दाद दे ग राणी...
शीर्षक जरा वेगळंच वाटतंय ना? प्रेमात पडल्या जीवाला जोपर्यंत समोरून दाद येत नाही ना तोपर्यंत सारंच एकतर्फी, फोलंच सारं...
मुलाला लाख मुलगी पसंत असेल हो, मुलीच्या पसंतीचं काय? असंच होतं. आणि तिच्या प्रेमात पडलेल्या प्रेमवीराची तळमळ वाढू लागते. संपर्क साधायचा तरी कसा? काय काय क्लृप्त्या करायच्या? टेलिफोन केला तर ती घेईल? पत्र पाठवलं तर, तिला आवडेलही, तिच्या घरच्यांना आवडेल का, त्यांचं काय?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच प्रश्न !! अस्वस्थता वाढलेली. कुठून तरी संपर्क व्हावा ही तडफड, धडपड... करायचं काय? फोटो पाहून पाहून मनाची समजूत तरी किती घालायची? त्या अस्वस्थ काळात कविरुपात झालेलं स्थित्यंतर कागदावर उमटवावं तरी किती कसं?
चेहरा नुसता सुंदर म्हणून कवीला चालत नाही. एकतर त्या मनी ठसलेल्या चेहऱ्याला चंद्राची तरी उपमा द्यायची, चंद्ररुपाशी तुलना तरी करायची नाहीतर, चंद्राला पौर्णिमेच्या दिवशीच अमावास्येत ढकलून त्याच्या जागी 'तिच्या' सुंदर चेहऱ्याची नियुक्ती करायची !! स्थापना शब्द दगडी मूर्तीला वापरतात ना. उंहुं.. मग तो अयोग्य आहे. नियुक्ती म्हटलं की कसं, डायरेक्ट सीईओपदीच प्रमोशन! हयगय नाही.
चंद्राला पदमुक्त केलं की, राहता राहिली, गुलाबाची फुलं, मोगऱ्या, चंदनाचे सुगंध. डाळिंब.. जरा शब्द खडबडीत वाटतो ना. अनारकली.. अहाहा कसला सुंदर शब्द, थेट मधुबालाशीच तुलना !!
हे सारं जरा कंटाळवाणं नाही वाटत कविवर्याला, तरी पण बदल हवाच ना!
मग कानांवर पडलेली, स्मरण खजिन्यात लॉक करून ठेवलेली गाणी, तिची आठवण येताच, ओठांवर येतात. तिला ऐकवावीत का ही अशी गाणी? पण कशी?
त्यापेक्षा त्या गाण्यांच्या चालीवर शब्द लिहून आपण 'तिच्या' सौंदर्याला आपल्या पद्धतीने वर्णावे का? 'न्याय द्यावा का' असे सुचलेले शब्द, तात्काळ मागे घेतले जातात. फारच 'अ'संयुक्तिक वाटतात.
'ओपी' कसा घोड्याच्या टापांच्या ठेक्यावर गाणी लिहून घेऊन स्वरबद्ध करायचा.
काय म्हणता? 'ओपी' कोण? हिंदी चित्रपटसृष्टीतले ओ.पी.नय्यर हो...
पण कशाला घोड्याच्या टापा ढापा? मराठीत तर बैलगाड्यांवरची सुद्धा गाणी देखणी आहेतच की.
..'डौल मोराच्या मानंचा ग डौल मानंचा'..'योगेश' यांचे शब्द, हृदयनाथांचा आवाज..
चांगलंय, पण नाही यावर सुचत काही..
...अं...'बैल तुझे हरणा'...गदिमांचे शब्द....
.......
'घनदाट तुझे केस ग राणी 'शाल्मली' ग राणी...'
व्वा झक्कास.. !! जमेगा जमेगा !!
जमल्यावर लिहून पाठवायचं कसं 'तिला?' लिहून तर ठेवू. आपलं स्वप्न प्रत्यक्षात येणारच. आत्ता नाही पाठवता आलं तर, तिचा होकार आला की... आला की? काय येणारच.. सकारात्मकता.. पत्रात लिहून, देऊ पाठवून. भेटल्यावर एकांतात ऐकवू, इतका काही भसाडा आवाज नाही आपला....
घनदाट तुझे केस ग राणी
शाल्मली ग राणी
प्रेमवीराच्या गीताला दाद दे ग राणी
शाल्मली ग राणी
शाल्मली ग राणी
हो......
हे द्येवी sssss
लागले ग जीवा माझ्या
लावण्याने वेड तुझ्या
लागले ग जीवा माझ्या
लावण्याने वेड तुझ्या
येऊ दे ग कानी तुझ्या माझी गीत वाणी
माझी गीत वाणी
प्रेमगीत वाणी
शाल्मली ग राणी
हो...
हे द्येवी sssss
एक बट भाळावरची
कशी सांगू ओढ तिची
एक बट भाळावरची
कशी सांगू ओढ तिची
कळत कशी नाही तुजला लावण्य रूप खाणी
लावण्य रूप खाणी
शाल्मली ग राणी...
शाल्मली ग राणी
हो.....
हे द्येवी sssss
तरूण रूप बांधा तुझा
जणू शिल्प साचा
तरूण रूप बांधा तुझा
जणू शिल्प साचा
कमनीय काया कांती तेज चंद्रावाणी
तेज चंद्रावाणी
शाल्मली ग राणी...
शाल्मली ग राणी
हो.....
हे द्येवी sssss
होकार सांग देशिल का ग
सांग माझी होशिल का ग
होकार सांग देशिल का ग
सांग माझी होशिल का ग
येईल जीवनी का सांग तुझी फूलदाणी
तुझी फूलदाणी
शाल्मली ग राणी...
शाल्मली ग राणी
शाल्मली ग राणी
हो.....
हे द्येवी sssss
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे.
पुणे.
शुभकृत नाम संवत्सर, उत्तरायण, शिशिर ऋतु.
मिती : माघ शुद्ध तृतीया. शालिवाहन शके १९४४.