Bluepadसरकारवर विश्वास असणार्‍या स्वीडनकरांनी रोखले कोरोनाला
Bluepad

सरकारवर विश्वास असणार्‍या स्वीडनकरांनी रोखले कोरोनाला

A
Ashwin Sathye
25th Apr, 2020

Share


“मेरे प्यारे देश वासियों” असं म्हणत आपल्या पंतप्रधानांनी जनतेला साद घातली की आपण लगेच जीवाचे कान करून टीव्हीमध्ये डोळे खुपसून बसतो आणि पंतप्रधानांचं संबोधन लक्ष देऊन ऐकतो. पण आपल्या देशात काही लोक असे आहेत की हे संबोधन आता नवीन काय धुडगूस घालायला मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी ऐकतात की काय अशी शंका येते. त्यामुळे आपल्या देशात लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी सक्ती करण्याचीच गरज होती. पण स्वीडन एक असा देश आहे जिथे तांत्रिक दृष्ट्या लॉकडाउन नाही पण लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन मात्र मनोभावे पालन करीत आहेत.
स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले, “आपण सगळे प्रौढ आहोत आणि तसंच आपलं वागणं हवं. कोणत्याही स्वरुपाच्या अफवा किंवा लोकांमध्ये घबराट उडेल अशा गोष्टी पसरवू नयेत. या संकटकाळात कोणीही एकटं नाही, परंतु आपल्या प्रत्येकावर मोठी जबाबदारी आहे.” स्वीडनच्या जनतेने हे भाषण ऐकलं आणि आपल्या प्रशासन आणि आरोग्य सेवेवर नितांत विश्वास असणारे स्वीडनवासी आपली सगळी दैनंदिन कामं करत सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत. १ कोटी २ लाख एवढीच लोकसंख्या असलेल्या स्वीडनमध्ये १४,००० लोक कोरोना बाधित होऊन तिथे १५४० लोकांचा मृत्यूही झाला आहे तरीही तिथे लॉकडाउन नाही शिवाय त्यांनी कोरोनाचा फैलाव मर्यादित ठेवला आहे.
मारिआटोरगेट चौकात व्हायकिंग गॉड थोर यांच्या भव्य पुतळ्याजवळच्या परिसरात स्वीडनकर आईस्क्रीमचा आनंद लुटताना दिसत आहेत. तरुण मुलंमुली हॅपी अवर्समध्ये भटकंती करताना दिसत आहेत. स्टॉकहोम शहरात नाईटक्लब सुरू आहेत. मात्र २९ मार्चपासून ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी आहे. आणि याचं पालन तिथले लोक स्वेच्छेने करीत आहेत.
स्वीडनमधल्या रस्त्यांवर एरव्हीच्या तुलनेत शांतता आहे. आता लोक स्वत:हून उगीच घराबाहेर पडत नाहीत. एसएल ही स्टॉकहोममधल्या सार्वजनिक वाहतुकीचं नियंत्रण करणारी कंपनी. गेल्या आठवड्यात प्रवासी वाहतुकीत निम्म्याने घट झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सबवे आणि पॅसेंजर गाड्यांची वर्दळ कमी झाली आहे. टेक्नोसॅव्ही मनुष्यबळ आणि कामाच्या सोयीस्कर वेळा आणि घरून काम करण्याची सुविधा यामुळे हे शक्य झालं आहे. याशिवाय कर्मचारी गटागटाने काम करत आहेत त्यामुळे संक्रमण होत नाहीये.
सरकारतर्फे होणाऱ्या निधी पुरवठ्यावर स्टॉकहोम बिझनेस रिजन कंपनी चालते. शहरातून चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापारउदीम या कंपनीच्या मार्फत चालतो. या कंपनीच्या मते, सार्वजनिक वाहतुकीत ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कंपनीला हे करणं शक्य आहे. बहुतांश कंपन्या हे प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत. त्यांनी शक्य करून दाखवलं आहे, असं कंपनीचे सीईओ स्टाफन इन्गव्हॅरसन यांनी सांगितलं.
स्वीडनमध्ये कठोर निर्बंधापेक्षा मार्गदर्शक तत्वं आहेत. तुम्हाला बरं नसेल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही घरी राहणंच योग्य आहे. तुमचे हात सातत्याने धुवा, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, अशा या सूचना आहेत.
डेमोग्राफी अर्थात लोकांच्या राहण्याचं स्वरुपही लक्षात घेणं आवश्यक आहे. मेडिटेरिअन देशांमध्ये अनेकांची पिढीजात घरं आहेत. स्वीडनमधल्या या निम्म्याहून अधिक घरांमध्ये एक-एकच माणसं राहतात. त्यामुळे कुटुंबांत व्हायरस पसरण्याचा धोका कमी होतो.
दरम्यान स्वीडनच्या माणसांना घराबाहेर मोकळ्या वातावरणात वावरायला आवडतं. कोरोनासारख्या संकटकाळात लोकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखणं आवश्यक आहे. नियमांचा बडगा दाखवून त्यांना कोंडून ठेवण्याचा नियम केलेला नाही, असे इथले अधिकारी सांगतात.
कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी कोणकोणते पर्याय आजमावता येतील हे पाहायचं आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असं स्टॉकहोम चेंबर ऑफ कॉमर्सचे सीईओ आंद्रेस यांनी सांगितलं. स्वीडनचं सरकार आणि स्वीडनवासीयांचा दृष्टिकोन हा अन्य देशांच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचं म्हटलं जात असलं तरी स्वीडनने पत्करलेल्या या दृष्टिकोनावर अनेकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते.
असं असलं तरी आज स्वीडनमध्ये कोरोना बधितांची संख्या लक्षणीय स्वरुपात कमी झाली आहे त्यामुळे लॉकडाउन न करता केवळ सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

8 

Share


A
Written by
Ashwin Sathye

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad