महानगरी या राज्यात एक कथानगरी नावाचे गाव आहे. तर या कथानगरी गावात नेहमी काहीना काही घडत असते आणि यावेळी असे घडले आहे की कथानगरीत चोर आला आहे. तर मित्रांनो वाचूया या कथानगरीतील चोरीची कथा
कथानगरीत सर्वप्रथम रामा नावाच्या ग्रामस्थाच्या घरात चोरी होते. रामा आपल्या घराला कुलूप वगैरे लावून आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेलेला असतो, घरात कुणीही नसते. सकाळची वेळ होती. रामाच्या शेजारी राहणारे लोक सकाळी उठले, सकाळी उठल्यावर लोकांना रामाच्या घराचा दरवाजा उघडाच दिसला. त्यांना वाटले की रामा बहुतेक गावाहून आलेला आहे त्यामुळे ते पाहण्यासाठी रामाच्या घराकडे जातात. रामाच्या घरात गेल्यावर त्या लोकांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसते, हे पाहून ते चलबिचल होतात. घरात पीठाचे, तांदळाचे डबे विस्कटलेले दिसतात, घरातील पत्राच्या पेटीचे कुलूप तोडलेले होते. घरातील विस्कटलेले सामान पाहून लोकांच्या लक्षात आले की रामाच्या घरात बहुतेक रात्री चोरी झाली असावी. रामाच्या घरात चोरी झाली हे अख्या कथानगरीला कळते. झालेली चोरी पाहण्यासाठी कथानगरीतील लोक रामाच्या घराच्या अवतीभवती जमा झाले. काही वेळानंतर रामाच्या घरापाशी कथानगरीचे सरपंच आप्पासाहेब आले. सरपंचांनी रामाच्या घराची अवस्था पाहिली, त्यांच्या ही लक्षात आले की रामाच्या घरात चोरी झालेली आहे. काही लोकांनी सरपंचाला जाब विचारला. कथानगरीत चोरी अशी कशी झाली, कथानगरीच्या सुरक्षेतेचा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला.
रामाच्या घरात चोरी झाल्यानंतर सरपंचांनी काही लोकांना रामाला बोलावण्यासाठी पाठवले आणि कथानगरीच्या चावडीवर तातडीची सभा आयोजित केली. या सभेमध्ये मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते आणि या सभेचा मुद्दा रामाच्या घरात झालेली चोरी व कथानगरीची सुरक्षितता हा होता. सरपंचांनी काही ग्रामस्थांचे या विषयी मत जाणून घेतले. ग्रामस्थांची मते जाणून घेतल्यानंतर सरपंचाने असा निर्णय घेतला की रामाच्या घरात झालेल्या चोरीची तक्रार महानगरीच्या राजा राजवीरच्या राजदरबारात देऊ व त्याचबरोबर राजाकडून कथानगरीच्या सुरक्षिततेसाठी थोडे सैन्य मागू. सरपंचांच्या या निर्णयावर ग्रामस्थांनी मान्यता दिली. तर झालेल्या निर्णयानुसार सरपंच आणि काही ग्रामस्थ राजदरबारात राजाला भेटण्यासाठी निघत होते तेवढ्यात तिथे रामा आला. सरपंचाने झालेल्या चोरीची सगळी हकीकत रामाला सांगितली. रामा घरापाशी गेला त्याच्यासोबत सरपंच आणि काही ग्रामस्थ होते. रामाने घराची अवस्था पाहिली आणि सरपंचाने रामाला काय काय चोरीला गेले आहे हे विचारले. रामाने सांगितले की माझ्या घरात थोडे पैसे आणि थोडेफार दागिने होते आणि ते सगळेच चोरीला गेले आहे. सरपंचाने हे सगळे जाणून घेतले आणि सरपंच रामाला घेऊन चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी राजदरबारात गेले.
सरपंच, रामा आणि काही ग्रामस्थ राजाच्या राजदरबारात पोहोचले. राजदरबारात राजा, प्रधानमंत्री आणि सर्व मंत्री उपस्थित होते. सरपंचाने कथानगरीत झालेल्या चोरीची घटना राजा समोर मांडली आणि त्याचबरोबर कथानगरीच्या सुरक्षिततेसाठी सैन्याची मागणी केली. राजाने कथानगरीच्या सरपंचाची तक्रार आणि मागणी ऐकून घेतली आणि राज्याने काही सैनिकांना रामाच्या घरात झालेल्या चोरीचा तपास करण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर राजाने कथानगरीच्या सुरक्षेतेसाठी काही सैनिक ही दिले. सरपंच, रामा आणि काही ग्रामस्थ परत कथानगरीत आले आणि त्यांच्या सोबत काही सैनिक ही होते. सैनिकांनी कथानगरीत रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली, त्यांच्यासोबत सरपंच आणि काही ग्रामस्थ देखील गस्त घालू लागले. रात्रीची सगळी कथानगरी शांतपणे झोपलेली होती, अमावस्याच्या रात्रीत मशालाच्या उजेडात काही ग्रामस्थांचा व सैनिकांचा गस्त चालूच होता.
