Bluepad | Bluepad
Bluepad
नात्यांची वीण 👌👌
Pramod Kore
Pramod Kore
13th Mar, 2023

Share

नात्यांची वीण
एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने, आपल्या मुलाला नीलमणीचा एक हार दिला आणि म्हणाली- "बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका व आम्हाला काही पैसे द्या."
मुलगा तो हार घेऊन काकांच्या दुकानात गेला. काकांनी त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले - "बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास, तुम्हाला चांगला भाव मिळेल." त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, “तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा.”
दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिऱ्यांची आणि रत्नांची पारख कशी करायची, ते शिकू लागला.
थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी, दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे येऊ लागले.
एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, "बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल."
आईकडून तो हार घेऊन, त्याने स्वत:च त्याची पारख केली असता तो हार नकली असल्याचे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले, की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे मोठे पारखी आहेत... मग त्यांनी आम्हाला हे का सांगितले नाही?
मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला.
काकांनी विचारले, "अरे तू हार का आणला नाहीस?" तो म्हणाला, "काका, तो हार तर नकली आहे... परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत?"
तेव्हा काका म्हणाले, "जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास, तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं, तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली आहे, म्हणून काका मला असं सांगत आहेत.
पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय, हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे, तेव्हा तुला समजलेच असेल की तो हार खरोखरीच नकली आहे. त्यावेळी खरं बोलण्यापेक्षा, नातं सांभाळणं, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं."
सत्य हे आहे की या जगात, खर्या ज्ञानाशिवाय आपण जो काही विचार करतो, पाहतो आणि जाणतो ते चुकीचे आहे. आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं.
ज्या अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण, हे प्रेम आणि विश्वासावर होत असते.
"नात्यात निर्माण झालेल्या थोड्याशा दुराव्यामुळे, कोणाचीही साथ सोडू नका... नाहीतर लोकांना आपलेसे करण्यात आयुष्य खर्ची करावे लागते."
सत्य अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा, की ज्यामुळे इतरांमध्ये प्रेम निर्माण होईल.

1 

Share


Pramod Kore
Written by
Pramod Kore

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad