आज ट्रेनने प्रवास करतांना एक पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली... मुलांची परीक्षा असली की concession घेऊन निघायचं....त्यांचा अभ्यास घ्यायला...तेव्हा मी ५.१३ ची दादर वरून लोकल पकडली...काही ओळखीच्या मैत्रीणी होत्या...दोन दिवसात अजून ओळख झाली...आम्ही दरवाजा प्रेमी कारण CST वरून सुटलेल्या १४ सिटर डब्यात आम्हाला सीट कश्या मिळणारं??? दोन दिवस दरवाज्यात एक २८ वर्षाची मुलगी उभी राहायची, तिचा दरवाजा आवडता... गप्पात निघाल की ती सकाळी ७.३० च्या अंधेरी ऑफिस साठी सकाळीं ६ वाजता घर सोडायची...तिची चार वर्षाची मुलगी नवरा पाळणाघरात सोडायचा, तिचं सगळं आवरून.. ही संध्याकाळी तिला न्यायला जायची. दिवसाचे साडेतीन तास ट्रेन मध्ये घालवायचे. मुलांना वेळ देणारं जेवढा कमी.
आज तिने दरवाजा पकडला पणं आत आली थोडी आणि दरवाजाच्या बाजुला खाली जागा करून बसली...पोटात दुखत होत तिच्या... तितक्यात एक नेहमीची त्या गाडीला असणारी तिची मैत्रिण धावत चढली...तिला धाप लागली म्हणून ही उठली आणि तिला खाली बसायला सांगितलं...ही दरवाज्यात गेली उभी राहायला. मला साईड मिळालेली मी तिला म्हटलं ' तुला बरं वाटतं नाही तर इकडे बस मी दरवाज्यात जाते '. ती बोलली ' नको, हवेवर बर वाटतं जरा '.
ठाणे सोडलं आणि अचानक मुंब्रा कळवा मध्ये समोरुन एक गाडी क्रॉस झाली तिच्यातून काचेची बाटली आमच्या डब्यात फेकली गेली...ती दरवांजावर आपटून बाहेर पडली पणं तिची काच ह्या मुलीच्या डोक्यात गेलीं आणि रक्त वाहायला लागलं. फोर्सने लागलेली वस्तू पहिला तो भाग बधिर करते, तसे तिच काहीस झालं... आम्हाला पणं कळेपर्यंत आम्ही गाडीत पडलेल्या काचा आमच्या ड्रेसवर उडालेले तुकडे झटकले, बघतो तर हिच्या कपाळातून रक्ताच्या धारा लागल्या. हातातले रुमाल दाबले काही केलं तरी रक्त थांबेना. तोपर्यंत डोंबिवली आले ..उतरून प्लॅटफॉर्म मधल्या स्टॉल वरून आम्ही बर्फ घेतला तिला सीट वर बसवून तिच्या डोक्यावर दाबून धरले. थंड लिम्का दिला तिला. ज्या बाईला तिने बसायला दिलेलं ती उतरून घरी गेली ( बोला आता). तिचं कुठेच सहभाग नव्हता.
तिचे फॅमिली डॉक्टर स्टेशन जवळ होतें तिकडे मी आणि अजून एक मैत्रिण घेऊन गेलो, बिचारीला गुंगीच इंजेक्शन देऊन पाच टाके घातले. मग सुचलं हिच्या नवऱ्याला कळवायला हवंय, त्याला कॉल केला. तिच्या पाळणाघरवालीला कॉल केला...तिला सगळं सांगितलं आणि हिला यायला उशीर होईल हे सांगितल.
ही मुलगी थोडी गुंगीत असताना तिला सोडून जाणं मनाला पटत नव्हतं ( म्हणतात ना काही ऋणानुबंध असतात इकडेच निभवावे लागतात) तस काहीतरी तिचं मागच्या जन्मी द्यायचं राहिलं असेल माझे.
घरी लेकाला कॉल केला ' मला यायला उशीर होईल, तू अभ्यासाला सुरुवात कर, उद्याच्या पेपरची तयारी कर '. लेकाच उत्तरं ' आई, काळजी करू नकोस, तसा झालाय माझा अभ्यास...तू आरामात ये '. ( ह्यांना कसली घाई नसतेच... अभ्यास सगळा झालेला असतो, पेपर पणं छान जातात.... फक्त बाई मार्क बरोबर देत नाहित, आम्हीच काय ते टेन्शन मधे असतो).
तिचां नवरा ऑफिस मधुन आला, त्याच्या ताब्यात तिला दिलं आणि आम्ही घरी निघालो. ऊद्या त्या गाडीला गेल्यावर त्या बाईची जरा तासायची अशी तयारी करून. दुसऱ्यदिवशी तिचं गाडी, ती मुलगी नव्हती पणं ती बाई चढली. आम्ही तिला खुन्नस द्यायच्या आत तिने सुरुवात केली ' अगं काल मी उतरून बर्फ आणायला गेलेली तुम्ही दिसलातच नाही मला? कुठे गेलेलात?' आम्ही तिला सर्व सांगितल्यावर ती बोलली, ' अच्छा तुम्ही ह्या स्टॉल वाल्याकडून बर्फ घेतलाय का? मी पुढच्या स्टॉल वाल्याला विचारायला गेली '.
राग तरं आलेला पणं घडून गेलं ते गेलं...तरी आम्ही तिला बोललो ' हा स्टॉल जवळ असताना तिथे का जायचं? आम्हाला तर ह्या स्टॉल वाल्याने बर्फ दिला. काल तिला बर नव्हतं म्हणून ती साईडला बसलेली, पणं तुला जागा दिली... कदाचित् तिच्या जागी तू असतीस काल...' ती बोलली ' मी नसतेच कारण जे नशिबात असतं तेच घडतं '. आमची बोलती बंद.
प्रत्येक प्रश्नांना उत्तरं असेलच अशी लोकं... जग जिंकतात का? नशिबावर विश्वास ठेवावाच अश्या गोष्टी घडतात का? जिला लागलं त्या मुलीच्या नवऱ्याने अंधेरीला भाड्याने घर घेतलं आणि एका महिन्यात शिफ्ट झाले...असे पणं बायकोची काळजी घेणारे नवरे.... असतात का?
🙏 वंदना ❤️