श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारला तरी अंगावर रोमांच उभे राहतात. अभिमान वाटतो मला शिवरायांच्या भूमी मध्ये माझा जन्म झाला, आणि लहानपणा पासून महाराजांचे विचारांच्या मूल्यांची रुजवण माझ्या सारख्या अनेक पिढी मधील लोकांच्या मनात निर्माण केली. शिवनेरी पासून रायगडा पर्यंतचा एक झंझावाती प्रवास म्हणजेच ' शिवराय '... महाराजांनी जे स्वराज्य आपल्या रयतेसाठी निर्माण केले तेव्हा स्वतःच्या सुखाचा, कुटुंबाचा त्याग केला आणि आई जिजाऊच्या आशीर्वादाने नवा इतिहास रचला. मुघल ही थरथर कापत असत नुसत्या माझ्या राजांच्या नावाने. ज्यावेळी श्रीकृष्णाने भगवद गीते मध्ये सांगितलं होत की ' " यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् |परित्राणाय साधूनां विनाशाय च दुस्-कृताम्, धर्म-संस्थापन-अर्थाय सम्भवामि युगे युगे || " ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा धर्म स्थापने साठी मी येईन आणि खरंच ज्यावेळी सगळी कडे कोलाहल माजला होता, उपद्रव होत होता आपल्यांच लोकांना आणि माणुसकीला ही काळीमा फासला जाईल अशी कृत्य घडत होती त्यावेळी आजच्या दिवशी साक्षात परमेश्वराने दिव्य अवतार घेतला आणि आई जिजाऊ च्या पोटी सुवर्ण तेजस्वी महापुरुषाचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीला आपल्या अस्तित्वाचा आज नव्याने अभिमान वाटू लागला कारण तळपता सूर्य आज नव्या तेजाने उगवला होता.
महाराज तुम्ही निर्माण केलेल्या या स्वराज्याला आज परत तुमच्या तेजाची गरज आहे कारण तुम्ही जो महाराष्ट्र निर्माण केलात तिथे आम्ही खूप कमी पडतोय तुमच्या विचारांची ओळख घ्यायला, तुम्ही अनेक जाती धर्मा मधील लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि सगळ्यांना समानतेचा अधिकार दिलात, पण अजूनही तुमची आजची प्रजा ही जातीयवादा मध्ये अडकून पडली आहे, उच्च नीच या भेदभावात आम्ही तुमची शिकवण विसरत आहोत.. स्वराज्यात प्रत्येक स्त्री सुरक्षित होती कारण तिच्या कडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या वृत्तीचा तुम्ही चौरंग करत होतात आणि स्त्रियांना तुम्ही तेवढंच सक्षम बनवत होतात प्रतिकार करण्या साठी पण आज आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कसं बोलावं कसं राहावं पण तुम्ही दिलेला लढवय्या वृत्ती आम्ही आत्मसातच केली नाही म्हणूनच या ' निर्भया ' पासून सुरू झालेला हा क्रुर प्रवास ' निर्भयते' पर्यंत आणण्यासाठी तुम्ही आज परत येण्याची आवश्यकता आहे.....
तुम्ही अनेक किल्ले बांधले अनेक राज्य जोडली अनेक गड सर केलेत पण आम्हाला मात्र नीट त्यांची निगा ही राखता येत नाही आहे, कारण आताच्या या आधुनिक युगात आम्हाला वाटत की आम्हाला इतिहास समजला आहे खूप आणि आम्ही गगनाला ही भिडू शकतो परंतु आम्हाला परत एकदा आपल्या या पराक्रमाने पावन झालेल्या किल्यांचे महत्त्व शिकवायला तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या....
तुम्ही ज्या राज्यात निती मूल्यांची घटना घालून तेव्हा अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आणि राज्याचा कारभार चालविला परंतु आजही आम्ही चिन्हं आणि नावांच्या राजकारणा मध्ये अडकून पडलो आहोत आणि तुम्ही घालून दिलेली शिकवणच आम्ही विसरतोय.. महाराज आज ती नितीमत्ता शिकवायला या राज्याला आणि तुमच्या भूमीला तुमची गरज आहे... कारण आम्ही फक्त सोशल मीडिया वर तुमच्या पराक्रमाची गाथा गातोय पण आम्हाला ती गाथा आमच्या धमन्या मध्ये रुजवायला आज महाराज तुम्ही परत या... कारण आज परत एकदा या समाजाला आलेल्या ग्लानी साठी तुम्ही तुमच्या पराक्रमाची आणि मूल्यांची शिकवण द्यायला आज परत जन्म घ्या......
✍️श्रुती चंद्रकांत चव्हाण.
(कृपया कोणी ही हा लेख स्वतचे नाव लिहून कॉपी करू नये )
...