सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हेसाहेब यांना
प्रथम स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐
"...... नाही तर खोटी माहिती दिली म्हणून मला तूमच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करावा लागेल !! "
इति स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब....
सन १९९७ मधील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी मला दिलेला हा इशारा !!
¶मला कोपरगाव पाटबंधारे विभागात उप-अभियंता पदावर हजर होऊन सात महिने झाले होते...
गाडी रुळावर चालू होती पण वेग घेत नव्हती !!
"कोपरगावचे आमदार कोण?
तुम्हाला आमदार व्हायचे का ?
राजकारण करता का ?
विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून हलक्यात घेता काय" ? (तेंव्हा ते विरोधी पक्षाचे आमदार होते )
असल्या काही शेलक्या निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची स्वैर सरबत्ती साहेबांकडून यापुर्वी मी ऐकली होती !! बरं काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला तर "माजून घ्या" हे त्यांचे ठेवणीतले वाक्य कानी पडायचे....."माजून घ्या" म्हणजे "माझं ऐकुन घ्या"... या वाक्याचा साहेबांनी केलेला त्यांच्या स्टाईलमधील शाॅर्ट फार्म !!.... (आपापसातील बदलीला ते "खांदेपालट" म्हणायचे) .... मी जेंव्हा हा शाॅर्ट फार्म पहिल्यांदा ऐकला होता तेंव्हा तर माझी दांडीच उडाली होती !! आणि आता पुन्हा हे हक्कभंगाचे लफडे !!
¶हक्कभंगाचा विषय होता एका चारीबद्दल .... साहेबांनी फोनवरुन मला विचारले की, " २३ नंबरची चारी चालू आहे की बंद आहे" ?... दैनंदिन अहवालानुसार ती चारी चालु असल्याने मी चारी चालू असल्याचे त्यांना सांगितले... "तुम्ही खोटं बोलताय" असं दरडावणीच्या सुरात साहेबांनी उलट मलाच सुनावले !! मला खात्री असल्याने मी चारी चालू असल्याचे त्यांना पुन्हा पुन्हा ठासून सांगितले. पण साहेबांना पक्की खबर मिळाली होती. त्यामुळे "लोकप्रतिनिधीला खोटी माहिती रेटुन दिली म्हणून तुमच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणतो" असे म्हणत त्यांनी फोन आपटला !! तोपर्यंत "हक्कभंग" ही काय वनस्पती आहे, हे मलाही खोलवर माहीती नव्हते !! याबाबत मी जाणकारांकडून माहीती घेतली. उगीच भानगड नको म्हणून मी तातडीने २३ नंबर चारी गाठली... ती चालु होती !! मग ती बंद असल्याचे साहेबांनी ठामपणे का सांगितले, याचा शोध घेतला. निष्कर्ष माझ्या बाजूने असल्याने उजळ माथ्याने साहेबांची भेट घ्यायला गेलो... "चारीच्या वरच्या भागात असलेल्या एकाने आख्खी चारी आडवी केली. त्यामुळे खालच्या भागात पाणी बंद झाले. पाटबंधारे खात्याने चारी बंद केली असेल असा संशय खालच्या लोकांना आला. चारीच्या वरच्या भागात न जाता त्यांनी खालच्या खाली येऊन मला माहिती दिली",.... मी काही बोलायच्या आधी एका दमात साहेबांनी हे वर्तमान मला दिले... आणि "बोला तुमचं काय म्हणणं आहे यावर", असा वर मलाच प्रतिप्रश्न केला !! माझी हक्कभंगातून सुटका झाली याचाच मला मनोमन आनंद झाला होता. !! तर अशा रितीने माझ्यावर हक्कभंग येण्यापूर्वीच त्याचा भंग झाला !!
¶असे कितीतरी विषय आहेत की ज्यावरून साहेबांच्या विचारधारेची, कार्यशैलीची, कार्यक्षम प्रशासकाची , सामाजिक बांधिलकीची, जरबेची, धाडसीपणाची स्पष्टवक्तेपणाची, निर्भीडपणाची, प्रशासनावरील पकडीची, समयसूचकतेची, बहुआयामीत्वाची, बहुश्रुतपणाची, मुलगामी परिपूर्ण व्यासंगी अभ्यासाची पदोपदी जाणीव होत असे.....त्यांची आरपार रोखलेली भेदक नजर समोरच्याला निशब्द करत असे..... समर्पक उत्तर येत नाही आणि निरुत्तर होत नाही तोपर्यंत त्यांचे बाजूने समोरच्यावर प्रश्नांची फायरिंग चालू असायची !! साहेबांनी एखादे काम हाती घेतले की मग शेंडी तुटो की पारंबी तुटो, ते तडीस नेल्याशिवाय त्यांची माघार नसे किंबहुना माघार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता !! चुकीला माफी नाही हा त्यांचा पिंड होता !! साहेबांची मिटींग म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना घाम फुटत असे... दोन तीन दिवस जय्यत तयारी करुन सुध्दा ऐन मिटींगमध्ये "कार्यक्रम" होणे टळत नसे !! त्यामुळे सारे काही सुरळीत राहील यासाठी प्रशासन अष्टौप्रहर दक्ष असे.
¶महत्त्वाची बाब म्हणजे स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेबांच्या या कणखर, बेधडक आणि कठोर बाह्य चेहऱ्यामागे एक हळवा, मिष्कील, मायाळू , प्रेमळ, सांभाळून घेणारा, खुमासदार, दिलदार, दिलखुलास, जिंदादिल आंतरिक चेहराही होता !! एक सहृदय व्यक्तीमत्व त्यातुन नेहमीच डोकावत असे.
¶यथावकाश माझी आणि साहेबांची एकमेकांचा अंदाज घेत घेत चांगलीच जवळीक निर्माण झाली. माझ्यावरील दडपणाची जागा त्यांच्या ओढीने घेतली. साहेबांचा मुड कसा आहे याचा पुर्व अंदाज घेऊन मी साहेबांची कारखान्याच्या जुन्या विश्रामगृहात सिंचन विषयक परिपूर्ण माहितीसह निवांत भेट घेत असे....कारण ते कधी काय माहीती विचारतील याचा अंदाज नसे....खरेतर त्यांना सर्व माहीती असायची पण समोरच्याला किती माहीती आहे, तो किती जबाबदारीने काम करतोय, किती पाण्यात पोहतोय कि नुसताच पाय मारतोय याची परिक्षा घेण्याची त्यांची पद्धत असायची !! तेथे त्यांचेबरोबर बऱ्याचदा मेथीची भाजी आणि ज्वारी-बाजरीची भाकरी खाण्याचा योगही आले !!
¶..............असेच कधीतरी मुडमध्ये येऊन साहेबांनी त्यांच्या बालपणीच्या गंमतीजंमतीही सांगितल्या..... त्यातील या काही आठवणीची ही संक्षिप्त झलक........साहेबांनी जुनी आठवण सांगताना सांगितले की, "त्या काळी कोपरगावात गिरमेंची एकच सायकल होती. मला सायकल घ्यायची असल्याने गिरमेबरोबर अहमदनगरला निघालो... राहुरीला मुक्काम करुन अहमदनगरहुन सायकल घेऊन कोपरगावला आलो.... कोपरगावातुन सायकलची मिरवणूक काढली होती. मला आणि नवी सायकल पहायला आख्खा गाव लोटला होता...नवी सायकल खराब होऊ नये म्हणून मी तिला सुरवातीला फक्त हातात धरुन पायीच चालत असे !!... कोपरगावात तेंव्हा गिरमेची आणि माझी अशा दोनच सायकली होत्या !! "
¶........... असेच कधीतरी एकदा साहेबांनी सांगितले की,"तेंव्हा मी तेरा चौदा वर्षाचा असेल. घरातील धान्याच्या पोत्याच्या ठिक्कीच्या आणि भिंतीच्या मधल्या बोळीत मी अभ्यास करीत बसलो होतो... दळण करण्यासाठी घरातील कुणीतरी पोते ओढले आणि आख्खी ठिक्की माझ्या अंगावर पडली.. मी ओरडल्याने माणसे गोळा झाली आणि मला बाहेर काढले... आईने माझे अंग चाचपून मला धीर देऊन कुशीत घेतले.... सायंकाळी हे वर्तमान आमच्या वडीलांना कुणीतरी सांगितले. वडीलांनी मला धपाटे घातले अन् पुन्हा बोळीत गेला तर बघ म्हणून चांगलेच दटावले !! "असं सांगुन साहेब मला म्हणाले की माझे वडील तसे एकदम कडक, रागीट आणि जहाल होते.. जसे जमदग्नीचा अवतारच !!".... माझ्या पार ओठांवर आले होते, "साहेब, आपण तर वडीलांच्या एक पाऊल पुढेच आहात" !! .... अर्थात मी हे मनात म्हणालो..... उघडपणे म्हणायची काय बिशाद होती माझी !!
¶.............असेच एकदा त्यांनी सांगितले की, "वैजापूरकडे त्यावेळी जाणाऱ्या रस्त्यानजीक आमची शेती होती.. सायंकाळी पाचची वेळ असेल... मी शेतावर गेलो.. शेतातील गडी उसात पाणी भरत होता. काही कारण नसताना मी उगीचच विहीरीत डोकावून पहात असतांना पाय घसरुन विहीरीत पडलो... जवळपास कुणीच नसल्याने ओरडूनही कुणी लवकर आले नाही.. दरडीला धरुन कसाबसा आधार घेतला... रात्री आठ वाजता वैजापूरला जाणाऱ्या वाटसरुंनी माझा आवाज ऐकुन शेजाऱ्याकडून खाट आणली. तिला दोर लावुन विहीरीत सोडुन मला वर काढले व येसगावच्या आमच्या घरी आणले. वडीलांनी घडलेला सर्व प्रकार ऐकून घेतला... सर्वजण मी वाचलो म्हणून मला सहानुभूती दाखवत होते... गोंजारत होते.. पण वडीलांनी मला रट्टयांचा चांगलाच प्रसाद दिला.. ' तुला हज्जारदा सांगितले की एकटा विहीरीकडे जाऊ नकोस म्हणून ... सांगून समजत नाही का ?, परत आगाऊपणा केला तर माझ्याशी गाठ आहे, असे म्हणत माझा चांगलाच समाचार घेतला ' !!
¶स्वर्गीय कोल्हेसाहेबांच्या स्मृतीदिन निमित्ताने अनेक आठवणी मनःचक्षुसमोर तरळत आहेत... त्यांचे शब्द आजही कानी घुमताहेत... परखडपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. जे पोटात असायचे तेच त्यांच्या ओठात असायचे. उमदे आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व असुनही एक खेळकरपणा, खोडकरपणा, अवखळपणा त्यांच्या स्वभावात होता.....वेळप्रसंगी नर्मविनोदी शैली तर कधी दरडावणीचा स्वर हा त्यांचा स्वभाव विशेष होता. दिलखुलास खळखळून हसणे आणि जिंदादिली ही त्यांची विशेषता होता. त्यांच्या हसण्यातही एक धाक असायचा !!
गणेश कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर संमती, एकमती, सर्वानुमती आणि सहमती यातील सुक्ष्म अर्थभेद त्यांनी सोप्या भाषेत मला समजावल्याचे आठवतेय. कोरपडीचे गर कसे कापावेत याचे प्रात्यक्षिक मला दाखवत असतांना हा संवाद झाल्याचे माझ्या आजही स्मरणात आहे. एखाद्याला पहाता क्षणीच त्याचा कस, दम, अंदाज आणि खोली जोखण्यात त्यांचा हातखंडा होता...त्यांची पारखी नजर समोरचा माणूस किती अभ्यासू आहे वा किती खरा आहे वा खोटा आहे, थापाड्या आहे याचा अचुक वेध ते पहिल्या दोन तीन मिनटातच घेत असत!! समोरच्या व्यक्तिच्या बोलण्यात काही बनवेगिरी वा विसंगतपणा चालूपणा दिसला तर मग झाडाझडतीचे जे, सिक्स फोर सिक्स फोर चालायचे त्याची मोजदाद नसायची !!
एकदा एका अधिकाऱ्याला, "अरे मी तुला हिरा समजत होतो, तु तर गारगोटी निघाला, बदलीचे पत्र घे, बदली करुन तोंड काळं कर इथून", असे तोंडावर खडसावले होते !!
चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट, असा त्यांचा थेट हिशोब असायचा !!
एका कामासंदर्भात , "दोन तीन महिने मंत्रीपद आहे तोपर्यंत कामं करा.... हा माझा शेवटचा फोन !! " असे मंत्र्याला थेट सुनावण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही !!
"बैल मारकुटा हाये पण कामाला लई चपळ अन् खात्रीचा हाये , उभी तासं मारतो पण आडतासं पण जोरात हाणतो, ते बी बांध वरंबे शाबूत ठेवून.... उभाट्या हाकायला तर जोड नाही बघा !! ", असे त्यांच्यावर मनापासून निस्सीम प्रेम करणाऱ्या एकजणाने, चर्चेच्या ओघात खास ग्रामीण शैलीतील मोजक्या शब्दात साहेबांचे गुणवर्णन केले होते !!
साहेबांना सर्वच स्तरांतून प्रेम मिळाले...जे अभावानेच कुणाला मिळते. सहकार, शिक्षण, कृषी, साखर उद्योग, कृषी पुरक उद्योग या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली.. सहकारमहर्षी या नावाला त्यांनी अर्थ प्राप्त करुन दिला !! मी भाग्यवान आहे की मला त्यांच्या कार्यकाळात काम करायची आणि घडण्याची संधी मिळाली... पुन्हा असा सहकारमहर्षी होणे नाही !!
स्वर्गीय शंकररावजी कोल्हेसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना मी व माझ्या परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन 💐 💐 💐
श्री. उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार
मो. 7276772400