कार्यकर्त्याने
कार्यकर्त्याने...
सकाळी सकाळी चार रोट्या हाणाव्यात,
बाईक पंपावर नेऊन पन्नासचं पेट्रोल टाकावं,
थेट नाक्यावर येऊन पेप्रातली हेडलाईन वाचावी,
टपरीवर चहा पीता पीता देशाची चिंता करावी,
मोदीला, गांधीला, पवाराला, ठाकरेला चार शिव्या हासडाव्यात.
कार्यकर्त्याने.....
मोर्चा काढावा, रस्ता आडवावा, हाफीसांना घेराव घालावा,
एसट्या फोडाव्यात, टोलनाके तोडावेत,
कधी भैयांना, कधी मद्राशांना, कधी गुजरात्यांना नडावं,
कधी त्यांच्याकडुनच वर्गण्या घ्याव्यात,
जयंत्या, मयंत्या, उत्सव साजरे करावेत.
कार्यकर्त्याने.....
व्हाट्सअप वर, फेसबुकवर, ट्वीटरवर, फेक अकाउंट खोलावीत,
मेमे पोस्टावेत, अफवा पसरवाव्या, विरोधकांना ट्रोल करावं,
एकमेकांना भक्त, गुलाम, चाटे, चमचे म्हणुन हिणवावं,
एकमेकांची आयभैण एक करावी,
डोकी फोडावीत, फुलटू राडे करावेत.
कार्यकर्त्याने....
नाक्या नाक्यावर बॅनर लावावेत,
मोठ्या साहेबांना, दादा साहेबांना, बाळराजेंना मुजरे घालावेत,
हातात मीठ घेऊन इमानदारीच्या शपथा घ्याव्यात,
वडापाव खाऊन तुफान प्रचार करावा,
संध्याकाळी धाब्यावर श्रमपरिहार करावा,
कार्यकर्त्याने....
झेंडे मीरवावे, रॅली काढावी, सभेला गर्दि जमवावी,
घसा सुकेस्तोवर घोषणा द्याव्यात,
मतं फोडावी, खुन्नस द्यावी, बुथं कॅप्चर करावी,
खाडे मारून निवडणुका गाजवाव्यात,
नातीगोती, शेतीभाती, बाजुला ठेऊन पक्षकार्य करावे.
आम्ही आहोतच गणगोतासह सत्तेचे लोणी वाटुन खायला.......
- दयानंद पाटील
9699626864