* दोन शब्द *
** लेखन कां करवस वाटलं ? **
दररोज सतत आपल्या भोवताली अनेक चांगल्या वा वाईट घटना घडत असतात आणि मनाच्या जलाशयात तरंग उमटतात. भावना शब्दरूप घेतात, विचारांना दिशा मिळते आणि माझं मत कागदावर लिहिले जाते.उच्च नितिमुल्ये जपण्यासाठी धडपडणारं कुणी गवसलं तर दीपस्तंभातून प्रकाशणारे किरण दूरवर पोहोचावे म्हणून लेखणी उचलावीशी वाटते .
दुष्कृत्यांची लाज वाटेनाशी होऊन नितीमुल्ये पायदळी तुडवून, काळ्या करणीची पेरणी होत आहे असे वाटले तर सामान्य जनांनी त्या दिशेने येणारा वारा सुद्धा टाळावा, अशी कळकळीची विनंती करण्यासाठी लेखन करावेसे वाटते. योग्य, अयोग्य, चांगले , वाईट याचे अर्थ स्वार्थानुरूप बदलतात अस समाजचित्र कधी कधी दिसतं, पण बहुसंख्य जनांसाठी अन्यायकारक असेल तर ते अयोग्य, हे स्पष्ट करण्यासाठी पत्रप्रपंच करावासा वाटतो. बऱ्याच वेळा सुचनांमुळे , आग्रहामुळे गैरसोई टळतात, दुरूस्त्या होतात "सोय सवलत' उपलब्ध होते हे मी अनुभवलंय. पण वर्तुळाला जसं टोक नसतं तसे समस्यांना अंत नसतो हेच सत्य आहे.
** जळत असलेल्या घरावर आपल्या इवल्याशा चोचीने दुरून आणून पाणी टाकणाऱ्या चिमणीला , एक ठिणगी तरी विझवता येईल अशी आशा वाटते, पण त्याहीपेक्षा चित्रगुप्ताच्या नोंदवहीत तीचा उल्लेख नक्कीच "आग विझविण्यासाठी प्रयत्न करणारी '' असा केला जाईल ,**
आणि हेच समाधान मला लेखना द्वारे मिळाल तर बस्.
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
वर्तुळाच टोक [मराठी लेख संग्रह -२००५]