आज ह्यांचा लहानपणीचा मित्र नंदू आमच्या घरी आला, बडबड्या मोकळा स्वभाव त्यामुळें मैत्री टिकून राहीलेली. ( तुम्ही जेवढं मोकळ बोलता ना, तेवढे मित्र- मैत्रिणी वर्तुळ वाढतं जातं....मनातल्या मनात बोलणारे भरपूर असतात, पण मनातलं बाहेर मोकळेपणे मांडणारे आणि आपलं ऐकून घेणारे....कमी भेटतात).
बेस्ट मधून निवृत्त झालेला मित्र सांगत होता, ' आलेला पैसा गाठीशी ठेवलाय रे आपला आपल्यासाठी. मुलाचे लग्न केलं तो बडोदा येथे नोकरीला आहे, सूनबाई डेंटिस्ट आहे पणं पुण्यातून आलेली ती अजून बडोदा येथे रुळायची आहे. आम्ही लग्नानंतरच पहिली संक्रांत म्हणून गेलो रे, तिचे आईबाबा आणि मी आणि बायको, माझ्या २५ वर्षाच्या लेकीला माझ्या आईजवळ ठेवलं, आई ८१ वर्ष वय, कुठे जात येत नाही पण घरातल्या घरात सगळं करते. तिला बडबड करायला कोणीतरी लागत, मी रिटायर झाल्यावर घरीच असतो मग आता तिला एवढी सवय झाली की कुठे गेलो की तिचे चार फोन येतात ' घरी कधी येतोस? ' तिला सांगून येतो मी आज मित्राकडे जातोय, बरच बोलणार आहे तेव्हा एक ते दिड तास लागेल, फोन करू नकोस. बायको नोकरीला, मुलगी नोकरीला, मीच सापडतो तिला. '
' वहिनी मला चहा चालेल बाकी काही नको, पणं ठेवलात सामोरं तर खाईन '. हे बोलल्यावर मलाच हसायला आले. अशी मोकळी माणसं कमी भेटतात, जेवढ्या गोष्टी समोर ठेवल्या त्या सगळ्यांना दाद देणं.... प्रत्येकाला नाही जमत. हा मला वाटतं स्त्रीचा सन्मान आहे, तुमच्या पाकाकलेला दाद असते....नाहीतर काही असतात, ' तस बर झालंय पणं आम्ही ना हे टाकतो ह्याच्यात, त्याने अजून छान होत ' , म्हणून बकणा भरणारे असतात. आपण विचारात ' मधुरा रेसिपी मधून बघून केलं तेव्हा तिने का नाही सांगितलं....हे टाका म्हणून, आता पुढच्या वेळी.'
नंदू पुढें सांगतं होता ' बायको नोकरीला कंटाळली रे, अजून सहा वर्ष रिटायर व्हायला आहे, मुलीचं लग्न ठरलं तर खर्च होणारं तो पगाराच्या पैशातून ( त्याला वाहता पैसा म्हणतात हे मला आज कळलं) झाल तर आमचं सेविंग होईल, पुढच्या आयुष्यात बर ना रे, मुली खूप खर्च करायला लावतात लग्नात....म्हणून बायको अजून नौकरी करतेय. लेकाला सांगितलं तू परदेशात जायचं बघ पणं त्याने सरळ सांगितलं ' इकडे जवळ आहे बडोदा, तीन तासावर, तुम्ही येऊ जाऊ शकता, परदेशात गेलो की मी परत येणारं नाही, तुम्हाला मान्य आहे का? मग सांगाल आता परत ये, तूझी गरज आहे तर नाही चालणारं.... तुम्ही ठरवा जाऊ का नको? माझी आई मला ओरडली ' दोन घास खाऊन, बचत करुन, सुखी आहेस ना बास झालं, तो मुलगा तुला डोळ्यासमोर दिसतोय तर कशाला दळभद्री विचार करतोस त्याला परदेशात पाठवायचे... तुझें सूख तुलाच बघवत नाही का?'. गप्प बसलो मी. नवीन सूनबईने सांगितलं ' मी आई वडिलांची एकुलती एक कन्या आहे, त्यांना बघणं माझे कर्तव्य आहे, मी परदेशात गेलीं तर कोणाच्या जीवावर त्यांना सोडून जाऊ? मी जाणार नाहीं.'. ( कौतुक वाटलं त्या मुलीचं आणि मुलाच्या विचारांचं).
बोलता बोलता नंदू म्हणाला ' अरे माझ्या भावाने गुहागर मध्ये रिसॉर्ट काढलं आणि advertisement दिली ' ईथे सर्व प्रकारची दारू, मांस, मटण मिळेल पणं रूम मधे तिथून बाहेर येऊन धिंगाणा घालायचा नाही, लोकांना किंवा आम्हाला त्रास झाला तर तुमचे हॉटेल रूम चे पैसे डबल द्यावे लागतील. आम्ही खरंतर कोकणस्थ ब्राह्मण, मला वाटलं ह्याला कस जमेल... मास, मच्छी, पणं त्याने मालवण मधून कूक बोलावून त्यांची राहायची सोय करून, सगळं छान थाटले आहे. पुणे, सातारा वाले लोक भरपूर येतात, त्यांना समुद्र नाही आणि ताजी मच्छी नाही. चांगलं चाललंय त्याचं. आम्ही गेलो की माश्याचा घमघमाट असतो. कसा तो राहत असेल रे, आम्हा ब्राह्मणांना कधी एवढा वास सहन नाही झाला, त्याने किती compromise केलं असेल, कौतुक आहे त्याचं. ( मी मनात म्हटल म्हणून तर आमची मच्छी महाग झाली, शंभरला मिळणारे बोंबील दोनशे झाले). काय बोलणार, आपलं दुःख आपल्याला.
' वहिनी मुलांना आपल्या बरोबर कधीही ठेऊ नका, माझा मोलाचा सल्ला...त्याला पणं डाळ, भात, भाजी कितीला पडते, घर स्वच्छ कसे ठेवायचे, कपडे दररोज मशीन मधे टाकले पाहिजेत अश्या सगळया गोष्टीच उलगडा होत जातो आणि मुलं सुधारतात...इकडे पूर्ण दिवस मोबाइल मध्ये असायचा, मी आणि बायको थकून आलो तरी चहा पणं नाही करायचा, दिवसभराचा पसारा आम्ही साफ करायचो, आता काय सुधारला आहे, सगळं घर साफ, सकाळचा चहा नाष्टा तो बनवतो, भाज्या आणतो, अगदी पीठ संपलं आहे ते पणं माहित होत त्याला... बर वाटल मुलाची प्रगती बघून. '
एवढं सगळं ऐकल्यावर माझे कान तृप्त झाले..... माणूस सहज बोलून जातो, त्याचं मन मोकळं करतो, पणं माझे विचार चालू...माझा लेक एवढा कधि सुधारेल....लग्नाचं केल्यावर सुधारलं पाहिजे अस नाही... आधी जरी हलकासा सुधारला तरी चालेल मला....
🙏 वंदना ❤️