Bluepad | Bluepad
Bluepad
संत गाडगे महाराज जयंती
Uttamrao Nivrutti Nirmal
Uttamrao Nivrutti Nirmal
12th Mar, 2023

Share

#संत_गाडगे_महाराज_जयंती
आज गाडगे महाराज यांची जयंती.. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.. 🙏
संत गाडगे महाराज यांनी अंधश्रध्दा, दैववाद, कर्मकांड, समाजविघातक चालीरिती यावर शेलक्या शब्दात प्रहार केला...त्यांच्या किर्तनात सच्चेपणा आणि रोखठोकपणा होता... वास्तववादी विचार होता.. कुठल्याही भाकडकथा नव्हत्या... मानवी जीवनमुल्ये हाच त्यांच्या किर्तनाचा गाभा होता... मनुष्याचा अंतर्बाह्य निर्मळपणा तसेच परिसर स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी सातत्याने भर देत त्यांनी समाजजागृती केली.. किर्तन करतांना जनसामान्यांबरोबर थेट संवाद साधत साध्या सोप्या भाषेत त्यांनी उपदेश केला... त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण किर्तनाची ही एक झलक ... 🙏
'एकखेप हात वरते करून म्हना.. गोपाल गोपाला.. देवकी नंदन गोपाल !!
हात बांधले काय तुमचे ?
हात वरते करा.. त्या बुवाले काय झालं ? भजन
काहून करत ना ? उभे राहा.. हे पाहा बाभलीचं खोड उभं राह्यलं....बसा खाली.
देवाचं भजन कायच्यासाठी करा लागते ?
कारन की मानसाच्या आंगात अभिमान हाये.. मानूस सोताले मोठा तिर्मखराव समजते,
हा अहंकार गेला पाह्यजे म्हनून भजन करा लागते.. तुकोबा म्हंतात,
ज्याचा अभिमान गेला
तुका म्हने देव झाला.. म्हना..'‘गोपाला.. गोपाला..'
'देवाचं नाव घ्याले पैसे पडत नाहीत, बगरपैशाची भक्ती होते, काही काही लोकं
देवाच्या नावानं लुटतात, कोनी म्हनते होम करा.. शांती करा.. पितराले दान द्या.. अमुक करा.. तमुक करा.. हे सगळी लूट व्हय.. याच्यातून देव भेटत नाही.. लुटनाराचं पोट भरते, हे लूट थांबली पाह्यजे म्हनून संतानं सोपा इलाज सांगतला.. नामस्मरण करा.. अहंकार गेला की मानूस परोपकारी होते, कोनी म्हनते देव भेटासाठी गुरू करा लागते, कायले पाह्यजे गुरू ? माहा कोनी गुरू नाही अन् माहा कोनी चेला नाही, तुकोबा म्हंतात,
तुका म्हने..
गुरूत्व गेले गुरवाडी...
पूर्वजाशी धाडी नरकवासी
काहून की समाजात काही काही लबाड गुरू आहेत, तुमाले पापपुन्याच्या कथा
सांगून भेव दाखोतात, जो गुरू होते त्यालेच भलकसा अहंकार असते, मी साधासुधा अळानी मानूस आहो, मी गावोगाव फिरलो.. नवस करनारे.. आंगात आननारे लोकं पाह्यले.. मनाले तळमळ लागली, घालमेल झाली की आपून हे करतो, हे बरं नव्हं,
लोकाइले शिक्षनाचं महत्त्व समजलं पाह्यजे..!!
आपून किती देव करून ठेवले ?
'तेहतीस कोटी'
'येतईबुवा, लखमाजी बुवा....मुंजाबा, आसरा खासरा, मरिआई, लखाई, म्हसुबा...
असे कितीक देव गावच्या बाहीर झाडाखाली
मांडून ठेवले !!
आता मले सांगा, हे जग कोन केलं ?
