प्रिय मित्र, सतिशराव, सकाळ वृत्तपत्र वार्ताहर, शिर्डी
🙏 सप्रेम नमस्ते 🙏
वाळू तस्करीबद्दल आज फार निराशाजनक पोस्ट लिहीली आहे तुम्ही !!
ही पोस्ट वाचुन माझ्या भावी स्वप्नांचा चक्काचुर झालाय !! अगदी या जन्मीच्या उर्वरित भविष्यातील आणि पुनर्जन्मातील माझ्या मनसुब्याला ही वार्ता देऊन तुम्ही सुरुंग लावला आहे !!
खरंतर मला उमेदीमध्ये गुरु भेटला नाही... तसे झाले असते तर मी इंजिनियरिंग आणि एमपीएससी च्या फंदात पडुन डोक्याचा भुगा करुन नसता घेतला !! आजकाल वाळु वाल्याचा जो सुवर्णकाळ चालु आहे ते पाहुन माझा जीव तिळ तिळ तुटतो आणि मत्सरही वाटतो !! त्यांचा तो रुबाब, त्यांच्या गळ्यातील जनावरांच्या दावणीच्या साखळीपेक्षा जाड असलेल्या सोन्याच्या साखळदंडी माळा, मनगटाच्या जाडीपेक्षा जाड असलेले सोनकडे, सोन्याच्या काड्यांचा चष्मा, हिरे - सोनेजडीत पादत्राणे, भाळावर ठसठसीत उभा टिळा, हाताच्या दहाबोटातील अंगठ्या, दोन पायातील सोनकडी, सोन्याच्या कानबाळ्या, सोन्याचे घड्याळ आणि मोबाईल, तर्जनीत बेदरकारपणे गरगर फिरणारी चावी, उंची अत्तराचा घमघमाट आणि राजेशाही भरजरी वस्त्रे आणि हायफाय माॅडर्न अंगवस्रे, राजमहालात लाजवेल असे शाही निवासस्थान, कोटी किंमतीच्या गाड्या, वाऱ्यावर उडणारी केसांची अवखळ झुलके सावरण्यासाठी मानेला दिलेले स्टायलिश झटके, तोंडी तुंबलेले घुटके, राकट आणि दहशतीचा धारदार आवाज, शब्द अन् थुंकी झेलायला मागेपुढे करणारी राडा स्पेशल व भाईगिरीवाली गुलामांची सराईत टोळी, गावठी रिव्हालव्हरचे राउंड फायर, जग विकत घेईल असा ओसंडून वाहणारा आत्मविश्वास, टाटाबायबाय आणि वायफाय वाली जीवनशैली, सरीता किनाऱ्यावरून सरितेच्या महाली व पनवेलच्या पानवेलीच्या विळख्यात जागवल्या जाणाऱ्या त्यांच्या रात्री, तांबुस, तारवटलेले, नशिले, रंगेल, रगेल सताड उघडे डोळे, पंचतारांकित हॉटेलातील जेवणापासून ते थेट त्या हाॅटेलच्या मालकी पर्यंतचा त्यांचा प्रवास, थैल्यांसाठी कारभाऱ्यांची त्यांच्या दारी लागलेली रांग, आमचेच "तिकीट" घ्या म्हणून दारी ठाण मांडून बसलेले धोरणी धुरीण, पोलीस, महसुल आणि राजदरबारी त्यांचा असलेला मान सन्मान.... कोटीच्या कोटी उड्डाणे... अरे सतिश थकलो रे बाबा वर्णन करु करु !!! 😝 मीच धुंदफूंद झालोय !!
महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या धंद्याला मोजमापच नाही.... लांबी रुंदी खोली याला भारताच्या सिमांचीच काय ती मर्यादा !! त्यांच्यावर खटले चालत नाही, एफ आय आर होत नाहीत की चौकशी होत नाही... त्यांना बहुतेक घटनात्मक संरक्षण असावे असा दाट संशय मला येतोय!! जेंव्हा केंव्हा मी साईबाबा किंवा अन्य देवाच्या दर्शनाला जातो तेंव्हा, "पुढील जन्मी मला वाळु सम्राट किंवा वाळु महर्षी कर" अशीच प्रार्थना करतो !! 😝 ही सन्मान व आदरार्थी संबोधन मी मुद्दाम मागितले आहे !! 😝 तुम्ही मिडीयावाले वाळु तस्कर वा माफिया म्हणून जो तुच्छता दर्शक भाव व्यक्त करता त्याने माझ्या काळजात चर्र होते.. हा अपमानजनक, निंदाजनक आणि असंसदिय शब्दप्रयोग करु नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे !!
सतिशजी... तुमचा वट आहे अन् नावगावही आहे त्यामुळे हे संभ्याव्य संकट टाळता येण्यासाठी काही प्रयत्न करता येतील का ते बघा !! होत असेल तर समक्ष भेटु.. बाकी तुम्ही म्हणाल तसं होईल काळजी नसावी!! 😝 एकदा हे झालं तर सोन्याच्या विटात बंगला बांधुन देईल... सोन्याचे कपडे करीन... वरती सोन्याचा पेन अन् सकाळ वृत्तपत्राचे मालकी हक्कही देईल.... जमलं तर या जन्मी नायतर पुढच्या जन्मी तर नक्कीच !!! पक्का वायदा..बिनधास्त र्हावा!! 😝
या जन्मी वाळू महर्षी न होऊ शकलेला तुमचा अभागी पामर मित्र पण पुनर्जन्मात तुमचा भाग्यविधाता असलेला
श्री उत्तमराव निर्मळ
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
जलसंपदा विभाग🙏