मनात आले सांगून टाकले.....
.......................................................................
एका मोठ्या सरकारी बँकेत मोठ्या हुद्यावर काम करून सेवानिवृत्त झालेल्या माझ्या एका बँक अधिकारी मित्राने सांगितलेली ही सत्य घटना आहे. खूप काही सांगणारी.
बँकेत कामं करताना अनेक गुंतवणूकदाराशी त्याचा संबंध यायचा,आलेला.
बँकेत सेवेत असताना एके दिवशी एक साठीकडे झुकलेली महिला ठेवीची मुदत संपल्यामुळे नूतनीकरण करण्यासाठी माझ्या या मित्राकडे आली.
' किती वर्षासाठी मुदत वाढवायची ? ' त्या अधिकाऱ्यानरी मित्राने म्हतारीला विचारले.
त्यावर ती म्हणाली,
' व्याजासकट एक रक्कमी सगळे पैसे मिळतील या हिशोबाने पुढील तीन वर्षासाठी ठेवा '
तिला कुठलेही निवृत्तीवेतन मिळत नव्हते. त्यामुळे त्या माझ्या मित्राने तिला सल्ला दिला कीं,
' आपण असे करू कीं प्रत्येक महिन्याला तुम्हाला व्याज मिळेल.अश्या योजनेत पैसे पुन्हा ठेवू यात.यामुळे दरमहा तुम्हाला खर्चाला पैसेही हाती येतील.'
यावर म्हतारी म्हणाली,
' सद्या मला मुलगा जेवू घालतोय. मला तशी महिन्याला पैश्याची गरज नाही. पुढे वृद्धाश्रमात जाईन तेव्हा लागतील.'
माझ्या अधिकारी मित्राला आश्चर्य वाटले. त्याने तिला विचारले ,
' तुमचा मुलगा तुम्हाला जेवू घालतोय. किती भाग्यवान आहात तुम्ही. मुलगा जेवू घालतोय ना मग कशाला हवा वृद्धाश्रम ?
माझ्या मित्राचे बोलणे ऐकून म्हतारीचे डोळ्यात घळा
घळा पाणी आले. डोळे पुसत ती म्हणाली,
' साहेब,मी सध्या त्याचे घरी दोन्ही वेळचे भांडी घासतेय म्हणून तो माझ्या पोटाला जेवायला देतो. आज मी धडधाकट आहे. हात पाय थकतील तेव्हा मला पैशाची गरज लागेल.'
कुणाचा विश्वास बसेल अशी ती कहाणी नव्हती. माझ्या मित्राचाही तिच्या सांगण्यावर नाही बसला पहिल्यांदा विश्वास.
पण तें वास्तव होते.
ती माऊली बँकेच्या पायऱ्या उतरताना जे म्हणाली तें भीषण वास्तवाचे बोल होते. ती म्हणाली,
' सायेब, आजची मूळे चार पायाचा कुत्रा, प्रेमाने सांभाळतील पण दोन पायाचे आई -वडील नकॊ असतात त्यांना '
.... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.