होळी आणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 🙏
होळी-होलिका-हुताशनी-फाल्गुनी-शिमगा अशा नावांनी ओळखली जाणारी होळी भारतभर सर्वांची प्रिय!
तिच्या उत्सवांची नावंही धूलिपर्वोत्सव-वसंतोत्सव-दोलोत्सव-शिमगोत्सव-रंगोत्सव-मदनोत्सव-मधुमहोत्सव
अशी एकसे एक रंगतदार!
होळी भारतभर विविध नावांनी, विविध रूपांत साजरी होते, तशीच आपल्यालाही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती अधिक उमगत जाते आणि हलके हलके तिचे एकेक रंग मनावर चढत जातात...!!
माघ सरता सरता येणारी शिवरात्र "शिव शिव" म्हणत थंडीला गुंडाळून घेऊन जाते व नंतर फाल्गुनात येणार्या होळीला विझवायला पाऊस येतो, हे लहानपणापासून मनावर पक्कं ठसलेलं गणित... !!
होळीच्या दिवशी आपल्या सर्व दुर्गुणांची अमंगलाची, वाईटाची, पशुत्वाच्या शिल्लक खाणाखुणांनी यादी करा अन् होळीत टाका.... अगदीच ज्यांच्या जिभा शिवशिवतात त्यांनी होळीसमोर बडबडुन, बोंबा मारुन काय ते एकदाचे ओकून टाका.
मग वर्षभर घरात, गल्लीत, चौकात शिव्या किंवा अभद्र असे काहीच उच्चारायचे नाही !!
अमंगल घाणीचा निचरा करण्यासाठी किती साधी सरळ व्यवस्था केली आहे ही !!
सणावाराच्या निमित्ताने निसर्गातल्या बदलत्या रूपाचं या उत्सवाशी असलेलं नातं समजून घ्यायचं असतं....
फाल्गुनात तयार होत आलेलं धान्य अग्नीला अर्पण करायचं होळीच्या दिवशी...
होळी म्हणजे नवान्न अर्पण करण्याचा यज्ञच तो !! हाती येऊ घातलेला घास निसर्गाच्या कृपेने काहीही विघ्न न येता ओठापर्यंत पोहोचावा, याकरता करण्याची ती पूजा...‘नवान्नेष्टि यज्ञ’ असं त्याचं वैदिक काळातलं संबोधन....‘वासन्ती नवसस्येष्टि’ हे आणखी एक सुंदर नाव आहे या सणाला !!
चैत्र पाडव्याला सुरू होणार्या नवीन वर्षाच्या स्वागताकरता, नवे संकल्प लिहिण्याकरता आपल्या मनाची पाटी कोरी करायची, म्हणून या दिवसात जुनं वैर, शत्रुत्व, राग, ईर्षा, अपमान सारं विसरायचं. सारे दोष, नकारात्मक विचार, सारं काही त्या सर्वभक्षक, पावक अग्नीत स्वाहा करायचं नि मोकळ्या मनाने, नव्या उमेदीने जीवनाला कवेत घ्यायचं !!
आज होळीला आलेलं विकृत रूप पाहिलं की मन सैरभर वाटते...फक्त इव्हेंटचं स्वरुप आलंय या सणाला.....
सांप्रतकाळी तर वर्षभर होळी आणि रंगाचे शिंतोडे उडवत रंगढंग केला जात असल्याचे सर्वत्र दिसतेय !! आपल्याला दुर्गुणांची होळी करायचे हे विसरून, आपण सद्गुणांचीच होळी करायला लागलोय, याचेही कुणाला भान राहिलेले नाही !! "संस्कृतीचं रक्षण" करायचं असेल तर प्रथा परंपरा व त्यामागील कार्यकारणभाव समजून घेतला पाहिजे....
निसर्गाचा बदल ओळखला पाहिजे...!!निसर्गाशी जोडलेले नाते समजून घेतले पाहिजे !!
मात्र अलीकडे तर संस्कृतीची व्याख्याच बदलली जातेय आणि सारे काही विसंगत होऊ राहिले आहे !!
रंग न जाणती जात अन् प्रांत-भाषा !
उधळुणी रंग जागवु इच्छा-आकांक्षा !!
आणि शेवटी एकच....
स्वतःचे रंग रंगवताना
इतरांची चित्रं बिघडणार नाहीत,
त्यावर शिंतोडे उडणार नाहीत
याची जमेल तितकी
काळजी घेतली की
मग रंगाचा भंगही होणार नाही
आणि
आपले रंग देखील छान खुलतील …!!!!
फार काही नको, किमान एवढे जाणले तरी बस्स्ं !!
सोप्पं आहे हे, जमेल सहज !!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा .......🙏 🙏
सौ. सुनंदा व श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार