२७ फेब्रुवारी रोजी कोकण कन्या एक्स्प्रेस ने आमचा प्रवास सुरू झाला. पाहिलं ठिकाण सावंतवाडी स्टेशन होत. २८ तारखेस सकाळी ८च्या सुमारास श्री. सोनुर्लीकर यांच्याकडे उतरलो. प्रातविधी व स्नानसंध्या आटोपून ग्रामदेवता श्री माऊली देवी ची ओटी भरून दर्शन घेतलं. नंतर मध्यान्ह भोजन करून त्यांचा निरोप घेतला आणि पुढे गोवा च्या दिशेने प्रयाण केले. सावंतवाडी बस डेपो वरून दुपारी १.१५ मिनिटांनी पणजी साठी बस मिळाली. दुपारी ३.०० पर्यंत आम्ही पणजी बस डेपो येथे पोहोचलो मग सिटी बस ने फोंडा येथे आलो. पूर्व सूचना दिलेली असल्यामुळे रत्नाकर उर्फ बाबा मामा बस स्टॉप वर घ्यायला आलेला. मीना मावशी न बाबा मामा यांनी आमचं सुहास्य वदनाने स्वागत केलं. चहापान आणि थोडासा आराम केल्यानंतर सायंकाळी स्वागत मांसाहारी उपहारगृह येथे रात्रीच्या भोजनास गेलो. दुसऱ्यादिवशी म्हणजे १/३/२०२३ रोजी सकाळी पूर्व नियोजित वेळेनुसार सीमा मावशी संजय काका आणि संज्योत सकाळी ११.०० पर्यंत आले. तोपर्यंत बाबा मामाने मासळी बाजारात जाऊन ३ ते ४ प्रकारचे मासे आणले होतेच मग काय आम्ही माश्यांचा यथेच्छ समाचार घेतला. दुपारी थोडी वामकुशी झाल्यावर संध्याकाळी देव दर्शनाचा कार्यक्रम ठरला. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आम्ही निघालो.श्री मंगेश, श्री.महालक्ष्मी, श्री.शांतादुर्गा देवतांच्या भेटी झाल्या. नेमकी दशमी असल्याने श्री शांतादुर्गा देवीच्या लालखी उत्सवाचा आनंद घेता आला. शेवटी रात्रीच भोजन करून आम्ही त्या दिवसासाठी निद्रिस्त झालो. २/३/२०२३ रोजी बाबा मामाची कार घेऊन गोवा भ्रमंती साठी निघालो. सेंट फ्रान्सिस यांचा जतन केलेला मृत देह पाहून झाल्यावर जवळच थोडीशी छोटी मोठी खरेदी केली. पुढील गतव्यस्थान पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेले श्री सप्तकोटिश्र्वराचे मंदिर होते पण त्यासाठी राईबंदर वरून बोट फेरी घ्यावी लागते तेव्हा आम्ही कार सकट बोटी वर शिरलो आणि दिवार बेटावर उतरून निसर्गसौंदर्य पाहत पाहत शेवटी पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेल्या सप्तकोटिश्र्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो. त्या उध्वस्त मंदिराचे अवशेष ही आपल्या समृध्द वास्तुशास्त्राचे दाखले देत होते. आम्ही बोट फेरीने पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. राईबंदर वरून पणजी च्या दिशेने प्रवास सुरू झाला. मध्ये शेर ए पंजाब रेस्टॉरंट मध्ये मध्यान्ह भोजन झालं आणि घराकडे येताना पुन्हा मंगेशी येथे येऊन श्री मंगेशाची परतीची भेट झाली. इतर खरेदी करत करत आम्ही सायंकाळी ८.०० च्या सुमारास फोंडा येथे घरी पोहोचलो. रात्री खिचडी पापड लोणचे असा सात्विक आहार घेऊन थोड्या गप्पा करत झोपून गेलो. ३/३/२०२३ रोजी सकाळी केकरे कुटुंबाचा निरोप घेऊन मांडवी एक्स्प्रेस ने मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला.
इति मंगेशसुत रचीत मुंबई - गोवा प्रवास वर्णन सुफळ संपूर्ण...