Bluepad | Bluepad
Bluepad
आमदारांचे अपघात सत्र
Amol Kale
Amol Kale
18th Jan, 2023

Share

मागच्या काही दिवसांत एक विचित्र बातमी वर्तमानपत्रात सतत वाचायला भेटत आहे ती म्हणजे,"अमुक नेत्याच्या गाडीला अपघात;तमुक आमदार झाले रस्ते अपघातात जखमी."
१४ ऑगस्ट २०२२ च्या सकाळी शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांचे रस्ते अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हादरून स्तब्ध झाला.त्यानंतर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला पहाटे फलटण येथे झालेला अपघात.त्यांना तातडीने पुण्याला आणून केलेले उपचार हा सारा घटनाक्रम आजही कुणीही विसरले नसेल.
गोरेंच्या अपघाताची चर्चा थांबते न थांबते तोवर दुसरी बातमी आली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धनंजय मुंडे यांच्या गाडीचा बीड येथे झालेला अपघात.त्यात मुंडेंच्या छातीवर लागलेला जबर मार आणि त्यांच्या महागड्या गाडीवरची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली होती.
तिसरी बातमी आली ती दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटाजवळ पाठीमागून डंपरने दिलेली धडक आणि त्यामागे असलेल्या घातपाताची शंका.
कदमांच्या बातमीवर उहापोह चालूच होता तोवर अजून एक ब्रेकिंग न्यूज आली ती आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अपघाताची.
रस्ते असोत वा इतर कोणत्याही प्रकारचे अपघात;अनेक सामान्य माणसं गतप्राण होत असतात.त्यावेळी दोन दिवसांची 'व्यवस्था अपयशा'ची चर्चा रंगते आणि पुन्हा
'मागील पाढे पंचावन्न' अनुभवास येतात.
इथे मात्र महाराष्ट्र राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यच जखमी होत असल्याने चर्चेचे गांभीर्य अधिक वलयांकित होते.
बरे तर,कोणत्याही 'माननीयांची' प्रवासी वाहने ही पन्नास लाखाच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची असतात तरीही अपघात होतात.एवढ्या किंमतीच्या वाहनांमध्ये सुरक्षेचे बरेच आयाम तपासून वाहन उपलब्ध करून दिले जाते तरीही वेळेअभावी रात्री-अपरात्री प्रवास करण्याचा हट्ट,बेफाम वेग,अनेकदा रस्त्यांची दुर्दशा,
अनावश्यक खड्डे,रस्त्यावर असलेले कमालीचे उतार,
जाहिरातीचे फलक आणि त्यामुळे अपघातास हमखास मिळणारे निमंत्रण आणि पुढील ओढवणारे दुर्दैव ही पारावरची चर्चा आता विधानसभा, संसदेत ऐकायला मिळाली तर नवल नको!
जोवर भारतात प्रत्येक जीव हा 'राष्ट्र उपयुक्त संपत्ती' समजली जात नाही तोवर वरील 'औचित्य प्रश्न' कितीहीवेळा 'शून्य प्रहर' गाजवून गेले तरी 'कायद्याशिवायचे नैतिक मूल्य' कुणाचेही सर्वलक्ष्यी सरंक्षण करू शकणार नाही किंबहुना त्याशिवाय 'आत्मभान येणे नाही.'
-अमोल काळे
आमदारांचे अपघात सत्र

186 

Share


Amol Kale
Written by
Amol Kale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad