Bluepad | Bluepad
Bluepad
माझी मराठी....🚩
Atharv Ekavire
Atharv Ekavire
28th Feb, 2023

Share

भाषा संवादाचे साधन....भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे.... भाषा म्हणजे संवादाचे एक साधन आहे....बोलणारा आणि ऐकणारा या दोघांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय....आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्यासाठी आपले भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते....भाषेचे महत्व आपण लक्षात घेतले पाहिजे....अनेक विचारवंत, कवी, लेखक यांचे विचार जतन करून ठेवण्याचे कार्य भाषा करते....
मातृभाषा मराठी
आपल्या घरात, परिसरात बोलली जाणारी भाषा म्हणजे आपली मातृभाषा होय....मराठी आपली मातृभाषा आहे....लहानपणापासून मराठी या आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानांवर व मनावर होत असतात....
महाराष्ट्राला मराठी भाषेचा अनमोल वारसा लाभलेला आहे.....महाराष्ट्रात अनेक खेड्यांमधून व शहरांतून मराठी भाषा बोलली जाते.....महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा वेगळी आणि खूप समृद्ध आहे....मराठी भाषेचे महान वैभव आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.....यासाठी महाराष्ट्राबद्दल व मराठीबद्दल आपण मनापासून कृतज्ञता बाळगली पाहिजे....
आपली मातृभाषा "मराठी" व "मराठी भाषेचे व्याकरण" हा आपल्याला अभ्यासाचा अभ्यासाचा विषय आहे....मराठीवर प्रभुत्व मिळविणे, बिनचूक वाक्यरचना करणे हे खूप आवश्यक आहे....मराठी भाषेचे व्याकरण हा महत्वाचा विषय आहे....तसेच या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासात मराठी या विषयाच्या अभ्यासाबरोबरच मराठी वाङ्मयाच्या वाचनाकडेही लक्ष दिले पाहिजे.....
मराठीविषयी थोडेसे.....
अक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख आहे....त्यावर शके ९३४ म्हणजेच इ.स. १०१२ असा स्पष्ट उल्लेख आहे....शिलाहारवंशीय राजा पहिला "केसीदेवराय" याचा प्रधान "भइर्जू सेणुई" याच्या काळात म्हणजे "शिलाहार" काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे....हा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे....त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत....(संदर्भ - Google)
"माझा मराठीची बोलू कौतुके |
परि अमृतातेहि पैजासी जिंके |
ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||"
अशी प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली आणि ती तडीस नेली....आजच्या काळात उपलब्ध असलेल्या साहित्यात 'विवेकसिंधु' हा आद्यकवी "मुकुंदराज" यांचा ग्रंथ हा मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला गेला आहे...."श्री ज्ञानदेवी" आणि "अमृतानुभव" हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे "श्री ज्ञानदेव" यांनी मराठी भाषा संपन्न केली...."लीळाचरित्र" हा आद्य गद्यग्रंथ लिहिणारे "म्हाइंभट" मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होत....
"मराठी असे आमुची मायबोली...."
असे प्रत्येक मराठी माणसाने अभिमानाने म्हटले पाहिजे....मराठीतून बोलणे, पत्रव्यवहार करणे, मराठी वृत्तपत्रे व मराठी ग्रंथ यांचे वाचन करणे....मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे.... २७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक "वि. वा. शिरवाडकर" अर्थात "कुसुमाग्रज" यांचा जन्मदिवस "जागतिक मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.....
मराठी मातृभाषा असलेले आपले बांधव मराठीची कोणतीतरी बोली बोलत असतात.....आदिवासी किंवा डोंगराळ भागांत बोलली जाणारी मराठी बोली खूपच निराळी असते....या बोलीभाषाही प्रमाणभाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत.....त्या प्रमाणभाषेपेक्षा खूप वेगळ्या आहेत.....मात्र त्या कमी प्रतीच्या नाहीत. आपण त्याही बोली ऐकल्या पाहिजेत, समजूनही घेतल्या पाहिजेत....अशा बोलीभाषांचा उपयोग करून निर्माण झालेले साहित्यही वाचले पाहिजे.....

1 

Share


Atharv Ekavire
Written by
Atharv Ekavire

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad