महाराष्ट्र हा संताच्या, वीरांच्या आणि पुरोगामी विचारांच्या महा मानवांच्या पदस्पर्शाने पुणीत पावन झाला आहे. खर तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो अस आपण ऐकतो. अर्थात ते योग्य आहे. पण म्हणून स्त्री ने फक्त मागेच रहायच का...? एखाद्या स्त्री च्या यशामागे पुरुष उभा राहू शकत नाही का...? खर तर आज हा विषय घेण्यामागे कारण ही तसेच आहे. स्वतः ला सुशिक्षित आणि पुरोगामी समजणार्या अनेकांकडून मला काही प्रश्न विचारले जात आहे.
मागच्या एक दोन महिन्यापासून बायको ला पोस्ट खात्यात नोकरी लागली आणि तिला नोकरी करता यावी म्हणून मला असलेली नोकरी सोडावी लागली. आता मला अनेक जण विचारतात कि, तु बायको च्या जीवावर जगतो का...? कुणी विचारतो भांडे, कपडे धुतले का..? तु स्वयपाक केला का...? पोरीला सांभाळतो का..? किंवा मग तु शेतकर्याबद्दल एवढ बोलतो,मग तु शेती का करत नाही...? खर तर या गोष्टी चा मला बिल्कुल काही वाटत नाही.
या सर्व प्रश्नांचे उत्तर देताना मी शेवटा कडून पहिल्या कडे येतो. मला एकुण दहा एकर शेती आहे आणि मी एकटा आहे. माझ दरसाल कमीत कमी उत्पन्न हे 5-6 लाख रुपये असत. जमीनीची किंमत म्हणाल तर मी कोट्यावधी चा मालक आहे. पण माझ साध गणित आहे, मी जन्माला आलो तेव्हा काही च आणलेल नाही. मग या शेती आणि बापाच्या कमाई वर हक्क सांगायचा मला काही अधिकार नाही. स्वकर्तृत्वावर माझा विश्वास आहे. जोवर तारुण्य आहे आणि काही तरी करण्याची धमक आहे तोवर स्वतः च्या जीवावर काही तरी करायच म्हणून घर सोडून राहतोय. प्रत्येक गोष्ट पैसा नसतो. पद, प्रतिष्ठा आणि सन्मान हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसच आपण समाजाच काही तरी देणे लागतो म्हणून समाजाच्या प्रश्नावर मी माझ्या परीने लढत असतो.
आता दुसरा प्रश्न बायको च्या कमाई वर जगतोय, पोरीला सांभाळतो, भांडे-धुणे करतो इत्यादी इत्यादी. तर घर हे एकाचे नसतेच, घर सांभाळायची जबाबदारी दोघांची आहे. मग ते सांभाळत असताना दोघांनी काम वाटून घेतलेली असतात. बायका घरातील काम करतात आणि नवरे बाहेर च काम करतात. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणी कोणत काम करायचे. मी नावाला पुरोगामीत्वाचा उदोउदो करणारा नाही, माझ्या मते मराठ्यांच्या इतिहासात स्त्री ही फक्त पाठीमागे नाही तर वेळ प्रसंगी मैदानात उतरलेली आपण बघितली आहे. माॅ साहेब जिजाऊ चा आदर्श सांगणारे आम्ही या गोष्टी का विसरतो. सावित्री माई फुले यांनी शेणाचे आणि चिखलाचे गोळे यासाठी झेलले का कि, महिलांनी घरातील च कामे करावी. आम्हाला आमचे महापुरुष खरच कळाले का...? जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्वर माऊलींना उपदेश देणारी मुक्ताई ला आम्ही कसे विसरतो. संत तुकाराम महाराज यांचा संसार चालवणारी आवली आपण कसे विसरतो. म्हणजे आम्हाला आमचे संत तरी कळाले का...? परदेशी शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या महामानवाचा संसार चालवणारी माता रमाई आम्ही कसे विसरतो. मग आम्ही स्वतः ला सुशिक्षित तरी का समजाव. आम्ही जर आमच्या घरातील स्त्री ला चुल आणि मुल सांभाळायला लावणार असू आणि जगभर इतरांना अक्कल शिकवत असु तर आम्हाला काय नैतिक अधिकार आहे.
मुल जन्माला दोघे घालत असू तर मग सांभाळायची जबाबदारी फक्त स्त्री वर का...? कधी तरी स्वतः च्या मुलाची डायपर बदलली का...? मग त्या बाळावर अधिकार का गाजवायचा. कोणत्या भाजीत कोणता मसाला टाकायचा आणि किती मिठ टाकायच हे जर माहिती नसेल तर आयत मिळणाऱ्या जेवणाला नाव ठेवायचा अधिकार तुम्हांला नाही. मला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचा राग आला नाही तर स्वतः चा अभिमान वाटायला लागला. मी बाहेर चे काम तर करुच शकतो पण घरात कुठली बर्णी कुठे आणि कोणत्या भाजीत किती मिठ टाकायच हे या दोन महिन्यात शिकलो. अर्थात मला माहीत आहे मी आयुष्यभर ऐतखाऊ नसणार, हा काही काळ.
काळ वाईट आहे. कधी कोणाला बोलावण येईल सांगता येत नाही. मी सांगताना आनंद वाटतो मी माझ्या नंतर माझ्या परिवाराची सोय आजच लावली आहे. मला हे देखील ठाऊक आहे कि, जग नाव ठेवतच असत त्याना मी जुमानत नाही. पण इथे कित्येक मुलींचे भवितव्य याच लोकांमुळे संपले आहे म्हणून हा लिखाण प्रपंच. तुम्ही कुणाला मोठ करु शकत नसाल तर कमीत कमी दुसऱ्या ला खाली खेचू नका. तुमच्या कडे अनेक जण बघत असतात, आणि तुमच अनुकरण करत असतात. म्हणून जगाला द्यायचे च असेल तर काही तरी चांगले द्या. तुर्तास थांबतो.......