मनात आले, सांगून टाकले.........'
...........................................................
विश्वास आजही ' जिवंत ' आहे......!
.............................................................
एखादा माणूस काळा कोट टाय आणि वकिलाच्या कपड्यात दिसला कीं आपण त्याला वकीलच मानतो.
' मी वकील नाही ' असे तो म्हणत नाही तो पर्यंत आपण त्याला नक्कीच वकील समजत राहतो.
आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो. तो देईल ते औषध घेतं राहतो. त्याने खरोखरच डॉक्टरची पदवी घेतलीय काय कुठे विचारतो ?
प्रत्येक गोष्टीत संशय घेता येतं नाही. विश्वास हा ठेवावा लागतो.असा संशय घ्यायला लागलो तर काम करणे अशक्य होऊन जाईल. कोणावरही, कसाही आंधळे पणाने विश्वास टाकायचा तरी कसा? टाकावा तरी कसा? कितीही खरे असू द्या. विश्वास टाकावा लागतो.
खोट्याची दुनिया आहे ही सारी हे सरसकट सत्य नसावे. तुमचे बोल कितीही बोचरे असले तरी काही जणासाठी जरूर टाकावू असाल. सर्वासाठी नाही. कुणा एकावर विश्वास ठेवायचा तर घाबरायला होते माणसाला.
स्वतःलाच स्वतःच्या कामाविषयीं संशय असेल खात्री नसेल तर असे लोकं विश्वास ठेवायला चाचपडतात. खोटे बोल पण रेटून बोल यावर विश्वास अधिक काळ टिकत नाही. असे लोकं काही काळातच उघडे पडतात.
' मी केले हे ' ' माझ्यामुळे झाले हे ' खूप वलगना करतो आपण. तुम्ही एकटे काहीच करु शकत नाही.साधी टाळी वाजवायची झाली तरी दोन हात एकत्र यावे लागतात. म्हणून म्हणतात ' एका हाताने टाळी वाजत नाही '
आपल्या सहकार्यावरला वरला विश्वास महत्वाचा असतो. हा विश्वास ठेऊन चालत नाही. प्रकट व्हावा लागतो. व्यक्त व्हावा लागतो. बोलण्यातून चालण्यातून तो तसा दिसावा लागतो. विश्वास ठेवण्याआधी स्वतःत आत्मविश्वास असावा लागतो. तो असला तर तुमच्याविषयीं विश्वास येतो समोरच्याला. आत्म विश्वासाने तुमच्या ठायी राहायचे तर कठोर निश्चयी मन आसावे लागते. ' निश्चयाचे बळ तुका म्हणे मिळते नक्की फळ '
तुमचे दुकान असेल तर ग्राहकांचा विश्वास महत्वाचा. तो मिळवावा लागेल. तुम्ही एखाद्या कंपनीत उच्च अधिकाराच्या पदावर नोकरीं करत असाल तर तुमच्या वरीष्ठाचा तुमच्या खांद्यावर एखादी जबाबदारी दिली तर तुम्ही ती समर्थपणे पेलणारच असा विश्वास तुमच्या वरिष्ठाना तुमचेविषयी निर्माण व्हायला हवा. नव्याने नोकरीस रुजू झालेल्या ' तुम्ही दिलेले काम करू शकाल कीं नाही ' ना तुम्ही खात्रीने सांगू शकता ना तुमचे वरिष्ठ.बॉसने जबाबदारी टाकल्याशिवाय विश्वास निर्माण होतं नाही. आणि विश्वास टाकल्याखेरीज आपण समोरच्यात विश्वास निर्माण करू शकत नाही. असे एकमेकाच्या सहकार्याने सोडवायचे गणित. दुकानात गेल्यावर एखादी वस्तू घेताना त्या वस्तूच्या टिकाऊपणाविषयीं विक्रेता ग्राहकांच्या मनात ' हीच वस्तू का घेतली पाहिजे या विषयी विश्वास निर्माण करत असतो.
रेडिओ सिलोनवर प्रख्यात निवेदक अमीन सायानी यांच्या बिनाका टूथपेस्ट ची जाहिरात त्यांच्या कौशल्याच्या त्या पेस्टबद्दल विश्वास निर्माण करण्याच्या शैलीने सगळ्यांची विश्वासार्ह झाली. आठवते ना?
एकदा अमीन सायांनी ह्यांना पत्रकारानी प्रश्न केला,
' तुम्ही पेस्टसह इतर जाहिराती इतक्या उठावदार कश्या करता ? ' क्षणाचाही विचार न करता अमीनजीनी उत्तर दिले,
' मी जाहिरात करायच्या आधी प्रत्येक गोष्ट वापरून बघतो. त्या वस्तूच्या दर्जाविषयी खात्री विश्वास पटला तरच मी त्या वस्तूची जाहिरात करतो. मिळणारे पैसे हे एक कारण आहेच पण पैसे घेऊन लोकांची फसवणूक करणे पटत नाही. विश्वासपात्र वस्तूची जाहिरात करतो. '
आपण शिकवतो ते बरोबरचं शिकवतो आहोत यांची त्याला आधी खात्री असायला हवी. अश्याच शिक्षका च्या विषयी विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण होतो. शिक्षकाला विषयाचा अभ्यास किती आहे समोर बाकावर कान लाऊन बसलेल्या विद्यार्थ्याला अचूक कळते. हेडमांस्तरांना आकलन असतेच. खात्री असते. विद्यार्थ्याला विश्वास असतो. हा विश्वास संबंधित शिक्षक निर्माण करत असतो. हाच किणत्याही दर्जाच्या विद्यार्थ्याला उत्तम, सराईत पणे हाताळू शकतो. एक विदेशी विचारवंत कार्लाईन म्हणतो,
' तुम्ही तुमच्या विचाराद्वारा तुमचे भाग्य बदलू शकता.'
वामनराव पै पण अगदी तेच सांगतात ' विचार बदला, भाग्य बदलेल '
अंगात काही करायचा धो धो उत्साह आहे. नुसता उत्साह असून भागत नाही. अनेकांची खात्रीची, विश्वासाची साथ लागते. ' हम तुमारे साथ है ' हे वाक्य त्यासाठीच.' साथी हात बढाना ' हा आणखीन एक विश्वास देणारा विचार. विश्वास टाकून पहिला कीं सहकार्याचा हात पुढे येतो.
पानिपतमध्ये विश्वास गेला म्हणायची एक रीत आहे.अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य हेच आहे....
विश्वास आजही हयात आहे. मनामनात जिवंत आहे.
..... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.