Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ ...
विश्वास बीडकर
23rd Jan, 2023

Share

शुभ सोमवार .
गाण्याला दाद देतांना ,
क्या बात है म्हणणं सहाजिकच आहे .
जेवणाच ताट समोर आल्यावर ,
" क्या बात है " असं म्हणायचा योग काल आला .
कोल्हापूरहून नरसोबाची वाडी ला गेलो होतो . एका अस्सल कोल्हापुरी मित्राने बजावलं होतं ,
दर्शन वगैरे घे पण जेवण सोमण यांच्याकडेच कर . त्यात ही जूने सोमण शोधून काढ . जागोजागी सोमण यांचं नाव दिसेल . त्यांना विसर आणि मुळ सोमणांकडे जा .
जेवणाच्या बाबतीत मी उष्ट्या हाताची आज्ञा ताबडतोब पाळतो .
दर्शन छान झालं . पुजारी महाराजांनाच विचारलं ,
" जुने सोमण कुठे असतात ."
हसत हसत त्यांनी खुणा सांगितल्या .
दाढीधारी सोमण भेटले .
" थोडं लवकर यायचं होतं .संपलं आता जेवणं . बाजूच्या हॉल मधली माणसं पंगतीची वाट बघत बसली आहेत ."
बायकोला ,
" लग्न करशील का ? " हे जेवढं आर्जवाने विचारलं होतं तेवढ्याच आग्रहानं सोमणांना विनंती केली .
" वाट बघायला लागेल .
अर्धा - पाऊण तास . "
बायकोच्या होकाराची वाट महिनाभर बघितली होती . सवय आहे वाट बघण्याची .
पंगतीत नंबर लागला . रितसर डावी बाजू आणि नंतर उजवी बाजू वाढली गेली .
गरम गरम भात त्यावर पिवळं धम्मक साधं वरण आणि पळीभर तूप . जेवणाचा फोटो काढणारयांचा मला एरवी राग येतो . काल ते भरलेलं पारंपारिक ताट पाहून आपोआप क्लिक झालं .
एका वाटीत सार . दुसरया वाटीत घट्ट बासुंदी . तिसरी वाटी रिकामी . पातळ घडीच्या पोळ्या आणि गरम पुरया . एकूण तिन भाज्या .वांग्याची , मिक्स आणि मटकी उसळ . वांग्याची भाजी तर उत्तम . रस्सा आणि वांगी , सुंदर शब्द आणि गोड चाल यांच्या सारखी एकरूप झालेली .
हे सगळं साग्रसंगीत आग्रह समवेत सुरू .
" अहो गरम आणल्या आहेत पुरया . घ्या की ."
बासुंदी म्हणजे तर वाडी ची सचीन तेंडुलकर ची बॅटिंग .
पोट आणि मन भरून आलं होतं .
कोशिंबीर , चटणी , लोणची देखील मस्त साथ करणारी .
नंतर आग्रह झाला तो मसाले भाताचा . अप्रतिम चव . रिकामी वाटी गोडसर ताकानी भरली .
तृप्त होणं म्हणजे काय याचा अनुभव घेतांना शेवटी पॅक केलेलं छान विड्याचं पान समोर ठेवलं गेलं .
परंपरा जपणं म्हणजे काय ते अवघ्या दिडशें रुपयांच्या देणगीद्वारे कळलं .
निघतांना विचारावसं वाटलं ,
" येता का सोमण साहेब आमच्या ठाण्याला . मांडुयात की पंगतं ! "
विश्वास बीडकर .
२३ जानेवारी २०२३ .

0 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad