शिवछत्रपती
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्रातील रयतेच्या तनामनात स्वराज्याचे स्फुल्लिंग फुलविणारा हा लोकराजा आज साडेतीनशे वर्षांनंतरही अवघ्या विश्वासाठी ' गारुड ' बनून राहिला आहे. बालपणापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासले. इयत्ता चौथीत शिकताना आम्हाला खऱ्या अर्थाने ' शिवछत्रपती ' कळले असे आजही वाटते. इयत्ता चौथीत इतिहास शिकताना आमच्या शेडगेबाईंनी शिवचरित्रातील प्रसंग आणि घटना त्यांच्या अमोघ वाणीने आमच्यासमोर अगदी हुबेहुब उभ्या केल्या. बालपणापासून मला थोडीफार चित्रकलेची आवड होतीच. मात्र मी बालपणी सर्वप्रथम जलरंगात रंगविलेले पहिले चित्र हे छत्रपती शिवाजीमहाराज यांचे होते. आज ते चित्र, वही यांपैकी काहीही अस्तित्वात नाही. तरीही मी तेव्हा काढलेले चित्र आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांची स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, तो क्षण, तो प्रसंग शाळेत अभ्यासल्यावर घरी आल्यावर आम्ही मुलामुलांनी अनेकदा तळ्यावरच्या शिवमंदिरात नाटुकल्यातून सादर केला. चिवारीच्या भेतांच्या तरवारी आणि हातांना ' शेले ' गुंडाळून आम्ही अनेकदा लढायाही केल्या. आमच्या अनेक नाटुकल्यांमध्ये आमच्या शेजारचा अभय ' शिवाजी महाराज ' साकारायचा. बालपणातही राजबिंडा दिसणारा अभय दाढीमिश्या लावल्यावर, शिरपेच परिधान केल्यावर हुबेहुब शिवाजीमहाराज वाटायचा. आम्ही बालवयात अनेकदा ' अफजलखान वध ' सादर केला मात्र नाटुकल्यात अफजलखान बनावयास कोणी तयार नसायचा. कारण अफजलखान बनणे म्हणजे साक्षात मृत्युशी गाठ वाटायची. त्यातही अभय राजबिंडा असला तरी स्वभावाने रागीट व खुनशी असल्याने भुमिकेत शिरल्यावर कधी काय करेल याचा भरवसा नव्हता. त्यामुळेच समजा एखाद्या प्रसंगी अफजलखान झालेल्याचा खरोखरच कोथळा बाहेर काढील की काय याची धास्ती वाटून अफजलखानाच्या पात्रासाठी आम्हाला फार शोधाशोध करावी लागायची. महत्प्रयासाने बऱ्याचदा आमचा गुरुनाथ अफजलखान बनायचा. तोही बालपणापासूनच अगदी धडधाकट व रांगडा गडी. बालपणात सादर केलेली ती नाटुकली आजही डोळ्यांसमोर उभी राहतात तेव्हा आपण किती ' अचाट ' बालपण उपभोगले आहे याचा अभिमान वाटतो. ' शिवछत्रपती ' पुस्तकातील शिवरायांचे बालपण, पुरंदरचा तह, शायिस्तेखानाची फजिती, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, पन्हाळगडास वेढा, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, रयतेचा वाली गेला यांसारखे धडे आजही वाक्यांसहीत, चित्रांसहीत आठवणीत आहेत याचे श्रेय ते पाठ आम्हाला शाळेत शिकविलेल्या शेडगेबाईंना निश्चितपणे द्यावे लागेल.