''देवानं'
'आकाश, समुद्र'
'देवानं'
'मंग ज्यानं एवढी मोठी धरती बनवली तो कोन्या झुडपाखाली लपून बशीन काय ?
'नाही'
'म्हनून देवळात देव नाही.... देऊळ बांधलं मानसानं....त्याच्यात देव बसोला मानानं....अन् हे येडचाप त्येलाच म्हणतंय....तुले निवद अन् नारळाचं तुकडं देतो... तेवढं खाय..
पण मले पाव !! ते देवळात एका जागी गारव्यात ढिम्म बसलंय अन् हे बावनाट त्येच्या भवती फेऱ्या मारतंय !! त्यो हु करीत नाही का चु करीत नाही !!!
तुकोबा म्हंतात,
तीर्थी धोंडा अन् पानी आहे,
तु देव रोकडा सज्जनी पाहे
तीर्थात देव नाही..
तीर्थात पंड्डे लुटतात....
तांब्याभर पान्याचे पंधरा रुपये.... बाप मेला की तो म्हनते नाशिकले जाऊन विधी करा.. त्याले दक्षना द्या..
बापहो, पुनर्जन्मावर माहा विश्वास नाही.. एकखेप मानूस मेला म्हनजे तो काही केल्या वापस येत नाही.. पुढचा जन्म कोनं पाह्यला ?
तुकोबा म्हंतात,
जन्म नाही रे हा आणिक,
तुका म्हने माझं भाकित !
जित्याजागत्या म्हताऱ्या मानसाले सोडून देतात अन् मेल्यावर पितराले जेऊ घालता ?
हा कोनता न्याय ?
आता मले सांगा,
तुम्ही सत्यनारायण करता
काय ?
''हो'
‘सत्यनारायण ही देवाची भक्ती नाही,
हा भटजीचा पोट भऱ्याचा धंदा हाय.. सत्यनारायनाच्या पोथीत असं हाय की कलावतीनं सत्यनारायण केला नाही म्हनून तिच्या नवऱ्याची नाव डुबली, अन् प्रसाद घेतल्यावर वरते आली.. हे खरं नाही, त्या सत्यनारायण करनाऱ्या भटजीबुवाले म्हना..
अडीच लाख रुपये घे.. अडीच कोट घे.. अन् समुद्रातली एखांदी आगबोट वरते आनून दाखोव.. ..ती वर येइन काय ?'
'नाही'
'लोकं गणपती बसोतात.. त्याच्या आरत्या
करतात.. त्याले जेऊ खाऊ घालतात... अन्
शेवटच्या रोजी कुठं टाकतात ? मोरया
मोरया करत पान्यात ! अरे ज्याच्या आरत्या केल्या त्यालेच पान्यात डुबून मारता ? हे कोनती भक्ती व्हय ? तुमच्यावर खटला भरला पाह्यजे.. हा फौजदारी गुन्हा हाये....... !!
म्हनून समाज सुधारला पाह्यजे..
शिक्षन साऱ्यात मोठी दवा हाये. उच्चशिक्षन घेतलं पाह्यजे.. मानूस जागृत झाला पाह्यजे.. जो मेंढी पाळत राह्यते तो कामातून जाते.. देवानं आपल्याले अक्कल दिली.. तिचा वापर केला पाह्यजे.. नाहीतर
तुका म्हने जलमला हेला अन् पानी वाह्यता वाह्यता
मेला.. बोला.. गोपाला गोपाला...'
समाजजागृती आणि समाजप्रबोधन करुन संत गाडगेबाबा यांनी महत्कार्य केले आहे....आपण या जयंतीनिमित्ताने त्यांनी दाखवलेल्या वाटेने जाण्याचा संकल्प केला तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ठरेल !!!
श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग
संत गाडगे महाराज जयंती

1 

Share


Uttamrao Nivrutti Nirmal
Written by
Uttamrao Nivrutti Nirmal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad