एकदम खेडे गावात राहणारी मिनू आणि तिचे आई वडील. परिस्थिती एकदम हलाखीची. एक वेळ जेवण मिळण्याची भ्रांत. रात्री उपाशीपोटी झोपू नये म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी मिनुचे वडील चक्की वाल्याकडून विनवण्या करून खाली पडलेले पीठ घरी आणत. त्या पिठाचा घाटा मिनू, तिची दोन भाऊ, आई, वडील, ७ आत्या, आजी, आजोबा अगदी आनंदाने पित व तृप्तीचा ढेकर देवून जे आहे त्यात समाधान मानून निवांत झोपी जात.अशा जेवणानंतर ही गाढ झोपणे जणू सुखी असल्याचे लक्षण होते...
मिनूचे आई वडील आधीपासून कष्टाळू, प्रामाणिकपणे आपले काम करणारे, स्वतः वर आणि देवावर विश्वास असलेले *..."हे पण दिवस जातील" आणि सुखाचे दिवस नक्की आपल्या आयुष्यात येतील या अपेक्षेने जगणारे....
मिनूचे आजोळी सगळे व्यवसायिक होते. तिला ३ मामा आणि २ मावश्या. आजोबांची हॉटेल, सोने चांदी दगिनेची दुकान, रॉकेलची एजन्सी, असे एकूण सर्वच काही रेलचेल आणि आर्थिक सुबत्ता असलेले कुटुंब होते...
मिनुच्या मोठे मामा आणि मामी ना अद्याप मुलबाळ नव्हते म्हणून खूप जास्त लाड आणि प्रेमाने ते मिनुला जीव लावत. तिचा हट्ट पुरवत, तिच्यावर खूप जीव ओवळत....जणू नियतीने हे सर्व ठरवूनच केलेले....
विविध व्यवसाय असल्याने वेगवेगळी प्रकारची लोक येत, भेटत, मामाला मुलबाळ नसल्याने लोकांच्या प्रशनार्थी नजरा असत....
मिनुची आई, मिनू, आणि तिची दोघी भावंडे दर दिवाळी आणि उन्हाळाची सुट्टीत आजोळी दीर्घ मुकाकामसाठी येत असत. हळूहळू मामा, मामी आणि मिनु चे नाते घट्ट विणले जाऊ लागले. आता या नात्याला विरह नको होता. उलट मिनू आईसोबत तिच्या घरी गेली की, मामा आणि मामीची आठवणीत आजारी पडत असे.....
मिनूची आईची परिस्थिती बेताची असल्याने मुलीचे लाड कोड पाहून मनोमनी सुखावत असे. स्वतः भोगत असलेले चटके आणि खलगे यापासून माझी मुले कशी दूर राहतील याचा एक आई म्हणून स्वार्थी विचार करीत असे...
एकदा असेच नेहमी प्रमाणे, सुट्ट्या संपल्या म्हणून मिनू, तिचे दोघे भाऊ आणि आई त्यांच्या गावला परत जाण्याची तयारी करू लागले. एकडे मिनू हट्ट धरून बसली...."आपण इथेच राहू ना"....३/४ वर्षाची मिनू, तिचे बोबडे बोबडे बोल, पायातील पैंजणची झुनझून, रडून रडून ओक्साबोक्सी केलेला चेहरा, विस्कटलेले केस, आणि मामाच्या कडेवर बसून खाली न येण्याचा प्रयत्न....
हुंदका देवूनही कुणाचे न ऐकणारी मिनू..शेवटी तिच्या आग्रहखातर तिच्या आईने मन घट्ट करून तिला मामाकडे राहू देण्याचा निर्णय घेतला...
हा निर्णय इतका सहज आणि सोपा नव्हता. नाळ ची पिळ तसू भरही कमी झालेली नव्हती. जड अंतःकरणाने दोन मुलांना घेवून ही माऊली परतीच्या प्रवासाला निघाली होती....
दोन गाड्या बदलत, आईने बांधून दिलेली चटणी भाकरी, कपड्यावर पडलेले तेलकट डाग, याची कणभर ही लक्ष न देत फक्त गाडीसोबत झाडे माघे टाकत होती....
"मी घेतलेला निर्णय , मिनूला दादाकडे ठेवण्याचा योग्य होता की अयोग्य...."या प्रश्नांच्या गर्तेत अडकवलेली ती माऊली पुरती सुन्न झालेली होती. घरी जावून माझा नवरा, सासू , सासरे यांना कोणत्या तोंडाने उत्तर देवू याने तिला धडकी भरली होती.....
मिनू नीट राहील ना..?
ती रडणार तर नाही ना..?
ति माझी आठवण ने आजारी पडली तर..?
मला पोहचून द्या असा हट्ट धरला तर...?
तिला पुन्हा घ्यायला जाण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे ही नाही..?
मी हा घेतलेला निर्णय भावनेच्या पोटी होता की, स्वार्थच्या पोटी याचे उत्तर तिला सांपडता सापडेना ...
"मुलगी हे असं एक फुल असते,ते प्रत्येक बगीच्यात फुलत नाही." निशब्द, स्तब्ध झालेली मिनुंची आई दोन गाड्या बदलत, दोन मुले सावरत, दोन बॅगा आवरत कशी गावापर्यंत पोहचली याचे भान राहिले नाही...कारण ती पूर्ण मूर्ती बनलेली होती.....
स्टॉपपासून तिचे घरी थोडे पायीं चालून यावे लागत असे. हा रस्ता जेव्हा सुरू झाला तेव्हा ती भानावर आली आणि,"माझी मौल्यवान वस्तू मी कशी विसरली "याचा विचार करून डोळ्याला लागलेली अश्रूंची धार न पुसता चालत राहिली...मी का पुसू माझे अश्रू...होऊ दे त्यांना मोकळे, दिवसभर मीं थकली त्यांना सावरून..आता माझे घर आले..माझी माणसे आलीत.. आता तर त्यांना कुणी अडवू शकत नाही.."
"अबोल ओठांना कधी बोलावेसे वाटते....मनातील दुःखला व्यक्त करायचे असते..... व्यथा व्यक्त होताना त्यांना कुरवळायचे असते....अश्रूंना वाट मोकळी करून मन हलके करायचे असते...."
गल्ली सुरू झाली, ओट्यावर बसलेल्या बायका, ताई, वहिनी, आजी...."मिनू कुठे गेली.. ग".."मिनू कुठे दिसत नाही ग..?" "एवढ्या लहान पोरीला तू सोडून आली, तू आई का कोण ग...?
अशा विविध प्रश्नांनी माजवलेले काहूर, सैरभैर झालेले मिनूची आई, मोठ्याने हंबरडा फोडत रडायला लागली. अस्वस्थ करणारी मिनूची आठवण तिचा पीछा सोडायला तयार नव्हती...
"माझी पोर राणीसारखी राहील, खूप काळजी घेतात ते ,पोटभर जेवण मिळेल, अंगभर कपडे मिळतील, मामा मामीचे प्रेम मिळेल, आणि चांगल्या शाळेत जावून हुशार होईल माझी पोर ती,"
"मी मिनूचा हट्ट पूर्ण केलाय,माझा नाही. असा कधी हट्ट असतो का आईचा, पोटच्या मुलीला दूर करण्याचा".."पोरी मला माफ कर, तू हट्ट केला मी नाही...तुझ्या आणि मामा पुढे मी काय बोलणार.."
दिवसभरचा प्रवास, असंख्य विचार, गरगरलेले डोके, खूप जड झाले होते. कुणाशी बोलण्याच्या मुड मध्ये नव्हती. कुणाला काही विचारणे नी कुणाला उत्तर देणेची ताकद आता उरली नव्हती...
नवऱ्याच्या आग्रहखातर ताटलीभर पिलेला घाटा ज्याने पोट भरते की नाही, या प्रश्नांचे उत्तर त्या कुटूंबकडे नव्हते आणि त्याचे उत्तर शोद्याचा त्यांनी कधी प्रयत्न ही केला नव्हता....
पहाटे चिमण्यांचा प्रवास, सूर्याचे प्रकाश, गल्लीत सडा घालणाऱ्या बायकांची आवाजाने मीनू ची आई जागी झाली. अंघोळ करून गावाचे कपडे आवरताना मिनूचा गुलाबी फ्रॉक हाताला लागला...
कालच्या आठवणी पुन्हा त्रास देवू लागल्या. भास होऊ लागले. मनात कासावीस होऊ लागली. पोटात गोळा गरगर फिरू लागला. खांबचा आधार घेवून खाली बसलेली थोडा वेळ मिनू ची आठवणीत मग्न झाली...
भानावर आले तेव्हा नवऱ्याचा कामावर जायची वेळ झाली होती..म्हणून लगबगने कामाला लागली...सर्व विसरून किंवा मनात ठेवून...
इकडे मिनू आणि तिचे मामा, मामी, आजी, आजोबा यांचे घरात तर मांगल्य निर्माण झाले होते. मिनूचे प्रतेक हट्ट, लाड ,अगदी पुरवले जात होते. लोकांचा वावर जास्त असल्याने मिनू सर्वणाची लाडकी आणि आवडती बनली होती....
तशी मिनू आधी पासून हुशार आणि चाणाक्ष होती. लवकर ती सर्वात मिसळली होती. कुणाची आठवण की खंत ती करत नव्हती. मोबाईल नसल्याने खूपदा आईचे फोन मिनूसाठी येत नव्हते. त्यामुळे साहजिकच, मिनूला इथल्या माणसात अडकणेत आणि मिनूची आईला तिच्या शिवाय राहण्याची सवय झाली..
एकदा ऐकलेले लक्षात ठेवणे, शाळेत शिकवलेली कविता, गाणे तसेच्या तसे घरी सर्वांना म्हणवून दाखवणे हे तिचे रोजचे होते. तिची बडबड, गुणगुण,याने सगळे मंत्र मुग्ध झाले होते...
"मिनू आज शाळेत काय झाले ते करून दाखव,"अस म्हटल की,लगेच तसच गाणे म्हणणं आणि नृत्य करून दाखवणे.. न घाबरता. तिची कौतुक बघून सर्व तिला अलगद उचलून घेत आणि तिच्या कलेची गावभर चर्चा होई..
सर्व काही सुरळीत चालले होते. मामांनी वचन दिले होते बहिणीला..म्हणजे मिनू ची आईला...."मी मिनूला कसली कमी पडू देणार नाही..प्रेमाची तर मुळीच नाही.."..
एकंदर, मिनूचे संगोपन आणि बालपण आनंदात जात होते. आपण घेतलेला निर्णय योग्य होता असे म्हणून मिनूची आई स्वतः ची पाठ थोपटून घेत असे...
पण या सुखावर काळाने झडप घातली, जणू नजरच लागली त्यांच्या आनंदाला. अचानक मिनू चे मामाची तब्येत बिघडली, त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. घरात धावपळ, पळापळ, आणि तणाव वाढला. हे सर्व मिनू पाहत होती पण तिला उमजत नव्हते नक्की काय होते ते. मामा ना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राण ज्योत मालवली..
आक्रोश,आकांत, अश्रू हे सर्व पाहताना मिनू पुरती गोंधळली होती. खिडकीत बसून मामाची वाट बघत होती. सर्व कडून सहानुभूती मिळूनही खचलेली, खंत करणारी मिनू.."माझा मामा कधी येईल "..या प्रश्नाने सर्वच्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती....
दिवस जात होते, लोक भेटत होते, दुःखाचा कोसळेलेला डोंगर पेलण्याची ताकद तर मिनू चे आजी आजोबा कडे नव्हती. पण पर्याय ही नव्हता. प्रयत्न चालू होते सर्व पूर्व पदावर आणण्याचे.
पण एका प्रयत्नात कुणाला च यश नाही आले..."माझा मामा कधी येईल "असे सारखे विचारून मामाची वाट पाहत बसलेली खिडकीतील मिनू चे प्रश्नाचे नेमके उत्तर काय द्यावे....
निरुत्तर होवून फक्त एकमेकाकडे पाहून मिनूचे लक्ष दुसऱ्या गोष्टीत गुंतवणे याकडे सर्व चे प्रयत्न चालू होते.....
निरागस मिनू अजूनही त्या खिडकीत बसून मामा येईल या आशेवर बसून आहे....
लेखन✍️
भाग्यश्री पाटील......