माध्यमिक शाळेत शिकताना आमची पहिल्यांदाच सहल गेली तेव्हा आम्ही प्रतापगड, पन्हाळगड, सज्जनगड प्रत्यक्ष पाहिले. सह्याद्रीची ही कवचकुंडले पाहताना नि अभ्यासताना तेव्हाही माझा ऊर अभिमानाने भरून आला होता आणि आजही तिथे गेल्यावर तसाच भास होतो. पुढच्या काळात सिंहगड, शिवनेरी, रायगड, पुरंदरसारखे गडकिल्लेही पाहिले. जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे जलदुर्ग पाहिले. सिंधुदुर्ग किल्ल्यावर तर वर्षांतून एकदा तरी फेरी होतेच. दापोलीजवळ असलेला सुवर्णदुर्ग पाहिला. हे सारे जलदुर्ग आणि किल्ले पाहताना आपण शिवकाळात हरवून जातो. छत्रपती शिवाजीमहाराजांचे स्वराज्याच्या कारभाराचे नियोजन, कारभाराची पद्धती आणि तत्कालीन उपलब्ध तंत्रांचा व सोयीसुविधांचा उचित वापर करण्याची युक्ती पाहिली की आजही थक्क व्हायला होते. आजही तोच सह्याद्री तसाच उभा आहे. शिवरायांचे गड किल्लेही कमी अधिक प्रमाणात तसेच आहेत. पण सह्याद्रीची एखादी कडेकपारी जरी जवळून पाहिली, एखाद्या घळीत पाऊल टाकायचा प्रयत्न केला तरी छातीत धस्स होते. मग तेव्हाच्या ' अवघड क्षेत्रात ' वावरताना, मर्यादित दळणवळणाची साधने उपलब्ध असताना कर्नाटक ते तंजावरपर्यंतचा प्रदेश छत्रपतींनीआपल्या अधिपत्याखाली कसा सुरक्षित राखला असेल आणि कसे अधिराज्य गाजविले असेल याचा अचंबा वाटतो. केवळ घोड्यासारख्या सजीव साधनाचा वापर करून इतक्या अवाढव्य प्रांतावर राज्य करणे ही सोपी गोष्ट नाहीच.
छत्रपतींसारखी दूरदृष्टी लाभलेला दुसरा कोणी राजा किंवा नेता त्यांच्यानंतर आजतागायत जन्मास आला नाही हे वास्तव आहे. त्यांचा राज्यकारभार, रयतेचे रक्षण, न्यायनिवाडा, सामाजिक व धार्मिक सलोखा, परस्री व परधर्मियांविषयीचा नितांत आदर या गोष्टी आज इतक्या वर्षांनंतरही व आजच्या काळातही आवश्यक वाटाव्या इतके त्यांचे महत्व टिकून आहे. मर्यादित मनुष्यबळाचा वापर करून, कमीतकमी नुकसान व मनुष्यहानी पत्करून गनिमी काव्यासारख्या तंत्रांचा प्रसंगानुरूप वापर करून छत्रपती शिवरायांनी आदर्श स्वराज्य निर्माण केले. आमच्या गावाशेजारी असलेला भगवंतगड, रामगड यांसारखे माचीवजा किल्ले पाहिले तरीही त्या काळातल्या बांधकामाचा मजबूतपणा लक्षात येतो. आमच्या गावातील शिवकालीन तलाव व पाटाच्या पाण्याची आजसुद्धा अस्तित्वात असलेली सिंचनव्यवस्था पाहिली की छत्रपती शिवाजीमहाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. आजही रायगडावर गेल्यावर शिवरायांच्या स्मृतीस्थळांसमोर अनेकदा नतमस्तक व्हावेसे वाटते. आजवर अनेक राजे-महाराजे भारतात किंबहुना महाराष्ट्रात होऊन गेले, मात्र छत्रपती शिवरायांसम ' जाणता राजा ' दुसरा कोणी नाही. सह्याद्रीचा हरेक कडा, हरेक शिखर आज छत्रपतींच्या स्वराज्याची साक्ष देत ताठ उभे आहे. अठरापगड जातींची एकत्र मोट बांधून शिवरायांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य संपूर्ण जगभरात एक आदर्श राज्य होते. ते निर्माण करणारे छत्रपती शिवाजीमहाराज हेही एकमेकाद्वितीय राजे होते. ' झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच!' असा ज्या एकमेव राजाचा उल्लेख होतो, त्या छत्रपती शिवाजीमहाराजांना माझा मानाचा मुजरा!
बाबू घाडीगांवकर