Bluepad | Bluepad
Bluepad
यशवंतराव चव्हाण जयंती १२ मार्च २०२३
Uttamrao Nivrutti Nirmal
Uttamrao Nivrutti Nirmal
12th Mar, 2023

Share

#यशवंतराव_चव्हाण_जयंती_१२_मार्च
¶ महाराष्ट्रात अलौकिक नेत्यांच्या मालिकेत यशवंतरावजी चव्हाण यांचे स्थान खूपच वरच्या पातळीवर आहे, किंबहुना नेहरू-युगांतील महाराष्ट्रीयन नेत्यांत ते अग्रगण्यच होते..... कोणी बुद्धीने ज्येष्ठ असतील, कोणी शक्तीने श्रेष्ठ असतील, परंतु शक्ति-युक्ति ज्यांच्या ठायीं एकत्र आहे, असे ते एकमेव होते आणि म्हणूनच ते लोकनेते झाले.
¶बुद्धिवादी, पुरोगामी महाराष्ट्रांत नेतृत्व करणें ही सोपी गोष्ट नाही. येथे सारेच मानदंड उंचावलेले असतात. त्यामुळे अशा महाराष्ट्राचें प्रदिर्घ काळ एकमुखी नेतृत्व त्यांनी केले आहे, यांतच त्यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची साक्ष मिळते. सुसंस्कृतपणा, सर्वांप्रती आदरभाव, सर्वसमावेशकता, विकासात्मक दृष्टीकोन, संघटन कौशल्य , नैतिकता, ऋजुता, चतुरस्रता, अष्टावधानी, गुणग्राहकता, प्रगल्भता या साऱ्याच गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी आदी विविध क्षेत्रात अमिट ठसा उमटविला आहे.
¶ कृषी - औद्योगिक क्षेत्रात महत्वाकांक्षी निर्णय घेऊन समाजाचा आर्थिक स्तर उंचावलाच, आणि पर्यायाने त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासास मोठी गति दिली. सहकारी क्षेत्रास त्यांनी दिलेल्या गुरुमंत्रामुळे महाराष्ट्राच्या किती तरी भागाचें आज नंदनवन झालेलें दिसते आहे. प्रगतिशील शेतकरी, सहकार-महर्षि, साखर-सम्राट या सा-या नामाभिधानांचे श्रेय केवळ यशवंतरावांच्या दूरदृष्टींत आहे. यशवंतराव हे एकच असे नेते असतील की, सा-या जाति-जमातींचे लोक त्यांना मानतात, त्यांच्याबद्दल प्रेमभाव बाळगतात. आपल्या स्थिर आणि सम्यक स्वभावाने त्यांनी टिकाकारांनाही आपलेसे केले. सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर हा खरेतर सर्वांसाठी एक आदर्श वस्तुपाठच म्हणावा लागेल.
¶ यशवंतरावजी चव्हाण यांनाही तत्कालीन परिस्थितीत विरोधकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी त्यास सामोरे जाताना सुध्दा विरोधकांचा सन्मानच ठेवला. त्यांच्या आत्मसन्मानास कधीच ठेच पोहचवली नाही. संघर्षाचे पडसाद व्यक्तीगत पातळीवर कधीच आणले नाहीत. यशवंतरावजी चव्हाण यांचे संपुर्ण जीवन म्हणजे, लोकशाहीचा आब आणि गरीमा कसा ठेवावा, याचा वस्तुपाठच आहे. ते स्वतःच याचे विद्यापीठ होते त्यामुळेच आजच्या पार्श्वभूमीवर त्यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे.
¶ यशवंतरावजी चव्हाण यांचा देवराष्ट्रे या एका खेडेगावातील सर्वसामान्य कुटूंबातून सुरु झालेला प्रवास, दिल्लीच्या वर्तुळात स्वतःचे एक आगळे वेगळे स्थान निर्माण करते झाला. त्यांचे कार्यकर्तृत्व इतिहासात सोनेरी अक्षराने लिहीले गेलेय, यातच त्यांचे बहुआयामीत्व आणि अलौकिकत्व दिसून येते.
🙏 साहेब....तुम्ही काल होतात पण आजही आम्हाला तुमची तितकीच गरज आहे....का कोण जाणे उद्या तर यापेक्षाही जास्त गरज भासणार आहे, असं वाटतंय !!!
🙏 हवे होतात आपण, स्वातंत्र्य , स्वैराचार, सहिष्णुता यांचे अर्थभेद समजावण्यासाठी !
🙏 हवे होतात आपण, इतिहासजमा झालेल्या साधनशुचितेचे धडे देण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, सरत्या वैयक्तिक आणि सामाजिक मुल्यांना सावरण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, घरची शिदोरी खाऊन समाजसेवेचे व्रत सांगण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, मुद्दे आणि गुद्दे यातील फरक समजावण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, सुसंस्कृत व सुमंगल आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, आम्हाला सुसंस्काराची शिकवणी देण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, रंग उडालेल्या राजकारणात मानवतेचे, संवेदनशीलतेचे, सहृदयतेचे, समाजाभिमुखचे परिपक्वतेचे, समजदारीचे, समर्पणाचे, निस्वार्थतेचे न उडणारे रंग भरण्यासाठी !!
🙏 हवे होतात आपण, आमची कालौघात हरवलेली ओळख देण्यासाठी !!
¶ आजच्या या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्राच्या या लोकोत्तर थोर सुपूत्रास विनम्र अभिवादन 💐 💐 💐 💐 💐
......... श्री. उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग.
यशवंतराव चव्हाण जयंती १२ मार्च २०२३

1 

Share


Uttamrao Nivrutti Nirmal
Written by
Uttamrao Nivrutti Nirmal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad