मी मराठी...फक्त नावालाच की मनापासून
मी मराठी...फक्त नावालाच की मनापासून?
रोज सकाळी सुप्रभात ऐवजी
अगदी झोकात गुड मॉर्निंग म्हणून
आम्ही आपला दिवस सुरू करत असलो तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
आम्ही आपल्या पाल्यास
तथाकथित सुप्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या शाळेत
भरमसाठ फी भरून आवर्जून टाकले असले तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
येरे येरे पावसा अशी मराठीत हृदयापासून साद
देण्याऐवजी रेन रेन गो अवे अशी दमदाटी करणारी
बडबडगीते मुलांना आम्ही भले शिकवू लागलो तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
महाराष्ट्रात राहत असलो तरी रिक्षावाला भैया
किंवा पाणीपुरी वाल्या भैयास हिंदीतून बोलणारे आम्ही
मराठी बोलताना मागासलेले समजत असलो तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
आई किंवा बाबा अशी मराठीत प्रेमळ साद देण्याऐवजी
मॉम किंवा डॅड अशी हाय फाय हाक देणारे आम्ही
आई वडीलांना वृद्धाश्रमात भले पाठवत असलो तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
मोडेन पर वाकणार नाही असा मराठी बाणा
अगदी झोकात मिरवणारे आम्ही स्वतंत्र व्यवसायास प्राधान्य देण्याऐवजी नोकरीस भुलत असलो तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
परस्त्री मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र राज्यात स्त्रियांवरील अत्याचार मूक पाहत असलो तरी
आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा....
खरेच वेळ आली आहे मातृभाषेला तिचं मातृत्वं पुन्हा बहाल करून आपला मराठी बाणा आणखी कणखर करण्याची...
तेंव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने म्हणू शकू आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा.....
डॉ अमित.
सोमवार.
२७ फेब्रुवारी २०२३.
मराठी राजभाषा दिन.