Bluepad | Bluepad
Bluepad
ट्रेन..... भावनांचा सहप्रवास
नेहा घरत
नेहा घरत
19th Jun, 2020

Share


ट्रेन..... भावनांचा सहप्रवास

मुंबई ची लाईफलाईन, जिच्याशिवाय दैनंदिन जीवनाचा विचार करणे कठीण आहे, ती म्हणजे आपली लोकल. रोज कार्यालयात, शाळा,‌महाविद्यालयात जाणारे असे सगळेच ट्रेन‌ ने प्रवास करत असतात. त्यात भर म्हणून कधी तरी काही कारणामुळे प्रवास‌ करणारे असतात. कोणाचा तरी साखरपुडा, लग्न, वाढदिवस यासाठी हजेरी लावायला जाणारे असतात. तसेच प्रवासाचा अविभाज्य भाग असणारे विक्रेते, यांच्याशिवाय तर ट्रेनचा प्रवास अपूर्ण वाटतो. नेलपेंट पासून भाजी‌पर्यंत, रूमाला पासून ड्रेस‌मटेरियल पर्यंत सर्व काही‌‌ विकलं जातं ट्रेन मधे .
कधी टोपलीत देवीची मूर्ती घेऊन पैसे मागणारी बाई येते, तर कधी एक आंधळं जोडपं ' उघड दार देवा आता ' हे गाणं म्हणत पैसे मागताना दिसतं. कधी एखादा लहान मुलगा त्याने स्वत:च निर्माण केलेलं वाद्य वाजवत ' परदेसी परदेसी ' गात असतो , तर कधी कोणी तृतीयपंथी ' भगवान की तुमपर क्रिपा रहे , तुम्हारा घरबार सबकुछ सलामत रहे ' अशी दुआ देत डोक्यावर हात ठेवताना दिसतो.
ट्रेन म्हटलं की खूप गोष्टी डोळ्यासमोर येतात. आपली नेहमीची लोकल , नेहमीची जागा, आपला ग्रुप , आपण त्या सर्वांसोबत केलेली धमाल मस्ती,एकत्र साजरे केलेले वाढदिवस, एखाद दिवशी नेहमीची ट्रेन चुकल्यामुळे लागलेली हुरहुर, झालेली चिडचिड सर्व काही आठवतं . तेव्हा जाणवतं की घर आणि अॉफिस व्यतिरिक्त एक आणखी जीवन आपण जगत असतो, रोजचा ट्रेनचा प्रवास. वरवर पाहता दिवसातला काही वेळ आपण या प्रवासा साठी देत असतो पण तो प्रवास आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग कधी बनतो हे समजतच नाही. आता सुद्धा हे लिहीताना मी ट्रेन मधे आहे, आत्ताच बाजूने ट्रेन गेली, त्यातून टाळ वाजवण्याचा आवाज येत होता, भजनं गात होते, ही त्यांची रोजची करमणूक असते. नुकतीच ट्रेन मधे Announcement झाली, अगला स्टेशन भायखला, Next Station Byculla, पुढील स्टेशन भायखळा.

हा ट्रेनचा प्रवास म्हणजे खूप गंमत असते. ट्रेन पूर्ण थांबायच्या आधीच उडी मारून चढणं आणि आपली रोजची जागा पकडणं, कधी ट्रेन लेट असतील तर मैत्रिणींना कळवणं, मैत्रिण ज्या स्टेशनला चढते त्या स्टेशनला आल्यावर प्लॅटफाॅर्मवर उभ्या असणाऱ्या गर्दीत आपल्या मैत्रिणीला शोधणं, ती ट्रेनमधे चढायच्या आधीच तीला बसायला जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणं, कधी‌तरी खूप दिवसांनी ओळखीचा चेहरा दिसल्यावर भरभरून बोलणं, हे सर्व अनुभवायला मिळतं या सुंदर प्रवासात.
या ट्रेनच्या प्रवासात बरेच अनोळखी आपले होऊन जातात. सुख दु:ख वाटली जातात, भावनांची खूप सुंदर देवाणघेवाण होताना दिसते, नात्यांची गुंफण होताना दिसते. ट्रेनच्या या थोड्या वेळाच्या प्रवासात बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडताना दिसतात. कोणी गाणी ऐकत असतं, कोणी पुस्तक वाचत असतं, कोणी कधी तरी भाजी साफ करत असते, कोणी स्वेटर किंवा तोरण विणत असते, कोणी आपल्या कार्यालयात घडलेल्या प्रसंगाचे रसभरीत वर्णन करत असते, तर कोणी आपला आजचा दिवस कोणामुळे कसा खराब गेला हे सांगत असते, कोणी स्वत: केलेली शाॅपिंग इतरांना दाखवत असते, कोणी स्वत:च्या मोबाईल मधले फोटो दाखवत असते. कोणी आपल्या नवऱ्याचे कौतुक करत असते, तर कोणी आपल्या सासूला शिव्या घालत असते. एखाद्या ग्रुप मधली मुलगी स्वत: जाऊन आलेल्या ठिकाणी आपल्या सर्वांची सहल घेऊन जाऊया असे सुचवत असते.

प्रत्येका गोष्टीवर इथे चर्चा होत असते. राजकारणा पासून ते या शुक्रवारी कोणता चित्रपट प्रर्दशित होणार इथपर्यंत. आजकालची लहान मुलं अशी स्मार्ट असतात इथपासून तरूण पिढी कशी बेजबाबदार आहे इथपर्यंत सर्व गोष्टी बोलल्या जातात. भांडणं सुद्धा होतात. तरीही मकरसंक्रांतीला तीळगूळ देऊन हळदी कुंकवाचं वाण दिलं जातं, दिवाळीला फराळ तसेच गौरी गणपतीला प्रसाद दिला जातो. विविध प्रकारच्या माहिती ची देवाण घेवाण होते. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात.
एकाच वेळी अनेक प्रवासी एका ट्रेन मधून प्रवास करत असतात. त्यावेळी प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. कोणी आज ऑफीस मधे जाऊन Targets कसे पूर्ण करायचे या विचारात असते, तर कोणी नुकत्याच मिळालेल्या Promotion मुळे आनंदी असते, कोणी आपली Retirement जवळ आली, आता हे सहकारी, या मैत्रिणी रोज दिसणार नाहीत हा विचार करत असते. कोणी प्रेमात पडल्यामुळे प्रेमाचा गुलाबी रंग अनुभवत असते, तर कोणी ब्रेकअप झाल्यामुळे मनाला झालेल्या यातना सहन करत असते. कोणी लग्न जमल्यामुळे नवीन जीवनाची स्वप्न रंगवत असते, तर कोणी लग्न मोडल्यामुळे भंगलेल्या स्वप्नाचं दु:ख झेलत असते. आपल्या मुलाला कमी गुण मिळाल्यामुळे कोणी चिंता करत असते, तर दुसरी त्याच वेळी आपली मुलगी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यामुळे तीचे कौतुक कसे करावे हा विचार करत असते.

या आणि अशा अनेक संमिश्र भावना, विचार एकाच वेळी सोबत ट्रेनमधून प्रवास करत असतात. तसं पाहायला गेलं तर रोजचाच असलेला पण तरीही खास वाटणारा हा प्रवास आपल्याला जीवनात खूप काही देत असतो.

- नेहा घरत

12 

Share


नेहा घरत
Written by
नेहा घरत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad