Bluepad | Bluepad
Bluepad
किशोरबापू सुर्यवंशी.. एक अधुरी कहाणी !!
Uttamrao Nivrutti Nirmal
Uttamrao Nivrutti Nirmal
12th Mar, 2023

Share

¶ सन १९९८ - ११ मार्च ते सन २०२३ - ११ मार्च.... आज २५ वर्षे होताहेत किशोरबापू सुर्यवंशीसाहेब , कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक, जलसंपदा विभाग, यांना जाऊन.... मात्र अजूनही त्यांच्या स्मृती ताज्याच आहेत... तोच आवाज, तीच साद, तोच उन्मेष, तीच प्रसन्नता, तोच खळाळता उत्साह, तीच ऋजूता तोच स्नेहभाव नजरेत आणि हृदयी जशाच्या तसा आहे !! का कोण जाणे अजुनही त्यांचा आवाज कानी पडेल, कामाची माहिती घेतील , मी बघुन घेईल तुम्ही बिनधास्त जा... असे काही तरी ऐकायला मिळेल !! दिनांक ११ मार्च १९९८ ( १३ मार्चला होळी होती ) हा दिवस काही अशुभ वर्तमान घेउन येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. याच दिवशी स्वर्गीय किशोर सुर्यवंशी यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले.
¶जलसंपदा विभाग एका उमद्या, हुषार, कार्यक्षम, सुस्वभावी, उत्साही सुसंस्कृत, संयमी सुसंवादी अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास मुकला. अधिकारपदाचा अंगी संचार होउ न देता परिचित अपरिचित, लहान मोठा गरीब श्रीमंत अशा सर्वच पातळीवर संवाद साधून आत्मियतेने मदत करण्याची, त्यांच्यात अंगभूत प्रेरणा होती. समोर येणाऱ्या प्रत्येकातील चांगले बघा, वाईट दुर्लक्षित करा, शक्यतो चांगलेच करा, नसेल शक्य तर काहीच करु नका, मात्र वाईट कुणाचेही करु नका, जीवनाचे हे सुत्र ते प्रत्यक्ष जगत होते. कंटाळा, त्रासिकपणा, उदासीनता, चालढकल, कार्यालयातील लाल फित हे त्यांच्या आसपासही दिसायचे नाही. व्यक्ति म्हणुन तर ते आदर्श होतेच पण अधिकारी, कुटुंबकर्ता, समाजसेवक म्हणूनही त्यांची योग्यता फार मोठी होती. आपपर भाव नसलेला त्यांचा स्वभाव, आरपार पारदर्शक, स्वच्छ, निर्मळ होता. एकदा त्यांच्या सानिध्यात आलेली व्यक्ती त्यांचीच होऊन जात असे. जे खरे असेल ते खुलेपणाने स्पष्ट सांगण्याचा त्यांचा स्वभाव होता. अर्थात ते कुणाला किती समजले हे देवच जाणे. माणूस असताना त्याच्यातील मोठेपणा समजून घेण्याची आपण अंमळ कंजुषीच करतो किंबहुना तशी प्रवृत्ती असतेच. पडद्याआड झाल्यानंतर एखाद्याची योग्यता समजते.. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. कोठल्याही मोठेपणाच्या अपेक्षेच्या पलीकडे गेलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कामासाठी दिवसाचे २४ तासही तसे कमीच पडावयाचे. मात्र मी काही वेगळे करतो ही भावना त्यांना कधीही शिवली नाही. कोणत्याही बिकट परिस्थितीत ते इतके स्थितप्रज्ञ असत कि त्यांच्या नुसत्या सान्निध्यानेही समोरच्यांना उर्जा मिळून कामे फत्ते होत असत. कुणावर न रागावताही कामे करुन घेण्याची त्यांची हातोटी अफलातून होती. कामाचा कितीही ताणतणाव असो किंवा एखादा कसोटी पहाणारा प्रसंग असो, हलक्या फुलक्या पध्दतीने तो विषय हाताळुन, तो समोरच्याला पटवून देण्याची त्यांची कौशल्य अप्रतीम होते. अंतर्यामीची घालमेल, बेचैनी, अस्वस्थता याचा त्यांच्या हसतमुख चेहऱ्यावर मागमूसही नसे...ना आम्हाला कधी जाणवला !!
¶कार्यालयीन कामाव्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असे मग ते अनाथाश्रमातील असो, आदिवासी क्षेत्रातील असो, साहित्यिक क्षेत्रातील असो,
संघटनात्मक पातळीवर असो वा शैक्षणिक क्षेत्रातील असो, कोणतेही क्षेत्र त्यांना वर्ज्य नव्हते. त्यांना वयाचे बंधन नव्हते. स्वर्गीय किशोरबापू किशोरांबरोबर किशोर होऊन जात असत. एखाद्याचे काम करण्यासाठी किंवा अडचणी निवारणासाठी त्यांचेबरोबर ओळख असो वा नसो, कार्यक्षेत्रातील असो वा नसो सर्वांसाठी त्यांचे दरवाजे खुले असत... आणि यथोचित ठिकाणी संपर्क करुन काम मार्गी लावत असत. अधिकाऱ्याच्या चिरपरिचित प्रतिमेला छेद देणारा त्यांचे काम होते... जो जो त्यांच्या संपर्कात येई तो तो कायमसाठी त्यांचाच होऊन जात असे. काही वेळा असंही वाटतं की इतकंही चांगलं असे नये कारण त्यात दृष्ट लागण्याचा धोका जास्त असतो, असंच वाटु लागलंय मला !!
