Bluepad | Bluepad
Bluepad
मैत्री मेळावा.... गेट टू गेदर...
Sagar Ambre
Sagar Ambre
23rd Jan, 2023

Share

मैत्री ही एक अखंड वाहणारी उर्जा आहे. काही वर्षांपूर्वी मित्र मैत्रिणींची स्नेहसंमेलन व्हायची. आजची तरुणाई त्याला गेट टू गेदर असे म्हणतात. मैत्री हे माणसाला मिळालेले वरदान आहे. मानसशास्त्रीय कसोट्यांचा विचार करता ते एखाद्या औषधांपेक्षा कमी नाही, किंबहूना ते एक औषध असल्याचे मानसशास्त्रज्ञ मान्य करतात. मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारची बंधने नसतात ना कोणती सक्ती. त्यामुळे कायमच मित्रांच्या संपर्कात राहून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. मैत्रीत आपला वेळ वाया जात नसतो उलट आपण मनाला ताजेतवाने करत असतो. मित्रांसाठी वेळ आणि पैसा खर्च करा. पैशाची उधळण नको मात्र आनंदासाठी मनसोक्त पैसे आणि वेळ खर्च करा.
मैत्री मेळावा.... गेट टू गेदर...
आपले आयुष्य किती हे कुणालाच माहीत नसले तरी मर्यादित मात्र आहे हे नक्कीच ठाऊक आहे. आज मानवाचे जीवन इतके व्यस्त झाले की कुणाच्याही जीवनाचा अंत कधी होईल हे माहीत नाही. आपण आपल्या आयुष्यात कितीही कमाई केली तरी आपल्या सरतेशेवटी रिकामेच जायचे आहे याचे भान न ठेवता फक्त माणसं पैसा पैसा करत आहेत.
जगातील प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा आहे. तरीही आपण जीवनात काटकसर करत जगत असतो. जीवनाचा आनंद घेण्यासाठी जिथे करायचा तिथे खर्च करायला हवाच. ज्यातून आपल्याला आनंद मिळतो त्यासाठी तर नक्कीच करायला हवा, मात्र आपली आवड ही संस्कृती असायला हवी विकृती असता कामा नये. कदाचित आपल्याला पटणारं नाही मात्र यातील आपणांस १० टक्के जरी जमले तरी आपण आनंदाने शहारुन जाऊ हे मात्र नक्की. भविष्याचा विचार न करता आपले पुढे काय होणार याची चिंता न करता आनंद घ्यायला हवा आणि असा निश्चल आनंद फक्त मैत्रीतच मिळू शकतो. आयुष्याचा आणि स्वतःच्या पैशाचा आनंद घ्यावयाचा असेल तर मैत्री अनिवार्य आहे.
घर, कुटुंब, संसार याची काळजी करत बसू नये मात्र जबाबदारीचे भान ठेवावे. वयात आलेल्या किंवा येणाऱ्या मुलांबाबत जास्त विचार करत बसू नये. त्यांना स्वतंत्रपणे स्वतःचा मार्ग निवडण्यास मदत करावी. त्यामुळे आपल्या मुलांसोबत आपले नाते अधिक दृढ होते. मुलांना तुमच्या आशा अपेक्षांचे ओझे करु नका. त्यामुळे कदाचित ती तुमची स्वप्ने पूर्ण करतील मात्र ते तुमच्या स्वप्नांचे गुलाम असतील. मुलांना तुमच्या स्वप्नांचे गुलाम कधीही बनवू नका. त्यांना मैत्री पूर्ण आणि सलोख्याने वाढवा. मैत्री हे असे रोपटे आहे त्याला फक्त निरपेक्ष भावनेतून जोपासले की ते नक्कीच बहरते. आयुष्यात मुलं तसेच आपला जीवनसाथी यांना प्रेम द्यायला कधीच कमी पडू नका. वेळप्रसंगी त्यांना भेटवस्तूही द्याव्यात मात्र असे करताना आपली स्वतःची आवड जोपासण्यास दुर्लक्ष करु नका. मैत्री हे एक अदभूत रसायन आहे त्याचा आस्वाद अविरत घ्या. अनेक समस्यांना हसत हसत सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा आपल्याला मैत्रीच्या ऋणानुबंधात मिळत असते.
पैसे कमावण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करणे म्हणजे जीवन नाही. तुमचे वय किती ही बाब मैत्रीसाठी गौण ठरते. कोणत्याही वयातील मैत्री जो आनंद देते तो आनंद कितीही पैसे खर्च करुन मिळणार नाही. आपले जीवन योग्य आणि दर्जेदार (दर्जेदार म्हणजे विविध सुखसोयींनी युक्त नव्हे) जगण्यासाठी जीवनशैलीत बदल करणेही आवश्यक आहे. पैसे कमविण्यासाठी जीवनातील आंनद देणाऱ्या बाबीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आपल्या जीवनाकडे दुर्लक्ष करुन पैसा कमविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, कारण आता खूप पैसे मोजून सुध्दा चांगले शरीर मिळत नाही. आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी आपल्या गरजांची नोंद घेवून काहीतरी गरजवंताला देण्याची वृत्ती ठेवणे आवश्यक आहे. त्याने तुमच्या संचितात भरच पडेल. कोणता व्यक्ती कोणत्या प्रसंगात देवदूत बनून येईल सांगता येत नाही. आपल्याकडे कितीही जागा जमीन असली तरी आपल्याला किती अन्न लागते हे सर्वांना ज्ञातच असते. तरीही हाव काही सुटत नाही हे चांगले नव्हे. आपल्या आयुष्यात बरेचसे आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. आपला स्वभाव हा स्वच्छ, दिलखुलास आणि प्रगल्भ असेल तर मात्र आपण कायमच ताजेतवाने आणि खेळकर वृत्तीचे आणि सुदृढ राहू यात शंका नाही. आपण कायम प्रफुल्लित राहू त्यामुळे आनंदी राहू. जे चांगले आहे त्याची जोपासना केली पाहिजे. त्यामध्ये मित्र मैत्रिणींना अग्रक्रम द्यावा. मैत्री ही टॉनिक आहे त्याची कायम आपल्याला आवश्यकता आहे. मैत्रीला कधीही अंतर देऊ नका. मैत्री जपणे ही काळाची गरज आहे. मैत्रीला जपणे आवश्यक आहे. कोणाच्याही टीकेचा विचार करत बसू नका. माणसं टीका करत असतात त्यांना बोलायचेच असते. कोणाच्याही टिकेने व्यथित होऊ नका. तुमच्या मित्रांना मैत्रीणींना कधीही विसरु नका त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र-मैत्रीण नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. त्यासाठी रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकमेकांच्या कायमच संपर्कात रहा. आनंदी राहण्यासाठी एकमेकांना हसवत रहा. स्वतःही खूप हसा. हसणाऱ्याला मुक्त दाद द्या. आयुष्य मजेत आणि मनासारखे जगण्याचा प्रयत्न करा. शेवटी साऱ्या गोष्टी या प्रेम आणि आपुलकी यामध्ये समाविष्ठ असतात. त्याचा आस्वाद घ्यावा. राग, लोभ घातक आहे त्यापासून दूर रहा. आयुष्यात संकटांचा सामना करायला शिका, संकटे क्षणभंगुर असतात. संकटात जिवलग मित्रांचा सहारा घ्यायला विसरु नका आणि आपल्या मित्राला सहाय्य करायला मागे राहू नका. शेवटी मैत्री ही निरंतर वाहणारी ऊर्जा आहे हे लक्ष्यात असू द्या. त्या ऊर्जेचा प्रकाशात प्रकाशमान व्हा. जीवन प्रकाशमय करा....

1 

Share


Sagar Ambre
Written by
Sagar Ambre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad