मुलींचा जन्म शाप की वरदान?
हा विषय निबंधातच राहिला
वरदानापेक्षा शापच तिने,
काया-वाचा-मने अखंड साहिला
काळ जरी बदलला तरीही,संपणारच नाही तिचा त्रास
अडानी होती तेव्हा चूल आणि मूल,
आता शिकली तर गॅस आणि बॉस
काल असो की आज कोणत्याही काळी
अगतिकता लिहिलेली तिच्याच कपाळी
खुडली गेली कधी गर्भातच मग ती कळी
तर कधी कचराकुंडीत गेला तिचा बळी
अन्याय,अत्याचाराचे तिच्याच पदरी दान
गर्भात बीज सृजनाची,सक्ती की वरदान?
कायम तिलाच शिकवली गेली असंख्य बंधनांची भाषा
तिच्याचभोवतीच नेहमी का आखली गेली लक्ष्मणरेषा?
कायम तिच्याच डोक्यावर,इज्जत -अपेक्षांची मोळी
तिनेच का करावी नेहमी रंगीबेरंगी स्वप्नांची होळी?
भावनांच्या जाळ्यात अडकली जणू ती एक कोळी
सारे सहन करुनही नेहमीच का रिती तिची झोळी?
नको तिला तुमचा असला,औटघटकेचा हा गौरव
याच देही सहावा लागतो,बाराहीमास तिला रौरव
आज जागतिक महिला दिनी,भासे दीनच महिला 💐
जरी इतरांसाठी तिने,तिचा अख्खा जन्म वाहिला 🙏