आज मी सात अनमोल रत्नांविषयी व्यक्त होणार आहे. रत्न म्हटली कि बोटात किंवा गळ्यात किंवा कानात घालणारी रत्ने पटकन डोळ्यांसमोर येतात. पण हि सात रत्ने वेगळी आहेत. चला तर मग पाहुयात "मानवी जीवनातील अनमोल सप्तरत्ने"
रत्न १ले
"माफी"
"आय एम सॉरी".. तसे हे छोटेसे वाक्य, परंतु अनेकदा आपण माफी मागत नाही किंवा माफ हि करत नाही. 'अहंकार' ह्या गोष्टींमुळे आपण माफी हे रत्न समजू शकत नाही. एखाद्याकडून चूक घडली तर त्याला माफ करणे दोघांच्याही हिताचे असते. पण घडते असे कि मनुष्य डोक्यात राग धरतो व स्वतःला आणि समोरच्याला त्रास देतो. एखादी व्यक्ती चुकली असेल तर त्या व्यक्तीची चूक त्याला एकांतात दाखवून द्या व त्याला माफ करा.. चूक अक्षम्य असेल तर त्या व्यक्तीशी संबंध कमी करा,किंवा ठेवू नका. परंतु जेंव्हा व्यक्ती आपली चूक मान्य करते तेंव्हा त्याला माफ करणे उचित ठरते. रोज रात्री झोपताना खालील दोन वाक्यांचा प्रयोग करून बघा.
"आज मी कोणामुळे दुखावलो गेलो असेन तर त्या व्यक्तीला मी माफ करतो आणि आज मी कोणाला दुखावले असेन तरं त्याची मी माफी मागतो."
रत्न २रे
"विसरा"
'१० वर्षांपूर्वी अमुक दिवशी तमुक ठिकाणी अमक्या व्यक्तीसमोर तू मला असं म्हणाला होतास.' मानवी मेंदू हा संगणक आहे. त्यात चांगल्या गोष्टी किती साठवायच्या आणि वाईट गोष्टी किती हे ठरवायला हवे. ज्या व्यक्तीवर आपला जीव असतो अश्या व्यक्तीने जर मनाविरुद्ध कृती केली तर ती गोष्ट मनाला लागण्यासारखी आहे. परंतु गोष्टी विसरायला सुरुवात करा. 'समोरची घटना,व्यक्ती अथवा परिस्थिती मी बदलू शकत नाही' हा फॉर्मुला जेंव्हा आचरणात आणण्यास सुरुवात होईल तेंव्हा विसरा ह्या रत्नाचा परिणाम होऊ लागेल.. वाईट घटना,परिस्थिती अथवा व्यक्ती ह्यांना मेंदूरूपी संगणकातून कायमचे डिलीट करा; अथवा अश्या गोष्टी व्हायरस रुपी तुमचा मेंदू हँग करू शकतात.
रत्न ३रे
"विश्वास"
"विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही जेवढ्या जास्त चुका कराल तसा तो कमी होईल." इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः वर विश्वास जास्त ठेवा कारण स्वतःला समजून घेणं हि सगळ्यात कठीण गोष्ट आहे. त्यामुळे आधी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. स्वकष्ट आणि निसर्ग ह्या दोन गोष्टींवर अतूट विश्वास असेल तर यश नावाची पावती नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल.
रत्न ४थे
"नातं"
ह्या जगात कोणीही कोणासाठी कायमस्वरूपी नाही. परंतु ज्या काळासाठी आहोत त्या काळात नाती जपता आली पाहिजेत. नातं म्हणजे रक्ताचंच नव्हे. दैनंदिन व्यवहारात आपल्याला भेटणाऱ्या सर्वांशी आपलं एक नातं हवं. समोरच्याशी प्रसन्न राहून संभाषण करणे, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा, भावनांचा विचार करणे आणि आदर करणे हे खरे नाते. आदर,प्रसन्न संभाषण करत असताना कधी कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. जवळ येण्यासाठी काही वेळा दूर जावं लागत. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट हि कि कधीही जबरदस्तीने नातं निर्माण करू नका.
रत्न ५वे
"दान"
कलियुगात प्रत्येक जण आपली तिजोरी भरण्यासाठी पळत आहे. दान हि गुप्त गोष्ट आहे. उजव्या हाताने केलेलं दान हे डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नये. दान केल्याने धन कमी होत नाही तर धनाची वृद्धी होते, मान मिळतो. स्वकमाईच्या "२०%" रक्कम हि दान केल्यास अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. दान हे पैश्यांच्याच स्वरूपात करायला हवे असे नाही. ज्ञान,पुस्तके,वस्तू इत्यादी गोष्टींचे दान करू शकता. आणि दान करीत असताना गरजू व्यक्तीलाच दान करावे. भिकाऱ्याला दिलेले पैसे अथवा भोजन हा दानाचा प्रकार नाही.
रत्न ६वे
"आरोग्य"
आपल्याला मिळालेलं शरीर हा एक ड्रेस आहे जो आपल्या आत्म्याला आपल्या काही वर्षांच्या आयुष्यासाठी वापरायचा आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ सुनिश्चित करत असताना शरीर आणि मन ह्यांच्यासाठी १ तास कमीतकमी वेळ काढणे अनिवार्य आहे. 'सर सलामत तो पगडी पचास.' शरीर आणि मन निरोगी राहिले तरच तुम्ही आयुष्य छान जगू शकता. तुम्हाला जन्म देणारा (आई-बाबांव्यतिरिक्त अशी उच्चशक्ती) वरून पाहत असतो, तुमचे निरीक्षण करीत असतो. त्या मुळे मिळालेल्या शरीराचा वापर योग्य प्रकारे करा. व्यसन करून शरीर जाळण्यापेक्षा व्यायाम,प्राणायाम,ध्यान करून शरीर व मन बळकट व निरोगी बनवा
रत्न ७वे
"वैराग्य"
माणूस जन्माला येतो तेंव्हाच त्याच्या मृत्यूची तारीख,वेळ,ठिकाण व कारण निश्चित झालेले असते. "जन्म" आणि "मृत्यू" ह्या दोन अटळ गोष्टी आहेत. वरील ६ रत्ने वापरत असताना ह्या रत्नाचा वापर अधिक करा. काल काय घडले किंवा उद्या काय घडेल ह्यात आज आपला आपण हरवून बसतो. प्रत्येक दिवस हा नवा-कोरा करकरीत असतो. आदल्या रात्री झोपताना सर्व गोष्टी क्लोज करायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नव्याने सुरु करायच्या. कालची भांडण,तंटे आज कॅरी फॉरवर्ड केले तर जीवनातील बॅलन्स शीट बॅलन्सड होणार नाही. रोज नव्याने सुरुवात आणि झोपताना अंत.
आपल्याला ज्योतिष हातात किंवा गळ्यात घालायला काही रत्ने देतात. परंतु ह्या ७ रत्नांचा वापर करायला मनुष्य शिकला तर मनुष्याचे जीवन सार्थकी लागेल.
अभिषेक रानडे
शोभिका आर्टस्