¶त्यांच्या नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी
अभियंताच्या कार्यकाळात मला कोपरगाव येथील पाटबंधारे उपविभागात उप अभियंता म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आज २५ वर्षे झाली असली तरी त्यांचा फोन वरील " बोला"
हा आश्वासक आवाज, आणि त्यावर, " वैजापूर तलावासाठी आणखी चोवीस तास दारणा धरण चालू ठेवा" या माझ्या मागणीवर, परवापर्यंत पाणी तलावात पोहचेल ; " निर्मळ, I will give you last golden drop of water, carry on" हा माझा आत्मविश्वास जागवणारा, दि. ११ रोजी सकाळी सहा वाजता (रात्री दोन वाजता मुंबईहून येऊनही ते सकाळी सहा वाजता हरसुल येथील लघु पाटबंधारे तलावाच्या तपासणीला जाण्याची तयारी करत होते.) झालेला हा शेवटचा संवाद अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. त्याच दिवशी त्यांनी उप-अभियंताची सकाळी अकरा वाजता, नाशिक पाटबंधारे विभागात बैठक बोलावली होती...दुर्दैवाने हरसुल येथील अतिरिक्त कार्यभार असलेल्या लघु पाटबंधारे तलावाच्या तपासणी साठी गेले असतांना सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान हार्ट अ‍ॅटॅकने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले... दिनांक ११ मार्च १९९८ ला सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्यांचा तो सतेज असलेला अचेतन देह, देवळा या त्यांचे गावी पंचतत्वात विलीन झाला. आम्ही बैठकीसाठी नाशिक पाटबंधारे विभागात आलो होतो. परंतु दुर्दैवाने त्यांची भेट सिव्हिल हॉस्पिटलमधे झाली, कि जीची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. स्ट्रेचरवरील त्यांचा निष्प्राण देह बघण्याचा दुर्धर प्रसंग आमच्यावर ओढवला... सारे काही एका क्षणात संपले होते !! देवळा येथे सायंकाळी पाच वाजता त्यांना शेवटचा निरोप दिला.
¶स्वर्गीय किशोर सुर्यवंशीसाहेबांनी ११ तारखेला सकाळी ६ वाजता सांगितल्याप्रमाणे परवा, म्हणजे दि. १३ मार्चला पाणी वैजापूरला पिण्यासाठी असलेल्या तलावात पोहचले होते...तलावात जाणारे पाणी मी विमनस्क स्थितीत शुन्य नजरेने मी पहात होतो.. सवईप्रमाणे त्यांना रिपोर्टींग करावे म्हणून मोबाईलवर हात गेला... बटनही दाबले गेले... परंतू "The person you are calling is out of of coverage area" हे कानी पडताच मी वास्तवात आलो !! डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या गेल्या... एका उमलू पहाणाऱ्या प्रभावी व अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाला
अकाली चिरशांती घ्यावी लागली.... आता पुन्हा कव्हरेज क्षेत्रात कधीच येणे होणार नाही !! ते खळाळून हसणे होणार नाही, हे कटू सत्य स्विकारावे लागले....वर्तमान आठवणींच्या गाठोड्यात बेमालूमपणे गेलाय... परंतु आजही "तो" ११ मार्च जशाचा तसा घेरतो आहे... अस्वस्थ करतो आहे.... कसले ऋणानुबंध असतील माहित नाही पण ते आहेत हे मात्र नक्की ! अनेकांच्या ह्रदयांची धडधड वाढवून त्यांच्या ह्रदयाची धडधड कायमची थांबली गेलीय !!
RIP....Return If Possible... waiting for you sir !!!!
स्वर्गीय किशोरबापू सुर्यवंशी यांच्या या २५ व्या स्मृतीदिनी त्यांना भावपूर्ण विनम्र श्रध्दांजली 🙏
¶श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार.
किशोरबापू सुर्यवंशी.. एक अधुरी कहाणी !!

1 

Share


Uttamrao Nivrutti Nirmal
Written by
Uttamrao Nivrutti Nirmal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad