अशीच एक रात्र...... शब्दांनी जागवलेली.
अशीच एक रात्र...... शब्दांनी जागवलेली.
शब्दांशी बोलत असतो
शब्दांशीच खेळतही असतो
शब्दांत रमतो इतुका की
शब्दातंच हरवतही असतो..
कविता बनून भेटतात शब्दं
कधी गाण्यातून सूर जुळवतात
काहीच ना जमले कधी तर
लेखातून ते कागदावर बरसतात
शब्दांची भेट होता खुलतो मी
जसे कृष्ण खुलतो सुदामा भेटूनी
शब्दचं माझे सखा सोबती
या शब्दांचीच पडते भुरळ मज नेहमी
आरसा ही जेंव्हा पाहतो मी
शब्दांचीच होत राहते उजळणी
पाहून हसतो जेंव्हा मीच स्वत:ला
शब्दांचीच प्रतिकृती भासतो मी दर्पणी
इतुके एकरूप व्हावे शब्दांशी
विश्वासचं बसतो ना या मनी
मी श्वासं ही घेतो तेंव्हा पहा
शब्दचं बाहेर येतात उश्वासं बनुनी..
चेहऱ्याची ही तीच तऱ्हा म्हणावी
बोलण्या पूर्वीच सांगतात मनाची कहाणी
जणू शब्दचं आहेत लिहिले भाली
वाचतो हृदयाच्या जवळचा आपला कोणी.
अशीच एक रात्र शब्दांनी जागवलेली
वाटते या रात्रीची पहाटच न कधी व्हावी
शब्दांच्याच संगतीने मी माझी स्वप्ने
पुन्हा पुन्हा मनापासून हळुवार फुलवावी...
डॉ अमित.
गुरुवार.
१९ जानेवारी २०२३.