प्रजासत्ताक दिन 2023
शाळेतील महत्वाचे सण म्हणजे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन. शालेय दिवसांत या दिनाचं महत्त्व म्हणजे नवीन इस्त्री केलेले कपडे घालने, गावात प्रभातफेरीला जाणे आणि खाऊ मिळणे एवढंच. हळूहळू "150 वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केलें आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वातंत्र झाला" अशा भाषणातून स्वातंत्र्यदिनाच महत्त्व कळायला लागलं मात्र प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? तो का साजरा केला जातो? हे कळतच नव्हतं. आज वाचनातून प्रजासत्ताक दिन कळायला लागला परंतु झेंडावंदन, प्रभातफेरी यापलीकडे प्रजासत्ताक दिन अजूनही साजरा होताना दिसत नाही. स्वातंत्र्यदिन साजरा करताना ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिले त्यांचे स्मरण कारणे क्रमप्राप्त आहे, ते केले जाते परंतु प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी ह्या देशाला राज्यघटना देऊन ह्या देशात लोकशाही प्रस्थापित केली, गणराज्य स्थापन केले, हा देश प्रजेच्या हातात सोपवून प्रजासत्ताक बनविला त्यांचे गुणगान होताना दिसत नाही. इ.स.1950 पासून शाळेत प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिवाय साजरा होत आलेला आहे. त्यामुळे अनेकांना या दिवसाचं महत्त्वच कळलं नाही आणि त्यामुळेच या देशातील लोकांना लोकशाही समजली नाही. केवळ सीमेवर असणारे जवान हेच देशभक्त आणि त्यांचे गुणगान कारणे म्हणजेच देशभक्ती एवढंच या देशातील लोकांना शिकवलं गेलं.
मित्रांनो या देशात जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे. या देशातील शेतकरी या 140 करोड जनतेची भूक भागवून देशाची सेवा करतो. या देशातील डॉक्टर लोकांचे प्राण वाचवून देशसेवा करतो, सैनिक सीमेवर रक्षण करतो, शास्त्रज्ञ नवनवे शोध लावून देशाची प्रगती करतो, शिक्षक भावी पिढी घडविण्याचे कार्य करतो. व्यापारी, कामगार, उद्योगपती, अभियंता, लोकप्रतिनिधी, अभिनेता, साहित्यिक, वकील, न्यायाधीश, पोलिस प्रत्येक व्यक्ती आपल्या कामातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देशसेवाच करीत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा देशभक्त आहे. त्यामूळे प्रत्येक व्यक्तीचं व त्याच्या पेशाचं लोकशाहीचा एक घटक म्हणून महत्त्व अधोरेखित होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हा देश ज्या राज्यघटनेने चालतो त्या राज्यघटनेचा कारभार, त्यातील समता स्वातंत्र्य न्याय व बंधुता, राज्यघटनेतील हक्क, अधिकार आणि कर्तव्ये ही सुद्धा प्रत्येक व्यक्तिला कळेल या उद्देशाने हा दिवस साजरा केला गेला पाहिजे, तरच लोकांना लोकशाही कळेल, ती सशक्त आणि मजबूत होईल अन्यथा आम्ही फक्त "भारत माता की जय" हेच म्हणत राहू, जय कधीच होणार नाही......!
-चार्वाक खैरे
न. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळमेश्वर
26/01/2023