।।षट् कर्णो भिद्यते मंत्र:।।
" हॅल्लोsss.."
" हेलोsssss, जरा हळू बोला.."
"कशी आहेस? पत्र मिळालं? वाचलंस? कसं वाटलं?"
"अहो, किती प्रश्न ते, सुचू तरी द्या. आणि हळू बोला. दाराआडून फिसकण्याचा आवाज येतोय.."
"फिसकण्याचा.. म्हणजे?
" जमल्यात एकेक, साळकाया माळकाया.. हसताहेत लपून, फिदीफिदी, कानोसा घेताहेत, आपण काय बोलतोय त्याचा. तुम्हीपण ना.. कशाला यावेळी फोन करता? टपलेल्या असतात छळायला.."
"अग पण.. तू पत्राचं उत्तरही लवकर पाठवत नाहीस. पाठवलं की काय चार ओळी... मी कसं..."
"आम्हाला नाही बाई येत तुमच्यासारखं लिहिता. कसं बाई सुचतं एवढं लिहायला !! आणि किती ते कौतुक !! एवढी काही सुंदर बिंदर नाही हं मी.. चारचौघींसारखीच तर आहे..."
"माझ्यासाठी तर जगातली एकमेव सुंदरी तर तूच..."
"बस बस.. अहो केवढ्यांदा बोलताय.. तिकडं ऐकू जातंय वाटतं.. नंतर फोन कराल का? आता, दिवसभर छळ मांडतील नुसता.."
"काय काय विचारतात ग .. साल्या....
"ऊं sss काय म्हणालात..?"
"अं..सॉरी सॉरी.. ए पण, काय विचारतात गं?"
"......"
" ए हॅल्लोsss"
" नको, भेटल्यावर सांगेन.."
" नाही आत्ताच सांग. तू इकडं यायला वेळ लागणार. मग आपण कधी भेटणार? एकांत कधी मिळणार? आत्ता इथे आपण समोरासमोर आहोत असंच समज ना. बोलतो तर आहोतच ना एकमेकांशी.."
" हं... तुम्ही थोडेच ऐकणार..?"
"ऐका... कशा न् काय काय विचारतात ते.."
"......., एक तर गधडी तुमच्या सारखंच काहीतरी गाणं गायल्यासारखं विचारते आणि बाकी तिच्यापाठोपाठ..."
"ए पण तू सांगत नाहीस ना?"
"छे हो.."
"शूss सांगायचं नाही हं कुणाला.. फक्त आपल्या दोघांतच हं. ते म्हणतात ना,'षट् कर्णो भिद्यते मंत्र:' गुप्तता कानातून सहा कानांत गेली की फुटते, म्हणतात."
"छे हो.. पण बघा ना तुमची एवढी मोठ्ठी पत्रं आली की मला कुणासमोर वाचताच येत नाहीत. गुपचूप कुठेतरी जाऊन वाचावी लागतात. आणि मग मैत्रिणी पिच्छाच सोडत नाहीत. नुसत्या पीड पीड पिडतात. एकामागोमाग एक प्रश्न.. काय उत्तरं द्यायची तरी? नुसत्या छळतात.... !!"
"येतोय मला अंदाज.. मी सांगू का, काय कसं विचारत असतील त्या.."
"सांगा... एक मिनिट हं, आधी सगळ्यांना हुसकते.."
.........
" हं... सांगा.."
''पत्रांतून हसरी प्रीती फुलता,
सांग सजणाने काय लिहिले?
सांग ना ग सजणाने काय लिहिले?
हृदयांतरी ग सांग शाल्मली,
प्राणनाथ जो बैसला गडे
शराब तिथली नशिली पिउनी
तुझीच नशा की त्यास चढे?
खोड्या काढि का ग तव तो
शेर शायरी कि ऐकवि तुजला
खुदुखुदू हसुनी काय लिहिशी
सांग तुझा का, तोही लाजला?
आढेवेढे नको, सांग ना
प्रेमखतातुनि काय दडे
ओढ लागली काय भेटीची
का त्यालाही ना चैन पडे?"
"इश्य....तुम्ही किनई अगदी हे आहात बाई.. कसं सुचतं.."
............
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,
मांडवगण.
शुभकृत नाम संवत्सर, उत्तरायण, हेमंत ऋतु.
मिती : माघ शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४४.
रविवार दिनांक : २२ जानेवारी २०२३