेल (लाक्षणिक अर्थाने) तो दिवस भारताचा सुदिन असेल !! विंदांची कधीच कालबाह्य न होणारी ही कविता एकदा नजरेखालून घालाच !!
“ सब घोडे बारा टक्के ”
जितकी डोकी तितकी मते; जितकी शिते तितकी भुते|
कोणी मवाळ, कोणी जहाल; कोणी सफेद, कोणी लाल|
कोणी लट्ठ, कोणी मट्ठ; कोणी ढिले कोणी घट्ट|
कोणी कच्चे, कोणी पक्के; सब घोडे बारा टक्के ||
गोड गोड जुन्या थापा; तुम्ही पेरा तुम्ही कापा |
जुन्या आशा नवा चंग| जुनी स्वप्ने, नवा भंग|
तुम्ही तरी करणार काय; आम्ही तरी करणार काय|
त्याच त्याच खड्डया मध्ये; तोच तोच पुन्हा पाय|
जुना माल नवे शिक्के; सब घोडे बारा टक्के ||
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी
जिकडे टक्के तिकडे टोळी|
ज्याचा पैसा त्याची सत्ता; पुन्हा पुन्हा हाच कित्ता|
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार; मंद घोडा अंध स्वार|
यांच्या लाथा त्यांचे बुक्के; सब घोडे बारा टक्के ||
सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्याची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी “देईन” म्हणा; मीच फसविन माझ्या मना
भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?
कोणी तिऱ्या कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के ||
श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार