ब्रेन ड्रेन थोपविण्यासाठी- परदेशी विद्यापीठांना भारतात एक संधी द्यायला हवी..... परदेशी विद्यापीठे भारतात येणार म्हटल्याबरोबर काहींनी विरोधाचे सूर काढायला सुरुवात केली असून परदेशी विद्यापीठ कसे भारतासाठी नको आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. याला विरोधासाठी विरोध म्हणतात. प्रस्थापित व्यवस्थेला धोका निर्माण झाला किंवा स्पष्ट बोलावयाचे झाल्यास ज्यांची दुकाने बंद होण्याचा धोका निर्माण झाला की असा विरोध केला जातो. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेला येणारी परदेशी विद्यापीठे हा पर्याय नसून भारतीय विद्यार्थ्यांसाठी संधी आहे हे विरोध करणारे पद्धतशीर विसरले आहेत. 1990 नंतर जर आपण जागतिकीकरण स्वीकारले नसते तर आज देशाची काय अवस्था झाली असती, अर्थातच देश जागतिकीकरणाच्या फायद्यापासून कोसो दूर राहिला असता. आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे याचे बऱ्यापैकी श्रेय जागतिकीकरणालाच आहे. ज्यांनी किंवा ज्या पक्षांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण याला नेहमी विरोध केला, जनतेने त्यांना नाकारले आहे. याचाच अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरणाचे सकारात्मक फायदे झालेले आहेत, होत आहेत. देशाची प्रगती सर्वदूर जर करावयाची असेल तर परिवर्तन स्वीकारण्याची तयारी असायलाच हवी. जागतिकीकरणाची भीती दाखविणारा एक वर्ग काही प्रमाणात आजही जिवंत आहे, जागतिकीकरणाच्या लाटेने भारतातले सारे मोडून तोडून विस्कटून जाईल अशी भीती दाखविली जाते. परंतु जागतिकीकरणाचा अनुभव घेतल्यानंतर जो आत्मविश्वास भारताने कमावला, जी भरारी घेतली त्यातच सर्व उत्तरे मिळाली. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर जागतिक दर्जाचे शिक्षण आवश्यकच आहे. कदाचित भारतातील बहुसंख्य विद्यापीठे अशा प्रकारचे शिक्षण देण्यास असमर्थ ठरले असावेत. म्हणूनच परदेशी विद्यापीठांचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आपल्यावर येत आहे. मुळात येऊ घातलेली परदेशी विद्यापीठे अजून पुरती आलेही नाहीत, त्यांचा अनुभव घेतला नाही. त्यांची रचना ही अभ्यासली नाही. तरीही या विद्यापीठाची भीती दाखविली जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांकडे आज स्वप्न आहेत, क्षमता आहे, काही संधी पण आहेत परंतु त्या पुरेशा नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना क्षमता असूनही प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही मग असे विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाचा पर्याय शोधतात आणि देश सोडतात. अशी गुणवत्ताधारक विद्यार्थी जेव्हा बाहेरील विद्यापीठात प्रवेश घेतात तेव्हा भारतीय ब्रेनड्रेन व्हायला सुरुवात होते,आणि त्याचे प्रमाण वाढत जाते. आज हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थी परदेशी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. याचे कारण भारतात अशा शिक्षण व्यवस्थेची उपलब्धता नाही. परदेशी शिक्षण स्वस्त आहे हे अर्ध सत्य आहे उलट जगात शिक्षण आपल्या देशात स्वस्त आहे. फक्त त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभी आहेत. हे प्रश्नचिन्ह काढून टाकण्यासाठीच परदेशी विद्यापीठे भारतात आणले जात आहेत. अशी विद्यापीठे भारतात आल्यानंतर कुशल व हुशार मनुष्य बाळाला आपण जागतिक दर्जा प्राप्त करून देणार आहोत. असे जागतिक दर्जाचे शिक्षण घेतलेले मनुष्यबळ उद्याचा भारत आजच्या पेक्षाही शक्तिशाली व सक्षम करण्यास मदत करतील यात शंकाच नाही. कुणी काही म्हटले तरी परदेशात शिक्षण घेणे अवघडच, तेथील वातावरण, तेथील संस्कृती कधीकधी होणारा तीव्र विरोध, तेथील कायदे या सर्वांचा त्रास सहन करीत आपले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन तेथे शिक्षण घेतात. अनेकदा भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झालेले, जीव गमावलेले प्रसंग आपण वाचलेले आहेतच. आता परदेशात भारतीय विद्यार्थ्यांना विरोध वाढत आहे, हे विशेष. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना देश सोडायला लागणे ही लांचनास्पद बाब आहे. परदेशी शिकत असलेल्या पाल्यांच्या आई-वडिलांची होणारी ससेहोलपट ती एक वेगळी समस्या या परदेशी शिक्षणातून निर्माण झालेली आहे. या सर्व समस्या जर टाळायच्या असतील तर परदेशी विद्यापीठाचे आपण स्वागत करायला हवे. आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी या विद्यापीठांना एक संधी द्यायला हवी. जागतिक दर्जाचे विद्यापीठ भारतात आले तर निकोप स्पर्धा सुरू होईल, स्पर्धा वाढेल. या स्पर्धात्मक परिस्थितीत सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला स्वतःमध्ये सुधारणा करावीच लागेल. या स्पर्धेमध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये स्पर्धा लागेल आणि या स्पर्धेचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. एकीकडे आपण म्हणतो थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली. मग परदेशी विद्यापीठांना विरोध का? विदेशी शिक्षण संस्थांना कोणतीही बांधिलकी असणार नाही, ते भारतीय कायदे जुमानणार नाहीत, त्यांचे शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना परवडणार नाही, ते शिक्षणाचा बाजार करतील, ते विद्यार्थ्यांची पिळवणूक करतील अशा प्रकारचे दोष सध्या येऊ घातलेल्या परदेशी विद्यापीठांचे सांगितले जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे उपरोक्त सर्वदोष आपल्या शिक्षणसंस्था मध्ये नाहीत काय? आजही भारतातल्या अनेक शिक्षण संस्थांची फीस लाखो नव्हे तर करोड मध्ये आहे,त्याचे काय? गरिबांसाठी गरीब शाळा व श्रीमंतांसाठी श्रीमंत शाळा हे धोरण कित्येक वर्षापासून अप्रत्यक्षपणे भारतात राबविले जात आहे. यावर संसदेत कधी चर्चा झाली काय? किंवा याला कोणी विरोध केला काय? आणि विरोध करणाऱ्यांची मुले कुठे शिकतात? या सर्व बाबी स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि मगच विदेशी विद्यापीठांना दोष दिला पाहिजे. मॅनेजमेंट कोटा काय असतो, त्यात अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांचा लिलाव होत नाही काय? डोनेशन मुळे आपल्या देशात दो-नेशन ( दोन राष्ट्र ) भारत आणि इंडिया निर्माण झाले नाहीत काय? अगदी केजी टू पीजी पर्यंत पालकांची आणि विद्यार्थ्यांची आर्थिक मिळून अनेक संस्था करतात हे सत्य नाही काय? कोचिंग क्लासेस वर घसरणारे महाभाग शिक्षण व्यवस्थेचे चिंतन करण्यापेक्षा कोचिंग क्लासेस ची चिंता जास्त करतात हे हास्यास्पद आहे. दर्जेदार शिक्षण द्या, कोचिंग क्लासेस संस्कृती आपोआप नष्ट होईल. परदेशी विद्यापीठे भारतात आल्यानंतर हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळेलच, परंतु जे प्रामाणिक भारतीय प्राध्यापक आहेत त्यांनाही या विद्यापीठात शिकवण्याची संधी मिळून विद्यार्थी व देश घडविण्याचे समाधान मिळणार आहे. नेमकी परदेशी शिक्षण पद्धत काय आहे? याचा उलगडा होणार आहे. चांगले विद्यार्थी चांगले प्राध्यापक हेच देश घडवीत असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाश्चात्य देश आहेत. पाश्चात देशाने शिक्षणाला संशोधनाची जोड दिल्यामुळे ते जगात श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखले जात आहेत. सर्वात जास्त शोध परदेशात लागलेले आहेत. याचे श्रेय तेथील दर्जेदार शिक्षणाला आहे. दरवर्षी नोबेल पारितोषिक जाहीर होतात. त्यात दुर्दैवाने अलीकडच्या काळात भारतीयांची संख्या नाही. अलीकडच्या काळात किती भारतीयांना संशोधनासाठी नोबेल मिळाले? त्याचे उत्तर नाही असे आहे. आज पर्यंत संशोधनासाठी सर्वात जास्त नोबेल पुरस्कार परदेशाला मिळालेले आहेत. त्याचे एकमेव कारण दर्जेदार शिक्षण आणि संशोधन आहे, असे असूनही मग परदेशी विद्यापीठांवर अविश्वास का? मुळात परदेशी विद्यापीठ भारतात येण्याची गरज का निर्माण झाली यावर मंथन होणेही आवश्यक आहे. उच्च शिक्षण हे केक वरील क्रीम सारखे असते पण केक जर बुरसटलेला असेल तर त्यावरचे क्रीमही उपयुक्त ठरणार नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास नुसता कप चांगला असून चालणार नाही, त्यामधील कॉफी सुद्धा दर्जेदार असावी लागते. आपल्याकडे इमारती आहेत पण शिक्षण नाही, विद्यार्थी आहेत पण दर्जेदारशिक्षण नाही, चांगले बोर्ड आहेत परंतु त्यावर उमटलेली अक्षरे विद्यार्थ्यांना समजतीलच असे नाही. एअर कंडिशनर स्टाफ रूम असेल, परंतु त्यात हुशार प्राध्यापक असतील असे नाही. याला काही अपवाद जरूर आहेत, आज बोटावर मोजणारे प्राध्यापक शिक्षण संस्था आपले प्रामाणिक प्रयत्न देत आहेत त्यामुळेच या देशाची वाटचाल बरी चालली आहे. त्यांची त्रिवार अभिनंदन. आपल्या विद्यार्थ्यांना जर विदेशी विद्यापीठाची समर्थ साथ मिळाली तर नवा आणि युवा भारत घडविण्यासाठी चांगलीच मदत होणार आहे. उच्च शिक्षणामध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये संशोधन हेच ध्येय असले पाहिजे ते जर गाठायचे असेल तर परदेशी विद्यापीठांना सोबत घ्यावे लागेल. त्यांच्याशी दोस्ती करावी लागेल. जर या परदेशी विद्यापीठांनी अरेरावी केली, काही नुकसान यांच्यामुळे होत असेल तर आपली जनता आणि विद्यार्थी यांना पिटाळून लावण्यासाठी नक्कीच सक्षम आहे. विदेशी विद्यापीठांचे शैक्षणिक प्रोडक्ट एक वेळेस वापरून पाहण्यास काहीच हरकत नाही. वापरण्याच्या आधी कुठल्याही गोष्टीचीff निरुपयोगीता सिद्ध होत नाही. घोकमपट्टी शिक्षण पद्धती पेक्षा संशोधन व कौशल्य आधारित शिक्षणाची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही... उमाकांत जोशी नांदेड.8208623188