Bluepad | Bluepad
Bluepad
नरमुखातील श्रीगणेश.25/1/23.
छाया मधुकरराव देशपांडे
25th Jan, 2023

Share

॥ नरमुखातील श्रीगणेश॥(श्रीगणेश जयंती निमित्त लेख).
   आजपर्यंत आपण श्री गणेशाची अनेक रूपे
पाहिलेली आहेत. गजमुखी गणपती,उजव्या सोंडेचा गणपती, कमळातील गणपती, लेण्याद्री
येथील डोंगरातील खडकावर असलेली गणरायाची मुर्ती इत्यादी... म्हणुनच वेगवेगळ्या
नावांनी आपण त्यांना संबोधतो. जसे...
विघ्नहर्ता, अमोद,प्रमोद,वरद,भालचंद्र इ.
       महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी गणरायाची मंदीरेही आहेत आणि भक्तही आहेत.
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी  गणेश पुजला जातो.  जगात जेवढी म्हणून गणेश मंदिरे आहेत तेथे गणेश हा गजमुख आहे. याविषयीची कथाही आपणास माहित आहेच. शंकराच्या क्रोधामुळे त्यांचे मनुष्याचे मुख त्यांना गमवावे लागले.आणि मग पार्वतीच्या हट्टासाठी शंकराने त्यांना गज म्हणजेच हत्तीचे मुख लावले गेले. तेंव्हापासून गणरायाला गजानन, वक्रतुंड या नावाने संबोधलेही जाते. व याच रूपात त्यांची पुजा,अर्चना, आराधना केली जाते.
" काय सांगु,तुम्हा या गणेशाची महती
  जगातील एकमेव अशी आहे याची ख्याती"
तमिळनाडूमधे असे एक मंदिर आहे जेथे  श्री गणेश  आपल्याला मानवी चेहरा असलेल्या रूपात पाहायला मिळतात.काय आश्चर्य वाटले ना?पण हे खरे आहे. तीलतर्पणपुरी या तमिळनाडूतील कुतनूर गावापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर  आहे.त्याला आदिविनायक मंदिर असे म्हणतात.अस मानल जात की, गणराय हे मनुष्य रूपात जेंव्हा होते,तेंव्हापासून हे मंदीर आहे.हे मंदिर फार मोठे नाही.
        मात्र त्याचे आणखी एक विशेष म्हणजे येथे भाविक पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा करतात. मानवी चेहरा असलेली ही मूर्ती जगात एकमेव आहे.
   " मानवी चेह-याची गणेशाची मुर्ती ही लोभस
    दुरून येती भक्तजण , तुमच्या दर्शनास"
अशीही एक आख्याईका सांगतात या ठिकाणी श्रीरामाने त्यांच्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून पूजा केली होती. तीलतर्पण या नावामागे हाच अर्थ आहे. तीलतर्पण म्हणजे
कैलासवासी पितरांना मोक्ष,शांती मिळावी म्हणून तिळाचे तर्पण दिले जाते. पूर्वजांना समर्पित. पुरी म्हणजे नगर.
"तीलतर्पण देऊनी प्राप्त करून घ्यावे तुम्ही पुण्य
मिळेल पितरांना  शांती,अन् सरेल तुमचे दैन्य"
या मंदीराचे पुर्वीचे नाव मंथखलम असे होते. श्रीराम जेंव्हा दशराथाला पिंडदान देत होते,तेंव्हा त्या पिंडात कीडे होत होते. त्यावेळी श्रीरामाने शंकराची आराधना केली. आणि शंकरानी त्यांना याठीकाणी जाण्यास सांगितले. आणि ईथे श्रीरामांनी जे चार पिंड केले होते त्याचे शिवलींगात रूपांतर झाले. म्हणून येथे शंकराचेही मंदीर आहे. आवारात एक महादेव आणि सरस्वती मंदिरही आहे.या मंदीराला  "मुक्तेश्वर टेम्पल" या नावानेही संबोधले जाते.
         आपण पहातो,दाक्षिणात्य मंदीरे अत्यंत भव्य असतात.पण त्यामानाने हे मंदीर लहानच आहे परंतू सुबक,सुंदर अशी मंदीराची रचना आहे.
        एका वेगळ्या वैशिष्ट्यामुळे या मंदीराला एक महत्त्व प्राप्त झाले आहे.पितृदोषामुळे काही संकटे येत असतील किंवा कामात अडथळे येत असतील तर देशभरातील भाविक येथे येतात.
       तर अशा एका आगळ्या वेगळ्या श्रीगणेशाची आज आपण माहीती पाहीली.
                " जय श्रीगणेश".
          ......... छाया मधुकरराव देशपांडे.पुणे.
नरमुखातील श्रीगणेश.25/1/23.

0 

Share


Written by
छाया मधुकरराव देशपांडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad