Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग - हळदी कुंकू
वंदना गवाणकर
18th Jan, 2023

Share

आजचा विषय बायकांचा आहे पणं काही सांगावस वाटतं म्हणून, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विचार करावा ही विनंती. लहानपणापासूनच कुंकू लावणे ह्याची आपल्याला सवय असते, तेव्हा टिकली हा प्रकार नविन होता पण रंगीबेरंगी कुंकवाच्या डब्याच गोल भांड असायचं... लाल भडक पिंजर असायची... आपल्या डोक्यावर ते विराजमान व्हायचं आणि आपल्याला आवडायचं ते.
परवा फेसबुक वर वाचलं की एका शहीद सैनिकाच्या बायकोला हळदीकुंकवाला बोलावले, तिला विधवा म्हणून कुंकू लावलं नाही, तिचा हा अपमान तिने सर्वांसमोर मांडला.
कुंकू हे प्रत्येक स्त्री लग्नाआधी पासून लावते, मग त्याच्यावर नवऱ्याचा हक्क कसा? ते सौभाग्यच लेण नंतर झालं ना? मग तिने का नाही लावायचे कुंकू.... जो हक्क तिला मुलगी म्हणून जन्माला आल्यावर मिळालाय तो तिच्यापासून का हिरावून घेता ? स्त्रि स्त्रीच्या दुःखाला कारणीभूत का? आपण आपल्या सोयीने मॉडर्न वस्तू स्वीकारतो, साडीचे रूपांतर पंजाबी ड्रेस मगं maxi, gown सगळं बदलतो, बांगड्या रंगीबेरंगी, मोठें मंगळसूत्र काढून छोटे घालतो, कपाळावर टिकली नाही लावली तरं भांगेत सिंदुर घालतो. नऊवारी साडी नेसणयाची सवय असलेल्या बायका पणं पाचवारी पसंद करतात.....आपण पुढे चाललोय मग ह्या जुन्या पद्धती ......फक्त अश्या बायकांसाठी का ? ज्यांचा आधारस्तंभ आज आपल्या सुरक्षेसाठी मैदानात शहीद झालाय. तिने एकनिष्ठ राहून त्यांच्या बरोबरच्या नात्याला साथ दिलीय, तिचा हा अपमान का? कशासाठी? तुमच्याकडे आज जे आहे ते तिच्याकडे नाही म्हणून...
आपल्याला ना आपण सोयीस्करपणें बदलतो, त्याची कारणं देतो, मग दुसऱ्यांच्या बाबतीत अस का वागतो? परवा त्या अमृता फडणवीस, तिने गाणं गायलं, तिला म्हाशिपासून सगळ्याची उपमा मिळाली, तिच्या कपड्यावर कॉमेंट्स झाले, नवऱ्यामुळे पुढे आली म्हणून तिची लायकी काढली गेली....का? ( ती स्त्री आहे म्हणून तिला कुठल्याही पायरीवर जाऊन बोलू शकता? ) तुमच्या मुली पणं असे कपडे घालतात....तेव्हा आपल्या मुलीला बोलायची हिंमत किती पालकांमध्ये आहे... तुमची मुले पणं बाहेर जाऊन तंबाखू गुटखा, सिगारेट दारु सर्रास पितात, मुलींच्या बाबतीत कॉमेंट्स पास करतात, तेव्हा तुमच्यातली आईवडील म्हणून मुलांना समजवयाची नीतिमत्ता कूठे जाते.... ' आपला तो बाब्या...दुसऱ्याचा तो कार्टा '...
आज आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक घरातली स्त्री शिकलेली आहे, नौकरी, कामानिमित्त बाहेर पडते, तिला गळयात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली असली की सुरक्षित वाटतं ह्या समाजात ( कारणं प्रत्येक स्त्रीला बाहेरचं जग किती असुरक्षित आहे ह्याची जाणीव मनात असतें). विधवा बाईने स्वतः ला ह्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले, तर प्रत्येक स्त्रीने तिचा मान राखलाच पाहिजे, अस माझे मतं आहे. जून्या काळाचे लोकं त्यांची रीत किंवा रूढी सोडणार नाहीत...पणं आपण तर सगळं नविन्याकडे वळवतो, मग आपण का नाही काही वाईट रूढी बदलू शकतं. सर्व स्त्रिया ह्या मताने एकत्र आल्या तर...तुम्हीच विचार करा.....
परवा माझ्या मैत्रिणीच्या नणंदेचा नवरा गेला, ती म्हणाली ' बायका सांत्वनाला आल्या पण मंगळसूत्र काढा, बांगड्या फोडा आता ' ह्याच्याच मागे, बाईच्या मनाचा विचार नाही ' असं का घडतं? उत्तर देऊ शकाल? आपल्यात अशी वृत्ती येते कुठून....आपण तर पुढच्या शतकाकडे वाटचाल करतो, मग हे विचार मागे का नाही सोडू शकतं? तुम्ही सर्व बायकानीच सांगितलं की हीचं अस काही करायचं नाही, तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.... एवढी हिम्मत कोणात नाही. कुठला पुरूष त्याची बायको गेल्यावर स्वतचं काय वस्तू फोडतो... काढतो... सोडतो? काहीच नाही.. मग बायांनो... का नाही आपल्या भोवतीच्या ह्या प्रथांच्या रिंगणातून बाहेर पडतं?
नवीन पिढीला तुमचे नविन विचार द्या...तुमच्या मुलं मुलींना तुम्ही बदलेले दाखवा, मुलींच्या मध्ये आत्मविश्वास जागवा. उद्या कुठलीही स्त्री तिच्या नवऱ्याला युद्धावर जाण्यापेक्षा घरी बसून रहा सांगायला सुरुवात करेल कारणं त्याच्या नंतर तिचे होणारे अपमान... समाजातली वागणूक..... जबाबदार फक्त स्त्रियाच? नविन वर्षाची सुरुवात अश्या विचित्र ( ज्यात फक्त स्त्री भरडली जाते दुसऱ्या स्त्रीमुळे ) प्रथा सोडून करा...हीच विनंती
🙏 वंदना ❤️

232 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad