रंग तिचा वेगळा....
मार्च 2019, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर या संस्थेकडून technical assistant या पदासाठी माझ्यानावे मुलाखतीसाठी पत्र आलं. एवढ्या नावाजलेल्या संस्थेकडून मुलाखतीसाठी पत्र येणं ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती. हे पत्र येईल याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यापूर्वी मी कधीही नागपूर ला गेलेले नव्हते. नागपूर ला कसे जायचे? तिकडे जाऊन कुठे राहायचे? अगदी इथपासून सुरुवात होती. नंतर कळले मम्मी ची अगदी जवळची मैत्रीण निता मावशी नागपूरलाच राहते. पप्पा आणि मी रात्रभर रेल्वेचा प्रवास करून मुलाखतीच्या दिवशी पहाटे नागपूर ला पोहोचलो. निता मावशी कडे गेलो. तिथे थोडा आराम करून फ्रेश होऊन, आवरून, नाश्ता करून मग NEERI कडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो. मावशी आणि काकांची खूप मदत झाली. अनोळखी गावात कुणीतरी आपल सोबत असल्याची भावना मनात होती. काका आमच्यासोबत मुलाखतीच्या ठिकाणी सुद्धा आले. आम्ही तिथे पोहोचलो. पप्पा आणि काका गेट वर थांबले. तिथून पुढे माझी खरी परीक्षा होती. एकही मित्र मैत्रीण सोबत नाही... नेहमी परीक्षेला जाताना मित्र मैत्रिणींची असलेली सवय आता आत गेल्यावर कुणीही ओळखीचं नाही म्हंटल्यावर माझी पंचायत झाली. आत पोहोचले. तिकडे गेल्यावर कळले. १०००० एप्लिकेशन्स मधून १२६ जणांची निवड झालेली होती. त्यातही सकाळी एक टेस्ट होणार होती आणि मग पुढे मुलाखती साठी त्यातले निवडक लोक पुढे जाऊन फक्त २ जणांची त्या पदासाठी निवड होणार होती. निवड प्रक्रियेचा अंदाज आला आणि मनात धाकधूक सुरू झाली. पुढच्या एका टेस्ट साठी सगळ्यांना सभागृहात हजर रहावे लागणार होते. सभागृहात प्रवेश केला. भीती वाढू लागली. आत गेल्यावर एक लहानशी टेस्ट झाली. आणि सगळ्यांनी स्टेज वर जाऊन स्वतःची ओळख करून द्यावी अशी घोषणा झाली. प्रत्येक जण एक एक करून स्टेज वर येऊ लागले. मी जिथे बसले होते तिथे माझ्या मागे २ मुलं बसली होती. अगदी जवळचे मित्र असतील असं त्यांच्या संभाषणातून वाटत होते. दिल्ली च्या कुठल्याशा कॉलेज मधून आले होते. चेहऱ्यावरून आणि आधीच्या संभाषणातून खूप हुशार असल्याचं भासल. ते मागेच बसले असल्यामुळे त्यांचे सर्व संभाषण कानावर पडत होते. आता स्टेज वर येणाऱ्या प्रत्येकाविषयी ते काहीतरी भाष्य करत होते. स्टेज वर पुढचा मुलगा चढला. भिंगाचा चष्मा लावलेला. अंगकाठी एकदम सडपातळ. राकेश त्याच नाव (आडनाव आत्ता आठवत नाही). त्याने त्याची संपूर्ण ओळख मराठीतून करून दिल्याचं मात्र मला स्पष्ट आठवतं. मुंबईच्या एका नावाजलेल्या कॉलेज मधून आल्याचं कळलं. पण त्याच प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील एका खेडेगावत झालं असल्याचं त्याने त्याची ओळख करून देताना सांगितलं. त्यानंतर मागचे मुलं राकेश वर टीका करू लागले. "अरे या मूर्ख मुलाला आपण कुठल्या स्टेज वर येऊन कुठल्या भाषेत बोलावं हे कळत नसेल तर याची इथपर्यंत पोहोचण्याची लायकी तरी आहे का? " पहिला मुलगा म्हंटला. " त्याला मराठी शिवाय दुसरी कुठली भाषा येत असेल असे त्याच्याकडे बघून वाटत नाही." उत्तराखातर दुसरा म्हंटला. असं बोलून त्यांनी त्यांचं संभाषण संपवलं. पण त्यांचं त्या मुलाविषयी असलेलं मत मला त्या दोघांच्या विचारांविषयी बरच काही सांगून गेलं. त्यानंतर एक १०-१५ जणांचा परिचय झाला. आणि त्यांनी त्यातही बऱ्याच जणांवर टीका केली. १-२ च मुलांविषयी ते जरा बरं बोलले असतील. नंतर एक अतिशय सुंदर मुलगी आली आणि आत्मविश्वास नसलेली तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत तिने तिचा परिचय दिला.... तर माझ्या मागे बसलेल्या मुलांमधला एक मुलगा म्हणतो, "पैजेवर सांगतो याच मुलीची निवड होणार." मला तर हसायलाच आले. त्यानंतर माझा परिचय झाला. माझ्याविषयी सुद्धा ते काहीतरी बोललेच असणार पण ते माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हत. माझ्यानंतर एक मुलगी स्टेज वर आली. इथून सुरू होते खरतर माझी ही गोष्ट. जिचं नाव होत नेहा. नाकी डोळी अतिशय सुंदर पण रंगाने जगाच्या नजरेत काळी. प्रचंड आत्मविश्वासाने ती स्टेज वर चढली. अतिशय मोजक्या शब्दात पण योग्य पद्धतीने तिने तिचा परिचय करून दिला. तिचे बोलके डोळे मला खूप भावले. तिथे कुणीही मैत्रीण नसलेली मी हिच्याशी बोलायचय अस मनाशी ठरवल. माझ्या मागची मुलं मात्र आता जे काही बोलू लागले ते ऐकल्यावर मला जगाची रीत कळली. "अरे हीचा रंग इतका पक्का असेल की कुणीही तो काढू शकणार नाही" पहिला मुलगा. "एवढा काळा रंग घेऊन इकडे तिकडे फिरायला काही वाटत कसं नसेल तिला. हिच्या रंगाकडे बघूनच हिला मुलाखतीतून बाद करतील." दुसरा मुलगा. हे ऐकल्यानंतर मात्र मला राहवलं नाही आणि मी मागे वळून त्या दोघांकडे रागाचा कटाक्ष टाकला... त्या दोघांनाही ते कळलं आणि पुढे त्यांनी कुणावरही टीका केली नाही. नंतर त्या १२६ मुलांमधील ५० जणांची मुलाखतीसाठी निवड झाली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मी, नेहा आणि राकेश तिघे त्या ५० मध्ये होतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते माझ्या मागे बसलेले २ मुलं आणि ती अतिशय सुंदर मुलगी तिघेही त्या ५० मध्ये नव्हते. नंतर मुलाखत सुरू व्हायला १ तास अवकाश होता. म्हणून मी नेहाशी ओळख करायला म्हणून गेले. अतिशय साधी, सोज्वळ नेहा मैत्रीण म्हणून लगेच मनात भरली. तिचे डोळे खुप बोलके होते. तिच्याशी बोलताना लक्षात आलं, घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे स्कॉलरशिप मिळवून तिने शिक्षण पूर्ण केले. शाळेत शिकत असताना रंगावरून लोक चिडवत, कुणी मैत्री करत नव्हते म्हणून तिच्यात न्यूनगंड तयार झाला होता पण तिच्या आईने तिला त्या न्यूनगंडातून बाहेर काढत तिच्यातल्या असामान्यात्वाची जाणीव करून दिली. आणि आज शिक्षणाबरोबरच ती डिप्रेशन मध्ये असलेल्या मुलामुलींसाठी विशेष काम करते असे तिच्याशी झालेल्या संभाषणातून कळले. त्यानंतर तिच्याविषयी असलेला आदर अजूनच वाढला. आमची मुलाखत झाली आणि दुसऱ्याच दिवशी निकालही लागला... १२६ जनांमधून निवड झालेले ते दोघं म्हणजे राकेश आणि नेहा. 👏👏👏 माझी निवड झाली नाही याचं मला कधीही वाईट वाटल नाही पण त्यादोघांनी त्यांच्या यशाने त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना जी चपराक दिली तिचा मला विशेष आनंद होता. या उदाहरणातून मी खूप काही शिकले आणि मी जे शिकले ते तुमच्यासाठी-
१. जगात फक्त २ रंग आहेत आणि रंगाने कुणाचीही पारख करू नका. तसे असते तर दक्षिण भारतीय लोक जगाच्या पाठीवर भारताचे नाव उंचावत नसते.
२. भाषा ही कुठल्याही माणसाच्या यशातला अडथळा होऊ शकत नाही.
३. कुणाच्याही राहणीमानावरून, कपड्यांवरून त्यांची ओळख ठरवू नका.
४. संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम करा.
५. इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या.
६. स्वतःवर विश्वास ठेवा. चांगले कर्म करा. उत्तमच मिळेल.
शब्दांकन. - अश्विनी सोनवणे - अभोणकर.