जागवती मम आठवणींना..
प्रेमात पडणं, देखणेपणात गुंतणं, हा जीवनातला बहराचा काळ. 'प्रेम म्हणजे प्रेम ... ' ह्या पाडगावकरांच्या काव्यपंक्ती आपल्या भोवती फेर तर धरतातच, आपल्या आजुबाजुच्या विश्वातले, 'आपली प्रेमात गुरफटलेली', 'आपल्याच विश्वात रमलेली अवस्था' पहात असतात. हसत असतात. एकतर त्यांना त्यांच्या त्या अवस्थाकाळाची आठवण तरी होत रहाते किंवा आपण केव्हा या अवस्थेत येऊ या आशावादात ते राहू लागतात.
मोठा बहराचा काळ असतो हो. प्रेमाचे उमाळे लाटांसारखे उचंबळून येत असतात. गढुळलेलं पाणी नितळ दिसू लागतं. प्रेमवर्षावातले आषाढ, श्रावण, भाद्रपद त्यांचे नियम तोडून 'आपल्या' प्रेमविव्हळ जगात कोसळत असतात. बाहेर रखरखीत उन्हाळा असू देत, थंडीच्या कडाक्यात पानगळ होत असू देत, प्रेम विश्वात मात्र नवी पालवी फुटत असते. बाहेर किती का कडक उन्हाळा असू देत, या प्रेमविव्हळ विश्वात गुलाबी थंडीचं आगमन झालेलं असतं! सारं चौफेर हिरवं हिरवंगार झालेलं असतं. प्रेम कळ्या उमलू लागलेल्या असतात.
तगरीच्या फुलांनादेखील मोगऱ्याचा गंध येऊ लागतो! गुलाब, चाफ्याच्या फुलांचं तर काही विचारूच नका. सगळीकडे गजरे, वेण्या, पुष्पगुच्छं आपापले स्टॉल मांडून बसलेले असतात.
सूर्य मवाळ होतो! सकाळपासून त्याचं कोवळं रंगीतपण चोवीस तास 'तिच्या' गालावरचा लालिमा रंगवत राहतं. चंद्र तेजाळून उगवतो. चंद्रकोर तर थेट 'तिच्या' भाळावर ऐटीत बसण्यासाठी आतूर झालेली असते. चांदण्यांचे तर सकाळ संध्याकाळ सडेच पडलेले असतात. तारका रांगोळ्यांच्या चित्रांत गर्दी करू लागतात!
एक महत्वाचं राहिलंच. अचानक घनदाट केशसंभार कृष्णमेघाचं रूप घेऊन अवतरतो.
ऐन बाराच्या उन्हात पक्षी मंजुळ किलबिल करीत असतात. काही विचारू नका.
अतिशयोक्ती वाटते ना. आपण प्रेमपाशात गुरफटलो ना की या अवस्थेत दुसरं काही कळत नसतं. या अवस्थेविषयी कलावंतांच्या प्रतिभेला तर वेगवेगळे साक्षात्कार झालेले असतात. चित्रकाराच्या कुंचल्याला, शिल्पकाराच्या खिळाहातोडीला नाजुक गोलाई आलेली असते.
कवी साहित्यिकांच्या पोतडीत तर शब्दांवरचे रेशन, निर्बंध उठवले गेल्यासारखे होऊन त्यांच्या पोतड्यातले शब्द ओसंडून वाहू लागतात. कल्पना विविध नृत्यात, सुरात नाचू गाऊ लागतात. शेरोशायरीची तर बातच और...
अहाहा, वाहव्वा, क्या बात, क्या बात म्हणत, चौथीपास श्रोतासुद्धा अचानक उर्दू वगैरे भाषा जाणू लागतो! तर, साठी सत्तरी उलटलेल्यांच्या मनाची अवस्था तर...' ज्वानीचं झालं कोळसं न् म्हताऱ्याला आलं बाळसं !!'
इतकं वर्णन पुरेसंय ना त्या प्रेमभऱ्या अवस्थेची कल्पना यायला... की अजून काही कथन, मधाळ भाषेतलं विवेचन, मैफिल वगैरे ठरवू या म्हणताय ? कंटाळवाणं नाही ना वाटत? मग करू का थोडी शेरोशायरी. आपली आपली गरीबाची हं. एखाद्या साध्या अभिनेत्याला सुद्धा 'गरिबोंका अमिताभ' म्हणून गौरवलं जातं.... !!!!
'कोवळ्या त्या चेहऱ्याची, प्रतिमा ती छायाचित्रातली।
जागवती मम आठवणींना या ऐशा निवांत काली।
कळीला जाग यावी अन् ती फुलावी जशी।
ऐशीच अमुची प्रेमवाणी, फुलत गेली हळुवारशी।
प्रेमवाणी मधुरवाणी मुग्धवाणी रोजची ती।
वैखरी मुकीच होऊनी, बसतसे लाजऱ्या मुखावरती।
स्पर्शास फुटे अवचित वाचा, तोच बोले शब्द होऊनी।
हृदयांतरीची गोड भाषा, तोच घेई जाणुनी।
शब्द अडाणी, त्यांस कैशी समजावी लाघवी स्पर्शवाणी।
रोमांचांस कळावयाचे सारे, गाऊ लागती तेच गाणी।
मुग्धता, लुब्धता अधीर जाण्या घरात तृप्ततेच्या।
स्वप्नं सत्यात उतरोन येती समाधीसम अवस्थेच्या।
शब्द ऐसे वेंधळे की, पडती भांडारात अडकुनी।
मांगल्याच्या मग त्या क्षणी, येतच नव्हते ओठांतुनी !!
पद्मनाभ स्नेहप्रभा प्रभाकर हिंगे,
मांडवगण.
शुभकृत नाम संवत्सर, उत्तरायण, हेमंत ऋतु.
मिती : पौष कृष्ण १०, शालिवाहन शके १९४४.
मंगळवार दिनांक : १७ जानेवारी