Bluepad | Bluepad
Bluepad
गोष्ट फोटोची !!!
T
Tejashree Deshpande
1st Mar, 2023

Share

फोटो म्हणजे फार वेगळं काही काही नसतं...
आठवणींच्या रंगांनी रंगवलेलं चित्र,
गेलेल्या, जगलेल्या, घालवलेल्या क्षणांची बारीक बारीक नक्षी असते...
फोटो म्हणजे भूतकाळाच्या पाऊलखुणाच,
आजीच्या शालेच्या घडीत, किंवा जुन्या हिशोबाच्या वहीत जपून ठेवलेला...
फार काही कुठे दिसतं त्यावर,
फक्त जुन्याचीच असते नवी झालर...
फोटो टिपणारा कॅमेरा म्हणजे भूतकाळाचा आरसाच जणू...
हा कान्हाच्या बारश्याचा,
हा आईंसोबत पाळणा गातानाचा,
हा ह्यांच्या सोबतचा...
किंवा...
ही बाबांनी दिलेली पहिली सायकल,
तो सायकलवरून पडलेली आमची तान्हुली...
किती कौतुकानं दाखवतो आपण,
अन् सांगतो उजळणी त्या सगळ्यांची...
स्वतःलाच...
अय्या हा गं कुठला...?
हा... हा लग्नानंतर देवाला गेलेला...
कित्ती मागे लागले होते तेंव्हा नेलं होतं, नदीकाठच्या बागेत...
आणि हा...
हा अंगणात बसलेला उघडा कृष्ण...
किती ते कौतुक...
अंधुक होत जातात ते फोटो आणि त्यावरचे रंग...
त्यातली माणसं मात्र कायम असतात, स्थिर असतात,
अगदी स्पष्ट, आपल्या मनात...
दूरदेशी गेलेल्या कोणत्यातरी व्यक्तीसोबतचा,
किंवा जवळची एखादी व्यक्ती जग सोडून जावी तसा त्या फोटोला फार अर्थ लाभावा...
चुकून नजरेसमोर कधी आलाच तर डोळ्यावाटे घळाघळा आठवणींचे ओघळ यावेत...
अन् क्षणात तटस्थ होउन फक्त मिश्किल हसत राहावं...
फोटोंचं ते कामच असावं...
आधी रडवून मग हसवावं...
असे हे जुने फोटो फार फार बोलतात...
जणू गेलेली दुनिया पुन्हा एकदा दाखवतात...
कोण म्हणतो भुतकाळ पुन्हा जगता येत नाही...
जुने फोटो पाहिल्यानंतर, माणूस भूतकाळात जायचा राहत नाही...
मनात सगळं कैद असतं,
जिभेवर वर्षोंवर्षं रेंगाळणाऱ्या एखाद्या मुरलेल्या लोणच्याच्या चवीसारखं...
उंबरठ्यावर घुटमळणाऱ्या पावलांसारखं...
मनात कायम जपल्यासारखं...
अल्बममधल्या एखाद्या फोटोसारखं...

1 

Share


T
Written by
Tejashree Deshpande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad