का लिहावं? कशासाठी लिहावं?
लिहावसं वाटतं म्हणून लिहावं?
की कुणी वाचेल,
कुणाला रुचेल म्हणून लिहावं?
माझ्या लिहण्याच्या उर्मीसाठी,
की लिहता येण्याच्या गुर्मीसाठी लिहावं?
स्वतःच्या सुखासाठी लिहावं की
तुझ्या माझ्यातल्या दुव्यांसाठी लिहावं?
पडणाऱ्या प्रश्नांसाठी लिहावं की
न पडणाऱ्या प्रश्नांसाठी लिहावं?
निरगाठी सोडवण्यासाठी की
गुंत्यात गुंतण्यासाठी लिहावं?
शोधण्यासाठी स्वतःला की
जगण्याच्या फसव्या कोड्यांसाठी लिहावं?
गवसलेल्यांसाठी लिहावं की
हरवलेल्यांसाठी, हरलेल्यांसाठी लिहावं?
नाचणाऱ्या मोरपिसांसाठी लिहावं की
हरवलेल्या रानांसाठी लिहावं?
तिच्यासाठी लिहावं की,
त्याच्यासाठी लिहावं...?
सारं काही पदरात घेणाऱ्या मायसाठी,
बापाच्या मुक्या ओठांसाठी लिहावं?
दखलच न घेतलेल्या बेदखलांसाठी,
खदखदणाऱ्या वेदनांसाठी लिहावं?
मनावरच्या ओरखड्यांसाठी लिहावं
की दुखऱ्या जखमांसाठी लिहावं?
लिहताच न येणाऱ्या हातांसाठी लिहावं?
की लिहिलेल्या पोकळ बातांसाठी लिहावं?
हिरव्यागार शिवारांसाठी,
फळ फुलांच्या बागांसाठी लिहावं?
झुळझुळणाऱ्या पाण्याच्या गाण्यांसाठी
की उजाड माळरानांसाठी लिहावं?
बाप हरवलेल्या पोरांसाठी
राब राब राबणाऱ्या हातांसाठी लिहावं?
उदास, भकास खुपणाऱ्या डोळ्यांसाठी,
कंठी दाटलेल्या हुंदक्यांसाठी,
फाटलेल्या नशिबांसाठी लिहावं?
कालसाठी लिहावं की आजसाठी लिहावं?
की उद्याच्या स्वप्नांसाठी लिहावं?
जगण्यासाठी, मरण्यासाठी लिहावं,
रुजणाऱ्या पात्यांसाठी अन्
मुक्तपणे गाऊ इच्छिणाऱ्या कंठासाठी,
हरवलेल्या स्वातंत्र्यासाठी लिहावं?
का लिहावं, कशासाठी लिहावं?
खरंच का लिहावं कशासाठी लिहावं....
© संदीप विष्णू राऊत बुलडाणा
raaut.sandip@gmail.com