काल रात्री एका छोट्या टेम्पोच्या छताला काहीतरी अडकल्याचे चालकाच्या लक्षात आले. गाडीवर घुबड अडकून जखमी झाल्याचे समजताच काही तरुण गोळा झाले. त्यांनी घुबडाला खाली घेतले; पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. घुबडाने थोडं पाणी पिलं देखील. मात्र घुबडाच्या पंखाला जखम झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. आता प्रश्न पडला कि घुबड जखमी आहे; त्याला आकाशात भरारी घेता येत नाही, आता काय करायचे? घुबड म्हणजे वाईटाचे प्रतिक अशी समजूत असल्याने अनेक जणांनी पाठ फिरवली. मग निर्णय घेतला, रात्रभर त्याला आपण आपल्याच घरी ठेवू आणि सकाळी काय तो निर्णय घेऊ. घुबडाला घरी आणले. घुबक नेमके खाते काय हे माहित नसल्याने माझ्या समजुतीप्रमाणे मी धान्याची व्यवस्था केली. पाणी ठेवले. घरातल्या मुलांना घुबड पाहण्याची मोठी उत्सुकता होती. मात्र रात्री त्यांना कसेबसे थोपवले. सकाळी काही पत्रकार मित्रांशी चर्चा करुन पक्षी मित्रांना संपर्क केला, शेवटी वाळवा येथील पत्रकार महादेव अहिर यांच्या मदतीने वाळवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. प्रकाश कांबळे यांच्याकडून घुबडावर प्राथमिक उपचार घेतले. डॉक्टरांनी जखमी घुबडाला थेट अॅडमीट करुन घेतले. दोन दिवस त्याच्यावर उपचार करतो असे सांगितले. डॉक्टरांच्या एकूणच व्यवहारातून त्यांची पशुपक्षांविषयीची आवड आणि काळजी दिसून आली.
काल एका शासकीय ऑफिसात गेलो होतो. तेथील काही अधिकारी कर्मचारी माणसांच्या बरोबर कसे वागतात हे बघितले होते. त्यांच्या वागण्याची तुलना करता मला भेटलेेले जनावरांचे डॉक्टर ‘ माणूस ’ जाणवले. तसेच आमचे पत्रकार मित्र यांनी देखील एखाद्या माणसाला मदत करायला वेळ लावला असता; पण त्यांचाही प्राण्यांचे वर जीव असल्याचे त्यांच्या धडपडीतून दिसून आले. शेवटी काही गोष्टी जाणवल्या. काल काही लोकांनी घुबडाला पाणी पाजायचे देखील धाडस केले नाही. तर काहीजण घुबड म्हटल्यावर जवळही आले नाहीत. काही जणांनी मला त्या पक्षाला घरात ठेवू नका असाही सल्ला दिला, पण शेवटी विचार केला, हल्ली माणसांना मदत आणि उपकार करून त्यांच्या लक्षात ते राहत नाही. त्याची जाणीवही ते ठेवत नाहीत. मग या मुक्या प्राण्यांच्या वर भूतदया दाखवली तर काय बिघडले? किमान त्याचा तोटा आणि पश्चाताप तर होणार नाही. असो... तो सुंदर पक्षी लवकरात लवकर बरा होऊन आकाशात भरारी घेवो हीच सदिच्छा....
संदीप पाटील
सूर्यगाव
ता पलुस जि सांगली
9881338008