सकाळ सकाळी कोंबड्याने बांग दिली, सैनिकांनी कथानगरीतील गस्त थांबवला. लोक आपल्या आपल्याला कामाला लागली होती तेवढ्यात कथानगरीतील वाडी भागातला दामू जोरजोरात ओरडू लागला. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे गेले आणि त्याला काय झाले विचारू लागले. तर दामू बोलला की,"माझी गाय चोरीला गेली." हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटले की रात्री सैनिकांचा कडक बंदोबस्त असून देखील पुन्हा चोरी कशी काय झाली. इतक्यात त्या लोकांच्या गर्दीतून शिरत श्यामा (दामूचा शेजारी) चा मुलगा दामूपाशी आला. श्यामाचा मुलगा चार पाच वर्षांचा होता. तर श्यामाचा मुलगा दामूच्या समोर आला आणि म्हणाला की, " काका काका! आज आम्ही नवीन गाय आणली आहे" हे ऐकून दामूच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. श्यामाच्या मुलाचे बोलणे ऐकून दामूला वाटले की, "माझी गाय श्यामानेच चोरली आहे." ह्या त्याच्या संशयामुळे दामूची तळ पायाची आग डोक्यात गेली. दामूला खूप राग आला होता, रागात तो श्यामाच्या घरापाशी गेला आणि श्यामाला जोरजोरात हाका मारू लागला. श्यामा झोपेत होता, दामूचा आवाज ऐकून तो उठला आणि तो डोळे चोळत बाहेर आला. बाहेर आल्यावर दामूला काय झाले विचारु लागला. श्यामा बाहेर येताच दामूने थेट त्याचा गळाच धरला. श्यामाला काही कळेना, लोकांनी दामूला बाजूला खेचण्याचा प्रयत्न करुन श्यामाचा गळा सोडला. श्यामाने दामूला विचारले, "अरे दाम्या सकाळ सकाळी तुला काय झाले आहे, अंगात भूत आले आहे का?" दामू रागात म्हणाला, "ये श्याम्या भूत वगैरे सोड मला सांग रात्री तू माझी गाय चोरलीस ना?" श्यामा म्हणाला, "अरे दाम्या हे काय बोलत आहेस मी कशाला तुझी गाय चोरु. मी तुझी गाय चोरली नाही." दामू बोलला, "खोट बोलत आहेस तू, तूच माझी गाय चोरली आहेस मला पक्कं ठाऊक आहे, खरं बोल." श्यामा म्हणाला, "अरे दाम्या खरोखर मी तुझी गाय चोरलेली नाही. पण मला सांग तू माझ्या एकट्यावरच संशय का घेत आहेस?" दामू बोलला, "अरे तुझा पोरगा मला सकाळ सकाळी आम्ही नवीन गाय आणली आहे हे सांगत आला होता आणि या पोराच्या सांगण्यावरून मला असे वाटते की तू जी नवीन गाय आणली आहेस माझीच असणार. रात्रीच्या वेळी तू माझी गाय चोरली असशील." श्यामा म्हणाला, "हे बघ दाम्या मी असे काही केले नाही, मी नवीन गाय खरेदी केली आहे पण मी तुझी गाय चोरलेली नाही वाटल्यास तू माझ्या गोठ्यात जाऊन तुझी गाय आहे का नाही ते बघं." श्यामाचे ऐवढे ऐकून सुद्धा दामू शांत राहिना. दामू बोलला, "मी तूझ्या गोठ्यात जाणार नाही, कारण तू माझ्या गायीला दुसऱ्या ठिकाणी लपवले असशील तर?" दामूचा श्यामाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता, शेवटी दामू राजदरबारात श्यामाच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यास निघाला पण काही लोकांनी दामूला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु दामू काही ऐकना. तेवढ्यात अचानक दामूची गाय समोर आली. समोर गाय पाहून दामूला देखील आश्चर्य वाटले. गायीच्या गळ्यात कासरा बांधलेला होता आणि कासऱ्याला खुटी होती. हे पाहून लोकांच्या लक्षात आले की बहुतेक रात्री गाय खुटी उपडून पळून गेली असावी आणि सकाळी परत मालकाकडे आली आहे. दामूला सुद्धा गायीची करामत समजली असणार, परंतु रागामुळे आणि संशयामुळे दामूने जो गोंधळ घातला होता तो शांत करणे अवघड जाणार होते. शेवटी दामूने कोणतीही शहानिशा न करता हा गोंधळ घातला व निर्दोष श्मामावर खोटे आरोप केले हे चुकीचे होते. त्याला त्याची चूक कळाली, त्याने साऱ्या लोकांची माफी मागितली आणि मुख्य म्हणजे श्यामाची देखील माफी मागितली. परंतु श्यामाने त्याला माफ केले नाही.
त्याच दिवशी कथा नगरीच्या सरपंचाला राजदरबारातून संदेश आला की "रामाच्या घरात ज्या चोराने चोरी केली होती तो चोर सापडला आहे. तर राजदरबारात दुपारी राजाच्या समक्ष या चोरावर कारवाई केली जाणार आहे. तरी आपण दुपारी राजदरबारात उपस्थित राहावे." हा संदेश ऐकल्यावर सरपंच रामाला बोलवण्यासाठी आपल्या एका माणसाला रामाच्या घराकडे पाठवतो. कारण रामाच्या घरात चोरी झाली होती त्यामुळे त्याला राजदरबारात नेणे फार महत्त्वाचे होते. परंतु रामा घरात नव्हता, त्याच्या आईने सांगितले की "रामा बाहेर गावी गेला आहे." त्यामुळे सरपंच रामाच्या आईला घेऊन राजदरबारात जातो. राजदरबारात राजा राजवीर आणि मंत्रीमंडळ होते. सरपंचांनी रामाच्या आईची राजदरबारात ओळख करून दिली. राजाने कारवाईला सुरुवात केली. पंतप्रधानाने आरोपीला पुढे आणण्याचा आदेश दिला. आदेश ऐकताच सैनिकांनी अपराधी रामाला आणले. हे पाहून सरपंचांना व रामाच्या आईला आश्चर्य वाटले. तेवढ्यात पंतप्रधान म्हणाले, "महाराज, कथानगरीतील ज्या रामाच्या घरात चोरी झाली होती त्याच घरातील सदस्याने चोरी केली आहे आणि तो सदस्य म्हणजे हा रामाच. रामाने हुशारीने आपल्या घरातच चोरी केली, घरातील इतर सदस्यांना गावाकडे नेले आणि त्याचा फायदा घेऊन त्याने स्वतःच्या घरात चोरी केली. खरंतर ही चोरी त्याने कर्जापोटी केली आहे. रामाने सावकारांकडून, व्यापारांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. परंतु तो हे घरात सांगू शकत नव्हता. कारण त्याला माहित होते की घरातील लोक त्याचे कर्ज फेडण्यासाठी दागिने आणि पैसे देणार नव्हते. त्यामुळे त्याने आपल्याच घरात चोरी केली. महाराज हा जवाब स्वतः रामाने सांगितेलेला आहे. तरी आपण या घटनेवर योग्य निर्णय द्यावा." राजाने पंतप्रधानांचे बोलणे ऐकले त्याचबरोबर रामाला देखील आपले मत मांडण्यास सांगितले. रामा म्हणाला की, "हो महाराज, पंतप्रधान जे बोलत आहेत ते सारे खरं आहे. मला या संबंधित ज्यादा काही बोलायचे नाही फक्त एवढेच सांगेन की ही चोरी मी केली आहे." राजाने रामाचे देखील मत जाणून घेतले. तेवढ्यात भरल्या राजदरबारात रामाची आईने स्वतःचे मत मांडण्याची विनंती केली. राजाने विनंतीला मान्यता दिली आणि रामाची आई मत मांडण्यासाठी पुढे आली आणि म्हणाली, "महाराज आज मला कळते की माझा मुलगा कसा आहे, कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या घरातच चोरी केली खरंतर जेवढा रामा दोषी आहे तेवढेच आम्ही सुद्धा दोषी आहोत. ना कधी रामाची समस्या जाणून घेतली ना रामाला समजून घेतले. रामा पोरा असे का केलेस. मला सांगितले असतेस तर मी माझ्या हाताने तुझे कर्ज फेडण्यासाठी दागिने आणि पैसे दिले असते." रामा म्हणाला, "माफ कर आई. तुझ्याकडे कर्जफेडीसाठी दागिने आणि पैसे कसे मागू हे समजत नव्हते." आई म्हणाली, "महाराज माझी एक विनंती आहे की रामाला शिक्षा देऊ नका. परिस्थितीचा गुलाम बनून त्याने ही चोरी केली. मेहरबानी की त्याने स्वतःच्या घरातच चोरी केली. त्यामुळे आम्ही केलेली चोरीची तक्रार मागे घेत आहोत." रामाच्या आईचे मत जाणून घेतल्यानंतर राजा म्हणाला की, "पंतप्रधानाने मांडलेली खरी हकीकत आणि त्याचबरोबर रामाच्या आईने चोरीची तक्रार मागे घेतली असल्याने मी असा निर्णय घेत आहे की रामाला चोरीसाठी दिली जाणारी शिक्षा दिली जाणार नाही. परंतु रामाने पुन्हा अशी चूक करू नये म्हणून त्यास किमान सात दिवसाची कोठडी सुनावली जात आहे व ५०० रुपयाचा दंड ठोठावला जात आहे. राजदरबारातील ही कारवाई इथेच समाप्त होत आहे." रामाने केलेल्या चुकीबद्दल शेवटी थोडी का असेना पण शिक्षा भेटलीच.
समाप्त
लेखक: धनंजय एस. शिंदे
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
• कथानगरीच्या कथा या कथासंग्रहातील तिसरी कथा 'कथानगरीतील निवडणूक' लवकरच आपल्या भेटीला येत आहे.