माय-माऊली
नागठाणेतील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉ जे पी पाटील (बापू) यांच्या पत्नी व डॉ अवधूत पाटील यांच्या मातोश्री अनुराधा पाटील यांचे अपघाती निधन झालं. माई-माय म्हणून त्या सर्व परिचित होत्या.
जो आवडे सर्वाना,तोची आवडे देवाला.असं म्हटलं जातं आणि त्याचा अनुभव ही येऊन जातो.तसाच अनुभव आपण सर्वांना 24 फेब्रुवारी 2023 रोजी अनुराधा-माई यांच्या अपघाती निधनामुळे आला.
पाटील कुटुंबियांचे आणि आमच्या कुटुंबाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे बराच वेळा एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. आमच्या सारखेच इतर बऱ्याच लोकांशी त्यांचे संबंध आहेत. विशेष करून आमच्या सूर्यगाव मधील वारकरी संप्रदायातील कुटुंबांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
पंढरपूरच्या दिंडीत मी कधी गेलो नाही.पण दिंडी विषयी बऱ्याच वेळा ऐकले आहे.माई आणि बापू कशी प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेतात.आणि एकदा वारीत आलेली व्यक्ती कशी कायमस्वरूपी माईंशी जोडली जाते. वारीत माई सर्वांची कशी माऊली झालेली असते.
त्या माऊलीने कधीही आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही संकटाची,अडचणीची जाणीव होऊ दिली नाही.
माईंच्या घरी तुम्ही कधीही,कोणत्याही दिवशी,वेळी जा तुमचे स्वागत हे होणारच.अतिथी देवो भव.. या वाक्याचा अर्थच माईंच्या पाहुणचारामुळे समजायचा. मला बऱ्याच वेळा प्रश्न पाडायचा की माई एवढा पाहुणचार कशा काय करू शकतात.पण आता परत एक प्रश्न पडला माईंना माहिती होतं का? आपल्या जवळ वेळ थोडा कमी आहे. त्यामुळे आपण इतरांच्यावर प्रेम,आपुलकी, पाहुणचार करायला कमी पडायचे नाही. का परमेश्वराला वाटले असेल की ही माय खाली सामान्य लोकांचा एवढा पाहुणचार-आदरातिथ्य करते.तर मग माझी सेवा किती करेल.बोलऊ तिला आपल्याकडेच...
हल्लीच्या धावपळीच्या युगात कोणाच्या मृत्यूमुळे फार काही वाटत नाही. फारच कमी लोकांचा मृत्यू चटका लावून जातो....माईंच्या प्रमाणे...
त्या माऊलीचं प्रेम,आपुलकी,माया सदैव स्मरणात राहील.माईंना भावपूर्ण आदरांजली...
संदीप पाटील
सूर्यगाव