संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज ( सन१६०८-१६४९ ) यांची आज बीज...म्हणजे फाल्गुन कृष्ण द्वितीया... "धुळवडीचा" दुसरा दिवस !! त्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम.🙏🙏 🙏
संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांवर, थोतांड, समाजविघातक प्रवृत्ती, पाखंडीपणा, भाकडकथा, कर्मकांड, दुष्ट चालीरीती, भोंदूगिरी, जातीपातीतील उच्चनीचतता आणि धर्माच्या तथाकथित स्वयंघोषित धर्ममार्तंडांची कुटील निती यावर परखड भाष्य केले. त्यांनी सांसारिक, पारमार्थिक जीवनातील सुखासमाधानाचा भक्तीमय मार्ग दाखवला. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ, अहंकार या दुर्गुणांवर मात करण्याचा अभंगाच्या माध्यमातून गुरुमंत्र दिला.
संत तुकाराम महाराजांनी विठोबाची मनोभावे पूजा केली . आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं. संत तुकाराम महाराज विठ्ठलमय झाले होते. त्यांना प्रस्थापितांविरोधात प्रखर संघर्ष करावा लागला. त्याचे प्रतिबिंब अभंगात दिसून येते. संसारीक असूनही ते वैराग्य अवस्थेत पोहचले होते.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा उपदेश सार्वकालीक आहे... त्याची ही झलक !!
टिळा टोपी उंच दावी ।
जगी मी एक गोसावी ।।१।।
अवघा वरपंग सारा ।
पोटी विषयांचा थारा ।।२।।
मुद्रा लाविती कोरोनी ।
मान व्हावयासी जनी ।।३।।
तुका म्हणे ऐसे किती ।
नरका गेले पुढे जाती ।।४।।
थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसुद बोलणे
हि संवादकला |
शब्दांमध्ये झळकावी
ज्ञान, कर्म, भक्ती, स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द ||
शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल, शब्दांचे हे जंगल, जागृत रहावे |
जीभेवरी ताबा, सर्वसुखदाता, पाणी, वाणी, नाणी नासु नये ||
आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने !
शब्दांची शस्रे यत्न करू !!
शब्द ची आमुच्या जीवाचे जीवन !
शब्द ची वाटू धन जनलोका !!
बाप मेला न कळता ।
नव्हती संसाराची चिंता ।।१।।
विठो तुझे माझे राज्य ।
नाही दुसऱ्याचे काज ।।धृ।।
बाईल मेली मुक्त झाली ।
देवे माया सोडविली ।। २।।
पोर मेले बरे झाले ।
देवे माये विरहित केले ।। ३।।
माता मेली मज देखता ।मदत
तुका म्हणे हरली ।। ४।।
आम्ही ज्याचे दास ।
त्याचा पंढरीये वास ।।१।।
तो हा देवांचाही देव ।
काय कळीकाळाचा भेव ।।२।।
वेद जया गाती ।
श्रुती म्हणती नेती नेती ।।३।।
तुका म्हणे नीज ।
रुपडे हे तत्त्वबीज ।।४।।
असा मौलीक उपदेश करणारे संत तुकाराम महाराज सहज सांगतात...
जे का रंजले गांजले |
त्याशी म्हणे जो आपुले ||
तोचि साधु ओळखावा |
देव तेथेची जाणावा ||
या साऱ्या अभंगाचे निरुपण आणि दृष्टांत देऊन शतकानुशतके किर्तन प्रवचन या माध्यमातुन समाजाला बोधामृत दिले जात आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अध्यात्मिक उर्जास्रोत असलेले ज्ञानेश्वर माऊली असोत वा अन्य संतगण असो, श्रीराम असो वा श्रीकृष्ण असो, ऋषी मुनी असो वा थोर तपस्वी असो असे कितीतरी महात्मे असतील ज्यांना सदेह वैकुंठास जाण्याचा योग आला नाही. परंतु स्पष्टवक्ते, वर्मी घाव घालुन मर्मावर बोट ठेवणारे, तत्कालीन धर्ममार्तंडांच्या मक्तेदारीवर आणि भोंदुगिरी तसेच कर्मकांडावर प्रहार करणाऱ्या आणि त्यांच्याशी पंगा घेणाऱ्या संतश्रेष्ठ जगत्गुरु तुकाराम महाराजांनाच फक्त सदेह वैकुंठास जाण्याचे भाग्य (? ) का मिळाले, याबाबत मात्र सुसंगत, सुस्पष्ट, विज्ञानाधिष्ठीत, वस्तुनिष्ठ, वास्तविक, निरुपण वा समर्पक दाखले कधी कानी पडले नाही, याची खंत आजही आहे !!
श्री उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार