Bluepad | Bluepad
Bluepad
भगवान बुद्धांचे राजकरणावरील उपदेश
J
Jaimala Pawar
20th Jun, 2020

Share


भगवान बुद्धांचे राजकरणावरील उपदेश

भगवान बुद्धाचे तत्वज्ञान  “नितीमत्ता, समता आणि बंधुभाव” या तत्वावर आधारित आहे. भगवान बुध्दांनी राजकारणावर प्रवचने दिली आहेत; ती प्रवचने ऐकून त्या प्रवचनाच्या तत्वांवर आधारित त्या काळातील ज्या राजांनी त्या तत्वाप्रमाणे राज्यकारभार केला ती राज्ये ऊर्जितावस्थेला पोहचली आणि ज्या राजांनी त्या तत्त्वांचा अनादर केला ती सतत एकमेकांविरुद्ध लढत राहून मनुष्यबळ आणि इतर मालमत्तेचे नुकसान करत बसली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथातील चवथ्या खंडातील भाग पाच मध्ये बुद्धांनी “राजकारणावरील प्रवचने” या सदराखाली वैशाली नगरातील वज्जी लोकांना उपदेश केलेल्या सात “अपरिहानीय धम्माचा” उल्लेख आला आहे. वज्जी लोक बुद्धांनी सांगितलेल्या या सात अपरिहानीय नियमांचे कटाक्षाने पालन करून राज्य करत असल्यामुळे त्यांचा राज्य कारभार स्वच्छ आणि निकोप होता. त्यामुळे अजातशत्रू सारखा बलाढ्य राजासुद्धा त्यांना अनेक प्रयत्नांती ही हरवू शकला नाही.

भगवान बुद्ध राजगृह येथील गृध्रकूट पर्वतावर राहत असताना मगध राजा अजातशत्रू वैशालीच्या वज्जी लोकांवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वभावाने अतिशय दुष्ट होता. तो आपल्या राज्याचा विस्तार करून जास्तीत जास्त लोकांवर आपली सत्ता गाजवावी असा विचार करीत होता. तो फार शूर असल्यामुळे बरीच राज्ये जिंकून त्याने आपल्या राज्यास जोडली होती, परंतु वैशालीला जिंकणं त्याला जमत नव्हतं. वज्जी लोकांना तो हरवू शकत नव्हता. म्हणून शेवटी त्याने आपला एक वस्त्रकार नावाचा ब्राह्मण अमात्य भगवान बुद्धांकडे पाठवून वज्जी लोकांना कसे जिंकून घेता येईल याबद्दल सल्ला विचारला.

वस्त्रकार भगवान बुद्धांना भेटायला गृध्रकूट पर्वतावर आला आणि त्याने भगवान बुद्धांना वंदन करून एका बाजूस बसून तो अजातशत्रू राजाचा निरोप भगवान बुद्धांना सांगू लागला. वस्त्रकाराचं म्हणणं भगवंतांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांच्या स्वतःच्या शैलीत त्यांच्यामागे उभ्या असलेल्या भन्ते आनंदला उद्देशून एकेका मुद्द्यावर बोलू लागले .
भगवंत म्हणाले, ‘आनंद, वज्जी लोक वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय?’
आनंदने उत्तर दिले, “होय भगवंत.” यावर भगवंत पुढे म्हणाले, “आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत, उलट त्यांची भरभराट होत राहील.”
अशा प्रकारे भगवंतांनी वज्जी लोक पालन करीत असलेले पुढील प्रमाणे सात “अपरिहानिय नियम” आनंदला सांगत असताना वस्त्रकारास ऐकवले.
  • नियम १ : वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवितात.
  • नियम २ : वज्जी लोक एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात आणि आपली सर्व उद्दिष्ट्ये आणि कार्ये करतात.
  • नियम ३ : गतकाळात वज्जीकुळाने जे नियम केले आहेत त्या परंपरेप्रमाणे आचरण करतात.
  • नियम ४ : वज्जी लोक जोपर्यंत आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्याशी सल्लामसलत करणे आपले कर्तव्य मानतात तोपर्यंत त्यांची कोणीही हानी करू शकणार नाही.
  • नियम ५ : जोपर्यंत वज्जी आपल्या कुळातील स्त्रियांना व कन्यांना बळजबरीने डांबून ठेवत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचं अपहरण करत नाहीत तोपर्यंत त्यांची कोणी हानी करू शकत नाही.
  • नियम ६ : जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात व त्यांचे पालन करतात तोपर्यंत यांची हानी होऊ शकत नाही.
  • नियम ७ : वज्जी लोक जोपर्यंत प्रजातंत्रावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे राज्यकारभार करतात तोपर्यंत त्यांच्या राज्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही.
भगवंतांचे हे बोलणे ऐकून वस्त्रकार म्हणाला, “हे गौतमा, मगध राजाला वज्जींचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते." असे म्हणून वस्त्रकार निघून गेला.

राजा अजातशत्रू आणि राजा प्रसेनजित यांच्यातील लढाया
अजातशत्रू राजाने भगवंताचा निरोप ऐकला तेंव्हा त्याला कळून चुकले की वज्जी लोक जोपर्यंत प्रजातंत्राप्रमाणे कारभार करत आहेत तोपर्यंत त्यांना आपण जिंकू शकणार नाही. परंतु तो गप्प बसणारा नव्हता. थोड्याच दिवसात त्याने सैन्याची जमवाजमव केली आणि काशीचा राजा प्रसेनजितच्या राज्यावर हल्ला केला. या लढाईत प्रसेनजित राजाचा पराभव झाला.

परंतु दुष्ट प्रवृत्तीने मिळवलेला विजय जास्त काळ टिकत नसतो. काही दिवसांनी प्रसेनजीत राजाने अजातशत्रू राजावर प्रतिहल्ला केला आणि यावेळी अजातशत्रू राजाचा पराभव झाला. प्रसेनजीत राजाने त्याचे सैन्य, धनदौलत सर्व काढून घेतली आणि त्याला जीवनदान देऊन सोडून दिले.

भगवान बुद्ध म्हणतात, “अजातशत्रू राजा जगातल्या सर्व दुष्टपणाचा ठेवा आहे; तर प्रसेंजित राजा चांगुलपणाचा मित्र आहे म्हणून त्याने अजातशत्रू राजाला जीवदान देऊन सोडून दिले.”
भगवान बुद्ध भिख्खूंना म्हणाले, “एकूण युद्धात जिंकणारा आणि पराभूत होणारा दोघांनाही तितकाच त्रास होतो. विजयातून द्वेष निर्माण होतो आणि पराजिताला दुःखात, अपमानात काळ कंठावा लागतो त्यामुळे दोघातले वैर वाढतच जाते. अशा राज्यांमध्ये समता कधीच निर्माण होत नाही. म्हणून जेत्याने शांती स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

जेता जीतावर गुलामगिरी लादणारा नसला तरी त्याची मानखंडना करण्याचा अधिकार सांगू शकतो. त्याने असे न करता आपल्या ऋजुता आणि अनुग्रहपूर्ण वाणी असलेले, आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत, इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, सुखाची हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या कृतीतून आणि वर्तणुकीतून सिद्ध केले पाहिजे.

अनुमान : सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. कोणाचा उपमर्द किंवा खुशामत करू नये. आपसात शत्रुत्व निर्माण होईल अशी वर्तणूक ठेवू नये, अशा प्रकारे राज्यकारभार केल्यास तो नि:सदेह निकोपच असेल.

26 

Share


J
Written by
Jaimala Pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad