राणीचंही मन गुंतलंय माझ्यात..
बडेबुढे कहते है,
"वह नहीं कहती कभी अपने दिलकी भाषा।
वह नहीं कहती कभी अपने दिलकी भाषा।
उसके मेहंदीके पीछे छुपी हुई, उसके दिलकी धड़कन, हलचल, और प्यार अनोखा,
बताती है उसके हाथकी दिलवाली रेखा।
और जगाती है प्रेम की नयी आशा।"
तिचे डोळे बोलतात, तिचे गाल काही सांगू पाहतात, आपण समजून घ्यायचं असतं ओठांच्या लोभस थरथरण्यावरून! अगदी तुम्ही तिचा मेंदीनं रंगलेला मोहक गुबगुबीत हात बघितला तर, शुक्र चंद्राचे उंचवटे, मधोमध असलेली तुकतुकीत अंत:करण रेषासुद्धा बोलू लागतात.
त्याचं काय आहे की प्रेमात पडलं ना, की सौंदर्य, शृंगार, विरह शब्दांत व्यक्त करायला शेरोशायरी मधेमधे लुडबूड करू लागते. 'मैं शायर तो नहीं..' म्हणत म्हणत 'ती, हसीना..' कालीदास, साहीर, नीरज, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर यांच्या काव्यजगतात मला फिरून यायला उद्युक्त करते. आता त्या जगतातलं सौंदर्य मनात रेंगाळतंच. रेंगाळणारच ना.
मग मन स्वत:ला कवी, शायर समजू लागतं. प्रेमोद्योगी होऊ लागतं. एकांतात तिच्या आठवणीत मनाला स्फुरुस्फुरू होऊ लागतं.
मनातनं उमलणारे शब्द कधी गुलाबाच्या रंगाला पिळून तिचे गाल रेखाटू लागतात. कधी डाळिंबाचा अर्क काढून तिचे ओठ रंगवतात. कधी मोगऱ्याच्या स्फटीक पांढऱ्या रंगानं तिचे डोळे रंगवतात. कधी एखादी मधमाशी मनाला गोडसं डसते आणि तिचा तो मधाळ दंश डोळ्यातल्या लाघवी बुबुळात उतरतो.
माझ्या कवीमनानं तर कम्मालच केली. तिच्या लुसलुशीत हातावर रंगलेल्या मेंदीच्या कोरीव रेषेतून लपत छपत डोकवून बघणाऱ्या तिच्या अंत:करण रेषेनं दर्शन तर दिलंच. थेट तिच्या हृदयाशी संपर्कच साधून दिला !! कमाल आहे ना?
जणू एखाद्या निष्णात हस्तसामुद्रिकाप्रमाणे तिचा मेंदीचा नुसता हात पाहून पटापटा तिच्या हृदयातल्या प्रेमभावना कथन कराव्यात, तसे मन शब्दांत बोलू लिहू लागले.. !!
आणि ...
हातावरल्या रंगलेल्या खोडकर
रेखीव मेंदीआडूनं कुणी तरी म्हटलं...
हृदयातल्या प्रेमाचं तुझ्या,
गुपित सांगितलंय,
गालानंच दिलीय कबुली, कसं
तुझं मन माझ्यात गुंतलंय.
ए, सांग ना,
खरं ना,
मी ओळखलं ना,
काय वाटतंय तुझ्या मना,
लाजू नकोस,
टाळू नकोस
खरं खरं सांग ना..
हे तर खरंखरंच सांगताहेत ना
तुझ्या डोळ्यांतले लाजरे बुजरे भाव,
ओठांवर येऊ पाहणारे माझेच नाव!
मग कशाला बरं रोखायचं,
उगाच का प्रेम लपवायचं?
तो शब्दगोडवा हळुच का होईना
माझ्या कानांवर पडू देत ना
त्या आनंद वर्षावात मला,
सुखनैव न्हाऊ देत ना..
आधीच ठेवतोय हं सांगून..
ते सुख माझ्याकडे येण्यापासून
नाही हं रोखायचं.
हां .. वाटतंय तर पटकन् सांग,
की, तुलाही त्यातलं मधाळ सुख
आहे माझ्यासह चाखायचं?
कुठंतरी वाचलं ऐकलं होतं
अंत:करण म्हणे, हाताच्या
तळव्यावर
एका रेषेवर
टिपलेलं असतं.
तुझ्या मेंदीने रंगलेल्या हातावर
कोरल्या रेषेआडून त्याच का
रेषेचं दर्शन मला होत होतं?
तीच का ती अंत:करण रेषा
माझ्या हृदयात फुलवतेय आशा?
जा बाई जा,
नकोच काही सांगूस शब्दांत
रंगलेल्या मेंदीआडून ही मैत्रीण,
सांगते आहे सारं माझ्या कानात,
काय काय ... विचारतेस काय?
राणीचंही मन गुंतलंय माझ्यात,
होच मुळी..
राणीचंही मन गुंतलंय माझ्यात.. !!!
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,
पुणे.
शुभकृत नाम संवत्सर, उत्तरायण, हेमंत ऋतु.
मिती : माघ शुद्ध २, शालिवाहन शके १९४४.
सोमवार दिनांक : २३ जानेवारी